News

गिरीश प्रभूणे यांच्या कार्याचा वटवृक्ष व्हावा – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

पुणे, दि. २९ डिसेंबर : भटक्या विमुक्त समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी पद्मश्री गिरीश प्रभुणे यांचे महान कार्य सुरु आहे. त्यांच्या या कार्याचा वटवृक्ष व्हावा,’ असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी चिंचवड येथे केले. ‘भारतीय वारसा : परिचय आणि संवर्धन’ कार्यशाळेचे भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते आज पुनरुत्थान समरसता गुरुकुलम, चिंचवड येथे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. दोन दिवस चालणाऱ्या या कार्यशाळेत ‘प्राचीन भारतीय संस्कृती’ वर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली असून, विषय तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, गिरीश प्रभुणे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी राज्यपालांनी क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीला १५ लाखांची मदतही जाहीर केली.

भगतसिंग कोश्यारी म्हणाले, ‘साधना कधीही वाया जात नाही, याचा परिचय गिरीश प्रभुणे यांचे काम पाहिल्यावर येतो. प्रभुणे यांनी पन्नास वर्षांपूर्वी सुरु केलेल्या या कार्याचा वटवृक्ष व्हावा आणि भटक्या विमुक्त लोकांच्या उत्थानासाठी सुरु असलेले हे काम निरंतर चालत राहो, अशी माझी आशा आहे. भटक्या विमुक्त लोकांच्या हाती कला आहे. त्यांनी निर्माण केलेल्या अनेक वस्तू बाजारात उपलब्ध आहेत. या संस्थेच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या कलात्मक वस्तू आपण विकत घेऊन त्याला आर्थिक हातभार लावला पाहिजे, असे आवाहनही राज्यपालांनी यावेळी केले.

चापेकर बंधूंसारख्या क्रांतिकारकांच्या धाडस आणि बलिदानामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे. त्याचा आदर आपण करायला पाहिजे. देशाला आत्मनिर्भर बनविण्याचे काम पुनरुत्थान समरसता गुरुकुलम यासारख्या विद्यापीठाच्या माध्यमातून होणार आहे, यासाठी सामान्य नागरिकांचे योगदान महत्त्वाचे आहे, असेही राज्यपालांनी पुढे नमूद केले.

खासदार विनय सहस्त्रबुद्धे म्हणाले, ‘पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या कार्याचे स्वरुप व्यापक आहे. भटक्या विमुक्त लोकांना शिक्षण आणि विद्येच्या प्रवाहात आणण्याचे काम प्रभुणे करत आहेत. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचे कौतुक होत आहे, ही आनंदाची बाब आहे. मुख्यप्रवाह याचा अर्थ व्यापक करायला हवा, जेणेकरुन भटके विमुक्त या धारेचा सहज भाग होऊन जातील. क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची शिदोरी पुढे घेऊन जाणारे गिरीश प्रभुणे यांचे काम वंदनीय आहे.’

राज्यपाल कोश्यारी यांनी सुरुवातीला गुरुकुलच्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त समितीच्या बोधचिन्हाचे राज्यपालांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे यांनी केले.

क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सेंटर फॉर सिटीझन सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. दोन दिवसीय या कार्यशाळेत इतिहास तज्ज्ञ आणि पुरातत्त्व शास्त्रज्ञ भारतीय प्राचीन संस्कृतीच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकतील. तसेच, भारतीय पारंपरिक कौशल्याचे प्रात्यक्षिक देखील अनुभवता येणार आहे. यामध्ये पारंपरिक पट्ट चित्रकला : कुर्बान आणि बहारुन चित्रकार व पारंपरिक धातूकाम (डोकरा कास्टिंग) : इंद्रजीत उईके प्रात्यक्षिक सादर करतील.

Back to top button