नुपूर तेवारी होणार जागतिक शांतिदूत
मुंबई, दि. ३० नोव्हेंबर : जपानमध्ये मागील १८ वर्षांपासून विभिन्न सामाजिक कार्यक्रमांमार्फत भारत आणि जपानमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या नुपूर तेवारी यांना विश्व शांती मिशनने जागतिक शांतिदूत सन्मान बहाल करण्याची घोषणा केली आहे. याविषयीची माहिती विश्व शांती अभियानाचे संस्थापक आणि शांती मिशनचे अध्यक्ष डॉ. हुजाएफा खोराकीवाला यांनी दिली. ते वोकहार्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष आहेत. ३ जानेवारी २०२२ रोजी नुपूर यांना जागतिक शांतिदूत ही उपाधी दिली जाणार आहे. एक प्रतिमा, प्रमाणपत्र तसेच चांदीचे नाणे असे पुरस्काराचे स्वरुप असणार आहे.
शांती मिशन द्वारा प्रसृत करण्यात आलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात असे नमूद करण्यात आले आहे की, सुश्री नुपूर या अत्यंत समर्पित समाजसेवक असून कृतज्ञता, क्षमा, प्रेम, दानशूरपणा, विनयशीलता, धैर्य तसेच सत्य यासारखी सात मूल्ये त्यांना अत्यंत प्रिय आहेत. तसेच ही मूल्ये त्या आपल्या नित्य जीवनात आचरणातही आणतात. त्यांना ‘विश्व शांतिदूत’ ही उपाधी बहाल करणे ही विश्व शांती मिशनसाठी अत्यंत गौरवास्पद बाब आहे. नुपूर यांच्या प्रयत्नांनी जगभरात शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेला मोठे यश मिळेल, अशी आशा आहे.
उल्लेखनीय बाब अशी की नूपूर या , ‘हील टोकियो आणि हील इंडिया’ अभियानाच्यामाध्यमातून मागील १८ वर्षांपासून जपानमध्ये भारतीय मूल्यांचा प्रचारप्रसार करत आहेत. त्यांनी टोकियो मध्ये, गरीबांना अन्नदान करुन आपल्या या उपक्रमांची सुरुवात केली तसेच विभिन्न सामाजिक उपक्रमांतून भारत आणि जपानमधील संबंध आणखी दृढ व्हावेत, यासाठी प्रयत्न करीत आहेत.
मागील महिन्यात या संस्थेने शारी एरिसन, वरूण चौधरी, माजी क्रिकेटर यजुर्वेंद्र सिंह, टी.व्ही निवेदिका नदिया हक्कानी तसेच जायेद खान यांनी ही उपाधी बहाल केली आहे. त्यांच्यासमवेतच मिनी बोधनवाला, अनूपसिंह कुमार, माजी क्रिकेटर कीर्ति आजाद यांच्या पत्नी पूनम आजाद, अभिनेत्री कायनात अरोरा, डॉ. अँथोनी कैस्टो, अभिनेता राजा मुराद तसेच दत्ताराम फोडे आदी मान्यवरांना शांतिदूत पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. आपला उद्देश हा संपूर्ण जगात शांती सैनिकांची सगळ्यात मोठी फौज तयार करणे असल्याचे, फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. खोराकीवाला यांनी यावेळी म्हटले होते.