सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवास
ओरोस, दि. २४ फेब्रुवारी – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगमन होणार आहे. कुडाळ येथे दि. २६ व २७ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गात मार्गदर्शन करण्यासाठी सरसंघचालक येथे पूर्णवेळ उपस्थित असणार आहेत.
कार्यकर्ता प्रशिक्षण हा संघाच्या कार्यपद्धतीचा एक अविभाज्य भाग आहे. संघाचे दैनंदिन काम व नैमित्तिक उपक्रमांच्या प्रभावी संचलनात या प्रशिक्षण सत्रांचे मोठे योगदान असते.
कोकण प्रांतातील संघचालक जबाबदारी भूषविणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे या निमित्ताने एकत्रीकरण होणार आहे. सरसंघचालकांव्यतिरिक्त संघाचे सह-सरकार्यवाह अरूणकुमार व महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात या राज्यांचा समावेश असलेल्या पश्चिम क्षेत्राचे संघचालक डॉ. जयंतीभाई भडेसिया हे देखील या प्रशिक्षण वर्गास मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असतील.
संघचालक हा संघाच्या कार्यकर्त्यांचा पालक कार्यकर्ता समजला जातो. तालुका, जिल्हा, विभाग अशा विविध स्तरांवरील कामात संघचालकांची महत्त्वाची भूमिका असते. बहुतेकदा समाजातील प्रतिष्ठित नागरिकांकडे हे दायित्व सोपविले जाते.