औदुंबर आणि अश्वत्थ
बालकवींचा औंदुंबर जसा सगळ्या महाराष्ट्राला परिचित आहे तसा गोविंदाग्रजांचा (राम गणेश गडकरी) पिंपळ परिचित आहे.
पुण्यातील कसबा पेठेतील ‘याज्ञवल्क्य आश्रमा’समोर हा पुराण अश्वत्थ होता. भोवती जडावलेला पार होता. त्यासमोर गडकरी मास्तर रहायचे. त्यांच्या घराच्या खिडकीतून तो पिंपळ दिसायचा.
त्याची सर्व रुपं मास्तरांनी डोळे भरून पाहिली असतील. त्याच्या पर्णांच्या प्रत्येक सळसळीचा अर्थ मास्तरांसारख्या कविह्रदयाच्या प्रतिभावान सारस्वताला कळला असेल. म्हणूनच त्यांना पिंपळपान ही सर्वपरिचित हळुवार कविता स्फुरली!
या पिंपळाच्या पारावर हुंदडण्यात माझी बालपणीची अनेक वर्षे गेली. समोरचे ‘येथे राम गणेश गडकरी रहात होते’ अशी पाटी असलेले घर जाता- येता दिसायचे.
कसबा सोडून आता चाळीस वर्षे लोटली आहेत. सगळा भूगोल बदललाय तिथला. दोन महिन्यापूर्वी कसब्यात जाण्याचा प्रसंग आला.
मुलीला बरोबर घेतलं. म्हटलं “चल, आज तुला एक तीर्थक्षेत्र दाखवणार आहे”.
आवर्जून याज्ञवल्क्य आश्रमात गेलो होतो. तो पिंपळ आणि त्या भोवतीचा पार अजून तसाच असल्याचे दिसले. पिंपळाच्या काही शाखा ढाळल्या होत्या पण बाकी सगळं तसंच होतं.
पारावर विसावलो आणि सवयीप्रमाणे ‘मराठी भाषेच्या शेक्सपियर’च्या घराकडे दृष्टी गेली. आणि हे काय, ते निळ्या रंगाचं लाकडी घर अदृष्य झालेलं! त्याजागी एक शिमिटाची अधुनिक वास्तू उभी राहिलेली दिसली.
मन हळवं झालं. हळहळलो ते पाहून. विषण्णपणे पारावर बसून राहिलो काही काळ. मी मुलीला मास्तरांचं घर अभिमानानं दाखवणार होतो. डोळ्याच्या कडा पाणावल्या किंचित. बाजूला बसलेल्या मुलीने विचारले, “काय झालं?” डोळ्यात काही गेलं का? गाँगल तरी घालायचा. किती प्रदूषण आहे गावात.”
मी तिला काय दाखवणार आता? माझं ‘ते तीर्थक्षेत्र’ उध्वस्त झालं होतं. भविष्यात त्याचा जीर्णोद्धारही होणार नव्हता कधीच!
पुण्यातली अशी अनेक तीर्थक्षेत्रं नगरविस्तारीकरणात काळाच्या उदरात गडप झाली आहेत आणि पुढेही होणार आहेत. नुकतीच वार्ता वाचली की आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वास्तव्य असलेले सदाशिव पेठेतील खजिना विहिरीजवळील नृसिंह मंदीर रस्ता रुंदिकरणात पाडले जाणार आहे म्हणे.
कालाय तस्मै नमः!
लेखक:- दिवाकर बुरसे, पुणे