स्वर्णिम विजय दिवस
पाकिस्तान वर भारताच्या निर्णायक लढाईच्या विजयाचा पन्नासाव्वा वर्ष दिवस (16 डिसें 2021)
93 हजार सशस्त्र सैनिकांसह संपूर्ण शरणागती स्वीकारल्याच्या मसुद्यावर / लेखी करारावर पाकिस्तानचे पूर्व विभागाचे ले. जन. ए.ए. के . नियाझी यांनी भारताचे पूर्व विभागाचे आर्मी कमांडर ले . जन . जगजीत सिंह अरोरा यांच्याकडे स्वाक्षरी करून दस्त ऐवज सुपूर्त केले. तो दिवस 16 डिसें 1971, सुवर्णाक्षरात नोंदवला गेला.
03 डिसेंबर 1971 ला प्रत्यक्ष युद्ध घोषित केले व पाकच्या हवाई हल्ल्यांना प्रतिहल्ला करून सर्व सशस्त्र सेनांनी एकाच वेळी हल्ले चढवून पराक्रमाची पराकाष्ठा केली . भूसेनाध्यक्ष सॅम माणेकशॉ व वायुसेनाध्यक्ष प्रताप चंद्र लाल आणि नौसेनाध्यक्ष एसएम नन्दा यांच्या नेतृत्वाखाली युद्ध जिंकले . 04 डिसेंबर 1971 ला नौदलाने ” ट्रायडेंट मोहीम ” राबवून आपल्या क्षेपणास्त्रांच्या अचूक माऱ्याने पाकिस्तानी युद्धनौका ‘खैबर’, ‘शहाजहान’, ‘मुहाफिज’ यांना जलसमाधी दिली . आपल्या निपात निर्घात व वीर या क्षेपणास्त्रधारी बोटींनी हे कार्य बिनचुक पार पाडले . पाठोपाठ भारताच्या पायथन मोहीमेद्वारे कराची वर भारतीय युद्धनौका विनाशच्या क्षेपणास्त्र मारा करून केमारी तेल साठ्यावर हल्ला करून ते आठ दिवस आगीच्या स्वाधीन केले . या पराक्रमामुळेच दर वर्षी 04 डिसेंबर हा नौदल दिवस म्हणून साजरा करतात.
पाकिस्तान ने पश्चिमी सीमेवर 65 रणगाड्यांद्वारा 2000 सैनिकांसह ‘लोंगोवाल’, राजस्थान येथे हल्ला केला. त्याला केवळ 120 भारतीय सैनिकांच्या तुकडीने मेजर कुलदीप सिंह चांदपुरी यांच्या नेतृत्वामध्ये रात्रभर कडवी झुंज दिली व आक्रमण थोपवून धरले होते . सकाळी विंग कमांडर MS बावा यांच्या तुकडीने हवाई हल्ले करून पाकिस्थान लष्कराचे कंबरडे मोडले व लढाई जिंकली .
पश्चिम पाकिस्थान च्या बसंतर नदी किनारी शकरगढ़ भागामधे त्याच वेळी तुंबळ युद्ध झाले. पायदळाच्या तीन तुकड्या व दोन रणगाड्याच्या तुकड्यां द्वारे भयंकर युद्ध झाले. ब्रिगेडीयर अरुण वैद्य व ले. कर्नल बी . टी . पंडीत यांच्या तुकड्यांनी धुमाकुळ घालून पाकचे 51 रणगाड्यांचे नुकसान केले . रणगाडा विरोधी सुरुंगाचे जाळे पसरले असतानाही ते निस्तेज करून शौर्य व धैर्य याचे प्रदर्शन करत युद्ध जिंकले . सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल या 17 पुना हॉर्सच्या जवानाचे मरणोत्तर परमवीर चक्र देऊन व या 3 ग्रेनेडीयर च्या तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या मेजर होशियार सिंह यांना परमवीर चक्राने पुरस्कृत केले .
