हमारी प्रेरणा भास्कर हैं जिनका रथ सतत् चलता…
मनुष्य मात्राचे अवघे जीवन हे निसर्गाशी बंध आहे, निसर्गातील बदलांचा मनुष्यावर आणि मनुष्याच्या भौतिक वर्तनाचा निसर्गावर परिणाम हा सतत होत असतो त्यामुळे आपण बारकाईने विचार केला तर आपल्या हिंदू संस्कृतीत असलेल्या सण, समारंभ, उत्सवाचे महत्त्व निसर्गाचा विचार करून केलेले आढळेल. म्हणूनच निसर्ग आणि माणूस याचा विचार करूनच आपला विकास हा व्हायला हवा.
उत्तरायण हे २१ डिसेंबरला सुरू होते त्यादिवसापासून सूर्याचा उत्तरदिशेकडे प्रवास सुरू होतो. सूर्याचा प्रवास हा दर महिन्याला वेगवेगळ्या राशीतून होत असतो , सर्वसाधारपणे सध्या १४ जानेवारीच्या आसपास सूर्य प्रत्यक्ष मकर राशीत प्रवेश करतो एका अर्थाने हा संक्रमण काळ आहे म्हणून या दिवसाला महत्त्व प्राप्त झाले आहे. अंधाराकडून प्रकाशाकडे सृष्टीची वाटचाल सुरू होते, दिवस मोठा होत जातो रात्र छोटी होते. प्रकाश हा माणसात चैतन्य निर्माण करतो. प्रकाश देणाऱ्या सूर्याचे निसर्गात महत्त्वाचे स्थान आहे, एका अर्थाने प्रकाश, ऊर्जा देणारे आदिम तत्त्व ,सर्वांचे पोषण करतो त्यामुळे सूर्याचे तेज आपल्याही अंगी यावे अशा अर्थाने एका प्रार्थनेत म्हटले आहे,
” असतो मा सद्गमय ।
तमसो मा ज्योतिर्गमय ।
मृत्योर्मा अमृतं गमय।
याचा सरळ अर्थ आहे आमचा प्रवास असत्याकडून सत्याकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे आणि मृत्युकडून अमरत्वाकडे होऊ दे.
सूर्याच्या अस्तित्वाचा आणखीन एक अर्थ आहे तो म्हणजे कर्मशीलतेचा संदेश देणारा सूर्य सतत कार्यमग्न असतोच आणि आपले काम प्रामाणिकपणे करत असतो आपल्या एका गीतात याचं वर्णन खुप छान आले आहे,
हमारी प्रेरणा भास्कर हैं जिनका रथ सतत् चलता
युगों से कार्यरत हैं जो सनातन हैं प्रबल उर्जा
गति मेरा धरम हैं जो भ्रमण करना भ्रमण करना
यही तो मन्त्र है़ अपना शुभंकर मन्त्र हैं अपना
चरैवेती चरैवेती यही तो मन्त्र हैं अपना…..
योगायोगाने स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस हा मकर संक्रातीच्या दिवशीच आहे. त्यांनीही आपल्याला कर्मशीलतेचा मंत्र दिला आहे तो म्हणजे
“उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत।” याचा अर्थ आहे, “उठा जागे व्हा जागे व्हा आणि आपले ध्येय साध्य होई पर्यंत स्वस्थ बसू नका.”
असा हा संक्रांतीचा उत्सव आपल्या सांस्कृतिक एकात्मतेचे प्रतीक आहे, एकच दिवस पण निरनिराळ्या ठिकाणी तो वेगवेगळया पद्धतीने साजरा होतो.
महाराष्ट्रात एकमेकांना तिळगुळ देऊन तिळाची स्निग्धता (स्नेह) आणि गुळाचा गोडवा (प्रेम) समाजात निर्माण व्हावा हा संदेश देतो,महिला या दिवशी सुगडाचे म्हणजे मातीच्या घटाचे दान करतात,देवाला तीळ तांदूळ अर्पण करतात, सौभाग्यवाण लुटून हळदी कुंकू कार्यक्रम करण्याची प्रथाही आहे.
उत्तर भारतात या दिवशी डाळभाताची खिचडी करतात, यादिवशी दान देण्याची प्रथा आहे. संक्रांतीला तिथे खिचडी संक्रांती म्हणतात.
बंगालमध्ये तिळुवा (तीळ + काकवी) आणि पीष्टक (तांदळाचे पीठ+ तूप+साखर) नावाचे पदार्थ करतात.
