Opinion

निर्मल प्रेमाच्या आधारावर! समाजाची विलक्षण रचना करणारे नरसी मेहता

महात्मा गांधींना आपल्या देशाचे ‘राष्ट्र पिता’ म्हणतात; त्याचे एक कारण असे कि, गांधींनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीबरोबर ‘समाजात सुधार’ घडवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्यांच्या प्रबोधनातून तत्कालीन कुरीती आणि अस्पृश्यतेवर विलक्षण मात केली. गांधीजींचे अनेक भजन आजसुद्धा लोकप्रिय आहेत, करोडो हृदयांना साद घालत आहेत. त्यापैकी एक म्हणजे, “वैष्णव जन तो तेने कहिये जे पीड़ परायी जाणे रे… “

आपल्या पैकी अनेकांना हे माहित नसेल कि, गांधीजींचं हे आवडतं भजन ‘गुजरातचे आदी कवी’ श्री नरसिंह मेहता यांनी रचले आहे. नरसी मेहता १५व्या शतकातले हिंदू परंपरेतील वैष्णव पंथी संत होते. कृष्ण भक्तीत रंगलेल्या या अवलियाने तब्बल २२,००० भजन आणि कीर्तनांची रचना करून गुजराती साहित्याला संगीत आणि तत्वज्ञानाची जोड देऊन एका वेगळ्या पातळीवर नेऊन ठेवले! 

साहित्याची सेवा करत असतांना त्यांनी समाजाच्या,अर्थात साक्षात नारायणाच्या सेवेत कधीच खंड पडू दिला नाही. ते एक धाडसी समाज सुधारक सुद्धा होते. ‘हरिजन’ या शब्दानी गांधीजींना खूप प्रसिद्धी मिळवून दिली. हा शब्द सुद्धा ‘नरसिंह मेहता’ यांचाच होता! 

“The term ‘Harijan’ had been first used by the medieval poet-saint ‘Narshimh Mehta’, whom Gandhi had long admired (Mehta’s ‘Vaishnav Jan To’ was one of his favourite hymns). Gandhiji seems to have borrowed this word from Narshimha Mehta who had used the word “Harijan” first time in his devotional songs.”  

– Harold R. Isaac (India’s Ex-Untouchables, New York, 1965) 

हरी म्हणजे कृष्ण, आणि जन म्हणजे जनता. ‘कृष्णाची जनता’ या समर्पक शब्दांनी संबोधून महात्मा गांधींनी आपल्या तथाकथित अस्पृश्य बांधवांना यथोचित सन्मान दिला, यात तिळमात्र शंका नाही. इतकंच नाही, १९३३ मध्ये गांधींनी त्यांच्या ‘young India’ साप्ताहिकाचे नाव बदलून ‘हरिजन’ ठेवले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गांधींनी एकमताने केलेल्या ‘पुणे करारामध्ये’ ‘Anti-Untouchability League’ चे नाव बदलून ‘हरिजन सेवक संघ’ असे ठेवण्यात आले. हे सगळे प्रयत्न समाजातील अस्पृश्यता नामक भीषण समस्या सोडवण्यासाठी केले गेले. समाजाच्या विविध वर्गातून आणि विचारधारेतून येणाऱ्या अनेक सत्पुरुषांनी आपापल्या परीने असेच प्रयत्न केले आहेत. या सगळ्यांच्या अविरत प्रयत्नातून आजचा हिंदू समाज पुन्हा निखळला आहे. अजूनही बरंच काम शिल्लक आहे. ज्यांनी या महान यज्ञात आहुती दिली आहे, त्या सगळ्यांना विनम्र अभिवादन करून आपण कामाला लागलो, तर ‘विषमता मुक्त’ आणि ‘समरसता युक्त’ समाज लवकरच निर्माण झालेला दिसेल. 

