छत्रपती शिवाजीमहाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. स्वराज्य म्हणजे स्व:तचे राज्य! आपला धर्म,आपली भाषा,आपले लोक यांचा उत्कर्ष स्वराज्यात व्हावा,असा प्रयत्न शिवाजीमहाराजांनी केला. आपल्या राज्यात आपली भाषा हवी म्हणून महाराजांनी संस्कृत आणि मराठीभाषेला प्रोत्साहन दिले.
स्वराज्याची सुरुवात झाली.शिवाजीराजांच्या नावाचा शिक्का तयार झाला. मोर्तबही तयार झाली.शाहजीराजे आणि जिजाऊसाहेब यांच्या मुद्रा फारसीमध्ये असतांना शिवाजीराजांची मुद्रा मात्र संस्कृतमध्ये होती. ती सार्वभौमत्वाचे प्रतिक आहे.ही मुद्रा अशी होती-
प्रतिपच्चंद्रलेखेव
वर्धिष्णुर्विश्ववन्दिता l
साहसुनो : शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ll
या संस्कृत मुद्रेचा अर्थ असा “प्रतिपदेच्या चंद्राच्या कोरीप्रमाणे वाढत जाणारी ,विश्वाला वंद्य असणारी.शाहजीचा सुपुत्र शिवाजीची ही मुद्रा लोककल्याणासाठी शोभून दिसत आहे. या मुद्रेमध्ये शिवरायांचे ध्येय सामावलेले आहे. शिवरायांची मोर्तबही नम्र होती “मर्यादेयं विराजते” अशी. ही राजमुद्रा असलेले पहिले पत्र दि.28 जानेवारी ,1646 रोजीचे आहे.
संस्कृत भाषेविषयी राजांच्या मनात पहिल्यापासूनच प्रेमादर होता. त्यांनी संस्कृत भाषेला राजमुद्रेतील अक्षरे होण्याचा सन्मान दिला. पुढे राजांनी आपल्या पदरी श्रेष्ठ संस्कृत पंडित ठेवले.
वेद- उपनिषदांचे स्वर उमटले ते संस्कृतभाषेतच! रामायण,महाभारतासारख्या महाकाव्यांनी संस्कृतभाषेला समृध्द केले.नवरसयुक्त साहित्य याच भाषेत निर्माण झाले.पुढे कविंद्र परमानंद यांनी शिवरायांचे शिवभारत मांडले ते याच भाषेत.संस्कृत ही भारताची अस्मिता आहे,आणि अस्मिताची पूजा हे शिवरायांचे आणि त्यांच्या स्वराज्याचे व्रत होते.
हिंदुधर्मात देववाणी संस्कृतचे विशेष महत्व आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संस्कृत भाषेचा राजभाषेचा दर्जा द्यावा, अशी मागणी केली होती. (नॅशनल हेराल्ड, 11 सप्टेंबर ,1949)
दुर्देवाने आधुनिकता आणि इंग्रजीभाषेच्या अतिरेकी आग्रहामुळे आपण संस्कृत भाषेचे महत्व विसरत चाललो आहोत. संस्कृत पूजापाठ अथवा कर्मकांडाची भाषा नाही तर ती विज्ञानाचीही भाषा आहे. संगणकतज्ञांच्या मते संगणकासाठी संस्कृत ही उत्तम भाषा आहे.
संस्कृत ही भारताची ओळख आहे,म्हणून छत्रपती शिवरायांनी संस्कृतभाषेला उत्तेजन दिले.मराठीभाषेचा सन्मान केला,तोच वारसा आम्हाला चालवावा लागणार आहे. आम्ही 15 आॅगस्ट 1947 ला आम्ही स्वतंत्र झालो असले तरी आमच्या भाषेला आम्ही प्रतिष्ठित करत नाही ,तोपर्यंत या स्वातंत्र्याला काही अर्थ नाही.
✍🏻 - रवींद्र गणेश सासमकर