त्यामुळे तिळुवा किंवा पीष्टक संक्रांती म्हणतात.
दक्षिणेत याच काळात पोंगल नावाचा उत्सव चालतो जो तीन दिवस चालतो, पहिला दिवस इंद्रदेवतेसाठी तो ‘इंद्रपोंगल’, दुसरा दिवस सूर्य देवतेचा म्हणून ‘सूर्यपोंगल’ तिसरा दिवस ‘किंकरांत’ या नावाने ओळखला जातो, कारण या दिवशी देवीने किंकर नावाच्या दैत्याला ठार केले.
पद्धती जरी वेगवेगळ्या असल्या तरी, देवदेवतेविषयी कृतज्ञता, सामाजिक विचार, निसर्गोपासना ह्या भावना मात्र सारख्या आहेत. हेच हिंदू संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे.
संघाचा एकमेव उत्सव आहे की जो सौर मासानुसार होतो. संक्रांती म्हणजे सम्यक क्रांती याचा अर्थ योग्य आणि विधायक दिशेने होणारे सामाजिक परिवर्तन. हे मुकपणाने आणि सहज होणारे हवे ,नाहीतर क्रांती म्हणजे विद्रोह, उद्रेक, नासधूस, हिंसा, रक्तपात, निसर्ग आणि राष्ट्रीय मालमत्तेचे नुकसान असा घेतला जातो, कारण पश्चिमेची संस्कृती व विचारधारा संघर्षाचा विचार तर आपली संस्कृती व विचारधारा सामंजस्य, समन्वय याचा विचार करते.
शाखा या अभिनव आणि एकमेव कार्यपध्दतीच्या मार्गाने व्यक्ती निर्माण हे प्राथमिक कार्य हे संघाने आपले मानले. आहे एक तासाच्या शाखेतून संस्कार घेऊन समाज व देशाचा विचार करणारे नागरिक तयार होतील. देश काल परिस्थितीचा विचार करून सामाजिक परिवर्तनाचे काम जिथे जिथे शक्य आहे तिथे समाजाला बरोबर घेऊन हाती घेतील असा संघाचा विश्वास आहे. त्या दृष्टीने संघाचे कार्य सुरू आहे .
समाजात बदल करायचे ते समाजाला दूषणे देऊन चालत नाही ते बदल गतीनेही होत नाही,धीर धरावा लागतो, वेळ जाऊ द्यावा लागतो पण प्रयत्न आणि धीर सोडायचा नसतो. एकेकाळी “मला गाढव म्हणा पण हिंदू म्हणू नका” असा समाज “आम्ही हिंदू आहोत याचा मला अभिमान आहे” असं म्हणायला लागला आहे, हे प्राथमिक तरीही महत्त्वाचे संक्रमण आहे अर्थात हे संघाच्या ९६ वर्षाच्या तपस्येचे फळ आहे. याचा अर्थ आपल्या देशासमोरची आव्हाने संपली आहेत असं नाही. नवनवीन समस्या, संकटे,आव्हाने आ वासून उभी आहेत.काही अंतर्गत आहेत तर काही बाह्य !
कुटुंब कलह, जातीभेद, भाषा – प्रांत भेद, मंदिर प्रवेश, जाणीवपूर्वक केला जाणारा बुद्धिभेद, लाचखोरी, भ्रष्टाचार, दहशतवाद, घुसखोरी, टीव्ही वरून होणारे सांस्कृतिक आक्रमण, जीवनमूल्यांप्रती उदासीनता, वाढती व्यसनाधीनता,अमली पदार्थांचे आकर्षण,राज्य सरकारात, सुरक्षा दल यातील संघर्ष, सर्वधर्मसमभाव, माओवाद नक्षलवाद ( शहरी,ग्रामीण, वनवासी), वैश्विकरण, पाश्चात्यांचे अंधानुकरण, नैसर्गिक आपत्तीत झालेली वाढ या व अशा अनेक समस्या, व त्याचे स्वरूप सतत बदलते आहे, त्यामुळे संघाच्या कामाची गती वाढवायला हवी. संघाच्या कामाचा प्रभाव आहे हे कधी म्हणता येईल त्याचे निकष काय हे सांगताना कै. भय्याजी दाणी म्हणाले होते की पहिला निकष “समाजात जे घडावे वाटते ते घडवता येईल अशी शाखेची स्थिती आहे का ?” आणि दुसरा “समाजात जे घडू नये असे वाटते ते थांबवण्याची हिंमत आहे का ?” यावरून शाखेचा हेतू काय असला पाहिजे याची कल्पना येते. काही प्रमाणात पहिला हेतू साध्य होताना दिसला तरीही दुसरा निकष साध्य होण्यासाठी खुप मेहेनत घ्यावी लागणार आहे .