श्री ‘नरसिंह मेहता’ यांनी केवळ साहित्यात नव्हे तर त्यांच्या आयुष्यात हा उपदेश केला आहे.त्यांचा जन्म गुजरातच्या ‘तळजा’ येथे झाला. ५ वर्षाच्या शिशु अवस्थेत असतांना त्यांच्या आई वडिलांना देवाज्ञा झाली. जयगौरी नावाच्या त्यांच्या आजीने त्यांचे पालन-पोषण केले. वयाच्या ८व्या वर्षी सुद्धा नरसी बोलत नसे. एका वैष्णव संताच्या आशीर्वादाने त्याला कंठ फुटला तो आजीवन कृष्णाचे गुणगान करण्यासाठी! १४२९ साली त्यांचे मानेकबाई यांच्याशी विवाह झाला आणि ते दाम्पत्य त्यांच्या चुलत भावासोबत, जुनागड येथे राहू लागले. वाहिनीचा स्वभाव खाष्ट. त्या सतत नरसी ला टोमणे मारत, त्याच्या ईश्वर भक्तीची खिल्ली उडवत. एक दिवस वैतागून नरसी जवळच्या जंगलात निघून गेले. त्यांनी महादेवाची उपासना केली आणि त्यांना साक्षात महादेवाचे दर्शन घडले! ते सांगत कि श्री कृष्णानीच त्यांना मार्गदर्शन केले होते. 

साक्षात्कार झाल्यावर ते पुन्हा घरी आले आणि वहिनीला साष्टांग दंडवत घातले आणि त्यांचा अपमान केला म्हणून आभार सुद्धा व्यक्त केले! पुढे या मनानी श्रीमंत पण धनानी दरिद्री दाम्पत्याने १ मुलगा, शामलदास आणि एक मुलगी, कुवरबाई यांना जन्म दिला खरा पण नरसी चे मन सदैव भागवत भक्ती मध्ये तल्लीन असत. नरसिंह कधीच जात-पात मानत नसे. त्यांनी निर्मल मनानी सगळ्यांची, ‘हरी-जनाची’ अविरत सेवा केली. त्यामुळे त्यांना खूप कष्ट, अवहेलना सहन करावी लागली. जुनागडच्या नागारांनी त्यांच्यावर ना ना आरोप केले, त्यांच्या सुंदर भजनांची टिंगल केली. चंदूमासा नावाच्या राजानेतर त्यांनी देवासाठी बाग बनवली म्हणून त्यांच्यावर खटला देखील भरला! या सगळ्या संकटातून त्यांना श्री कृष्णानी कसे तारले, याचे सुरेख वर्णन ‘हर माला’ नावाच्या उपन्यासात त्यांनी केले आहे. 

पुढे ते मॅन्ग्रोई येथे राहू लागले आणि वयाच्या ७व्या वर्षी त्यांचे निधन झाले. ज्या स्मशानात त्यांचा अंत्यविधी झाला, त्याला ‘नरसिंह नु शमशान’ असे नाव दिले आहे. आजीवन कुठल्याही सुखाची अभिलाषा नं धरता, केवळ भागवत भक्ती केलेल्या या विभूतीला लोक ‘भगत मेहता’ या नावाने ओळखतात. विचार केला तर किती मोठी कमाई केली त्यांनी! आज ४०० वर्ष होऊन गेले तरी समाज त्यांना आदर्श मानून चालतो आहे; कीर्तन आणि भजनांची रचना करत करत त्यांनी समाजाची विलक्षण रचना केली आहे ते केवळ निर्मल प्रेमाच्या आधारावर! या महापुरुषाला विनम्र अभिवादन!

“मोह माया व्यापे नही जेने द्रिढ़ वैराग्य जेना मन मान रे

राम नाम सुन ताळी लागी सकळ तिरथ तेना तन मान रे

वैष्णव जन तो तेने कहिये जे पीड़ परायी जाणे रे”

– कल्पेश दीक्षित          

Back to top button