कुलाबा किल्ल्यावर कट्टरवाद्यांकडून अनधिकृत थडगे; पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष
हे अनधिकृत थडगे त्वरित न हटवले गेल्यास शिवप्रेमी आणि इतिहास प्रेमी लोकांच्या जनाक्रोशाचा रघुजीराजे आंग्रे यांचा इशारा
अलिबाग : येथील कुलाबा किल्ल्यावरील पुरातत्व विभागाच्या कार्यालयाच्या जवळच काही दिवसांपूर्वी सिमेंट आणि लाद्यांचे पक्के बांधकाम करून थडगे उभारण्यात आले आहे. माघी गणेश जयंतीच्या उत्सवाच्या वेळी मंडपाचे खांब उभारण्यासाठी आक्षेप घेणाऱ्या पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांकडून थेट किल्ल्याच्या तटबंदीवर हे अनधिकृत बांधकाम होत असताना दुर्लक्ष का करण्यात आले? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. तसेच यातून गड आणि दुर्ग यांचे जतन आणि संवर्धन करण्याचे दायित्व असलेला पुरातत्त्व विभागच गड-दुर्ग यांवरील अवैध बांधकामांना पाठिंबा देत आहेत का? अशी शंका जनमानसातून उपस्थित केली जात आहे.
‘स्वराज्याची सागरी राजधानी’ अशी ओळख असलेल्या कुलाबा किल्ल्यावरील थडग्याच्या विरोधात सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी नुकतीच मुंबई येथील महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभागाकडे ई-मेलद्वारे तक्रार केली आहे; मात्र या तक्रारीवर कारवाई करणे तर दूरच; पण पुरातत्त्व विभागाने या पत्राला साधे उत्तर देण्याचेही सौजन्य दाखवलेले नाही. कुलाबा किल्ल्यातील हे अनधिकृत बांधकाम कोणाच्या आशीर्वादाने करणयात आले? पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्याना याची माहिती होती का? त्यांनी या संदर्भात काय कारवाई केली? जर ते बांधकाम जुने असेल तर पुरातत्व खात्याचे अधिकारी त्याचे पुरावे देऊ शकतात का? नसल्यास त्यांनी हे काम कसे होऊ दिले? गुन्हे दाखल करण्यात का आले नाहीत?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडांवर थडगे बांधणे, नंतर त्यावर हिरवी चादर चढवणे, हळूहळू तेथे उरूस साजरा करून काही वर्षांनी जुनी परंपरा असल्याचे भासवणे आणि नंतर दर्गा उभारून ते ‘धार्मिक केंद्र’ बनवणे, हा सर्व प्रकार नियोजनबद्ध सुरु आहे. यामुळे या ऐतिहासिक गडकोटांवरील छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाचा इतिहास पुसून टाकला जात आहे, असे रघुजी राजे यांनी नमूद केले आहे.
रघुजी राजे आंग्रे म्हणाले कि, माझ्या पूर्वजांच्या समवेत मुसलमान समाजातील अनेक पराक्रमी जण स्वराज्यासाठी लढले. त्यांचा आम्ही अतीव आदरच करतो; मात्र कुलाबा किल्ल्यावर असे कोण महान सत्पुरुष होऊन गेले, कि त्यांची समाधी थेट गडाच्या तटबंदीवर यावी ? पुरातत्त्वीय महत्वाचे गड आणि परिसर यांवर अतिक्रमण करून, त्यांवर ताबा मिळवून नवीन ‘लँड जिहाद’ चालू केला आहे का? अशी शंका वाटण्यास वाव आहे, अशी प्रतिक्रियाही रघुजीराजे यांनी त्यांच्या ‘फेसबुक’ पेजवरील संदेशात व्यक्त केली आहे. ३ महिन्यांपूर्वी म्हणजेच १९ ऑक्टोबर २०२१ रोजी काही कट्टरवाद्यांनी कुलाबा किल्ल्यावर जाऊन तेथे एका ठिकाणी चादर चढवून फुले वाहिली. याची छायाचित्रे उपलब्ध झाली आहेत. त्या छायाचित्रावर दिनांकही आहे, या छायाचित्रातील बांधकामावर कोणतेही थडगे नाही; मात्र मागील आठवड्यात काढण्यात आलेल्या छायाचित्रांमध्ये ज्या ठिकाणी मुसलमानांनी चादर चढवली आहे, त्याच ठिकाणी थडगे बांधून त्याला पांढरा रंग फासण्यात आला आहे. या दोन्ही छायाचित्रांवरून हे थडगे काही दिवसांपूर्वीच बांधण्यात आल्याचे सिद्ध होते.
दरम्यान, कुलाबा गड हा ‘संरक्षित स्मारक’ आहे. त्यामुळे या गडावर कोणतेही नवीन बांधकाम किंवा असलेल्या बांधकामात फेरबदल करता येत नाहीत. सध्या गडावर बांधण्यात आलेले थडग्याचे बांधकाम हे पूर्णपणे नवीन आहे. त्यामुळे पुरातत्व विभागाने तातडीने कारवाई करून हे अतिक्रम हटवावे, अशी मागणीही रघुजीराजे आंग्रे यांनी केली आहे.