संघाच्या कामाचा विस्तार आज होताना दिसतो आहे, समाजाच्या अपेक्षा संघाकडून वाढल्या आहेत. संघाबद्दल अनेक गैरसमज,भ्रम जाणीवपूर्वक पसरवले गेले ते हळू हळू आपल्या प्रत्यक्ष कामामुळे दूर होत आहेत. समाजातील सज्जन शक्ती आणि समविचारी संघटना यांना मदतीला घेऊन संघाची वाटचाल सुरू आहे .
संघटन ( शारीरिक – बौद्धिक – व्यवस्था), जागरण ( सेवा – संपर्क – प्रचार) या बरोबरच गतिविधि ( धर्मजागरण – गोसेवा – ग्रामविकास – समरसता – कुटुंब प्रबोधन – पर्यावरण ) आणि आयाम ( सागरी सुरक्षा – वनवासी नेतृत्व विकास – पूर्वांचल विकास – भटके विमुक्त प्रश्न, काही स्थानिक समस्या इ विषय आहेत.) अशा माध्यमातून समाजात कार्यरत आहे.
याचबरोबर संघ समाजाच्या अनेक क्षेत्रात त्यात महिला, विद्यार्थी, धर्म, श्रमिक,राजकीय, धर्म,अर्थ, शेतकरी, सहकार, शिक्षण, साहित्य, इतिहास, कला, आरोग्य या व अशा अनेक क्षेत्रात राष्ट्रवादी विचाराच्या संघटना प्रभावी पद्धतीने काम करत आहेत.
हळू हळू कमी होणारे कोरोना संकट असो की राम जन्मभूमी निधी संकलन असो समाजाचा सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे ही समाधानाची गोष्ट आहे.
कोरोना पूर्ण संपलेला नाही त्या दृष्टीने आपण नित्यसिद्ध असायला हवे याची जाणीव तो वेगवेगळ्या अवतारातून करून देतो आहे. त्या संबंधीची काळजी घ्यायला हवी. परिवर्तन व्हायला हवे ही अपेक्षा स्वतःपासून काही बदल केले तर प्रत्यक्षात येते.
कुटुंब प्रबोधन,पर्यावरण आणि सामाजिक समरसता असो त्यातील छोट्या छोट्या व्यावहारिक गोष्टींना आपल्यापासून सुरुवात करायला हवी.
आठवड्यातून एकदा एकत्र जेवण आणि विचार विनिमय,कुटुंबाचे एकत्रित कार्यक्रम, एकमेकांकडे सहज जाणे हे असे उपक्रम कुटुंब व्यवस्थेच्या दृष्टीने पोषक ठरू शकतात.
प्लास्टिक मुक्त व्यवहार, पाण्याचा योग्य वापर, वृक्षारोपण व त्याची जोपासना यातून पर्यावरण संवर्धनाला चालना मिळेल.
संत,महापुरुष यांच्या जयंती,पुण्यतिथी कार्यक्रमात सगळ्या समाजाचे प्रतिबिंब, मंदिर, पाणवठे, स्मशान या ठिकाणी मुक्त प्रवेश असेल असा प्रयत्न झाला तर समरसता वाढीस लागेल.
यंदा आपल्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे त्या निमित्ताने स्वातंत्र्य याचा योग्य अर्थ आणि ‘स्व’तंत्र म्हणजे ‘स्व’ च्या आधारावर तंत्र विकसित करण्याची प्रक्रिया आणि अनुरूप कृती करता येईल का ? याचा विचार व्हावा .
या सर्व पार्श्वभूमीवर संघ कामाची गती वाढवणे. संघाच्या प्रार्थनेत म्हटल्याप्रमाणे परम् वैभवम् नेतुमेतत स्वराष्ट्रम् हे साध्य करण्यासाठी स्वयंसेवकांनी स्वतःहून स्वीकारलेला कण्ट काकीर्ण मार्ग, अजेय शक्ती – चारित्र्य – ज्ञान – वीरव्रत – अक्षय ध्येयनिष्ठा हे गुण अंगीकारून, स्वधर्माचे रक्षण करून विजयाशालिनी संघटितशक्तीच्या द्वारे साध्य करतील असा विश्वास वाटतो.