भाग्यनगर येथे ५ जानेवारी २०२२ पासून अखिल भारतीय समन्वय बैठक
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित सामाजिक जीवनातील विभिन्न क्षेत्रात कार्यरत विविध संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक पुढील महिन्यात ५ ते ७ जानेवारी, २०२२ रोजी भाग्यनगर (हैदराबाद), तेलंगणा येथे आयोजित करण्यात आली आहे. दरवर्षी होणारी ही अखिल भारतीय स्तरावरील व्यापक समन्वय बैठक वर्षातून एकदा आयोजित केली जाते.
या बैठकीत पू. सरसंघचालक डॉ. मोहन जी भागवत तसेच सरकार्यवाह मा. दत्तात्रेय जी होसबाळे यांच्यासमवेतच संघाचे पाचही सह सरकार्यवाह आणि अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. भारतीय मजदूर संघाचे मा. हिरण्यमय पंड्या व बी. सुरेंद्रन, विश्व हिंदू परिषदेचे मा. आलोक कुमार व मिलिंद परांडे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आशीष चौहान व निधि त्रिपाठी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा व बी.एल संतोष आणि भारतीय किसान संघाचे दिनेश कुलकर्णी, विद्याभारतीचे रामकृष्ण राव आणि जीएम काशीपती, राष्ट्रसेविका समितीच्या पू. शांताक्का व अन्नदानम सीताक्का, वनवासी कल्याण आश्रमाचे रामचंद्र खराडी, अतुल जोग यांच्यासमवेत एकूण ३६ संघटनांचे पदाधिकारी या बैठकीत सहभागी होणार आहेत. हे सर्व संघटन शिक्षण व वैचारिक क्षेत्र, आर्थिक जगत, सेवा कार्य तसेच विभिन्न सामाजिक क्षेत्रात निरंतर सक्रीय असतात. संघ अशा संघटनांत सक्रिय स्वयंसेवकांशी समन्वय ठेवतो.
या बैठकीत सद्य परिस्थितीसंदर्भात आपले अनुभव व्यक्त करताना प्रत्येक संघटना करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती उपस्थित मान्यवरांना देणार आहेत. पर्यावरण, कुटुंब प्रबोधन तसेच सामाजिक समरसता यासारख्या विषयांवर आवश्यक कार्य तसेच ती समन्वित प्रयत्नांतून करण्याविषयीची चर्चा या बैठकीत केली जाणार आहे.
सुनील आंबेकर
अखिल भारतीय प्रचार प्रमुख
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
**