फ़्लाइंग ऑफिसर निर्मल जीत सिंह शेखॉन यांनी एकट्याने श्रीनगर विमानतळा वरील हल्ले परतवून चोख प्रत्युत्तर देऊन पाकिस्थानला नेस्तनाबूल केले. यासाठी त्यांना मरणोत्तर ‘परमवीर चक्र ‘ देण्यात आले .
या युद्धाच्या आधीच 2-3 वर्षे भारताची जी गुप्तहेर संस्था ” RAW ” आहे याचे प्रमुख रामेश्वरनाथ काओ ( KAO ) यांनी पश्चिम पाकिस्थान पासून पूर्व पाकिस्तान तोडण्यासाठी योजना पूर्वक हालचाली करून बांगला मुक्ति बाहिनी ” ला खतपाणी घालून फूट पाडली होतीच. त्या मुळे मुक्ती वाहिनीच्या मदतीसाठी भारताने पाकिस्तानशी युद्ध केले. तांगेल (ढाक्का पासून अंदाजे 80 कि.मी.) या शहरावर हवेतून पॅराशूटद्वारा 52 पैकी 50 विमानांमधून प्रत्यक्षात हजार छत्रीधारी उतरवून, पाच हजार उतरविल्याची हवा प्रसारमाध्यमांद्वारे केली होती. मनोवैज्ञानिक दबाव आणून आर्मी कमांडर पूर्वपाकिस्थान याला संपूर्ण शरणागती साठी भाग पाडले
पूर्व पाकिस्तानच्या सीमेवर ही बांगला मुक्ती वाहिनी बरोबर लढाई लढले. ” हिली युद्ध ” हे गंगासागर व आगरताळा येथे झालेले सर्वात मोठे भयंकर युद्ध म्हणून मानले जाते. भारताच्या बाजूने चार पायदळाच्या ब्रिगेड, एक रणगाड्याची, एक इंजिनीयर ब्रिगेड व दोन तोफखान्यां सह वायूदलाची मदत आणि त्याचवेळी पूर्व विभाग नौदलाने पाकिस्तानची केलेली कोंडी यांचा एकत्रित परिणाम म्हणजे संपूर्ण शरणागती. पाकच्या 93 हजार सशस्त्र सैनिकांसह निर्णायक युद्धात भारताचा विजय व पुढे “बांगला देश” ची स्थापना स्वतंत्र देश म्हणून. “हिली”ची लढाई यात पराक्रम व शौर्य गाजवलेल्या लान्स नायक अल्बर्ट एक्का यांना मरणोत्तर परमवीरचक्र देऊन गौरवले. निर्णायक विजयानंतर 513 वीरचक्र, 76 महावीरचक्र व 4 परमवीरचक्र यांसह एकूण 1313 जणांना विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात देशाने ऋण मुक्तीचा प्रयत्न केला.
1971 च्या स्वर्णिम विजय दिना निमित्त सर्वज्ञात व अज्ञात अशा असंख्य सैनिकांनी जीवाची बाजी लावून युद्ध जिंकले अशा सर्व सैनिकांना मानाचा प्रणाम !
भारतीय सशस्त्र दलांच्या तीन्ही dalanबरोबरच सर्व समन्वयाने 93 हजार एवढया प्रचंड संख्येने सशस्त्र पाकिस्थानी जवानांना युद्ध कैदी बनवून निर्णायक लढाईत विजय मिळवला. परंतु वाटाघाटीमध्ये एवढ्या पराक्रमाच्या बदल्यात भारताला प्रत्यक्षात काहीच समस्या सोडवून घेता आल्या नाहीत. सीमाप्रश्न तसाच राहिला ही खंत प्रत्येक देशभक्ताच्या मनात राहिली आहे. ती बोच ” अखंड भारत ” झाल्या शिवाय मिटणार नाही. त्या साठी आपण कटीबद्ध / संकल्पबद्ध होऊयात .
जय हिंद!!
काशीनाथ देवधर (निवृत्त शास्त्रज्ञ DRDO)