HinduismOpinion

भारतीय आरमाराचे जनक – छत्रपति शिवाजीमहाराज

छत्रपती शिवाजी जयंती विशेष माहिती श्रृंखला – 14

केवळ सह्याद्रीच्या दर्याखोर्यातच नव्हे, तर समुद्रातही शिवरायांनी स्वातंत्र्याचे वादळ आणले…कोकणवासीयांच्या मनात स्वाभिमानाची लाट निर्माण केली आणि सिंधुसागरात स्वतंत्र आरमाराची उभारणी केली.”ज्याचे आरमार,त्याचा समुद्र” या विचारांनुसार महाराजांनी मालवणमध्ये आरमाराचे केंद्र म्हणून भव्यदिव्य आणि बलाढ्य जलदूर्गाची निर्मिती केली. समुद्रात उभा असलेल्या या भक्कम जलदूर्गाने परकीय शत्रुच्या मनात धडकी भरवली.

प्राचीन काळी नौकानयनाचा उपयोग व्यापार आणि युद्धासाठी जात होता. चंद्रगुप्ताचे नौदल खाते अतिशय सुव्यवस्थित होते. त्यांचे युध्दासाठीही सुसज्ज नौदल होते.पण कालौघात समुद्रपर्यटन करणे म्हणजे पाप अशी घातक रुढी तयार झाली, पण देशाच्या सुरक्षेचा दुरदृष्टीने विचार करणार्या शिवाजीमहाराजांनी ही घातक रुढी समुद्रात बुडवून टाकली.

पंधराव्या-सोळाव्या शतकात निरनिराळ्या युरोपियन राजवटींनी व्यापाराच्या निमित्ताने कोकणात शिरकाव करून घेतला होता. व्यापारी बरोबरच सत्ता स्थापन करण्यासाठी महत्वाकांक्षा बाळगून इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज यांनी व्यापारासाठी आरमार बनवले होते. जंजिरेकर सिद्दी हा तर वेळोवेळी वेगवेगळ्या मुसलमानी सत्ताधा-याचा पाठिंबा घेऊन वाटेल तसा हैदोस घालत होता. कोकणच्या भूमीपुत्रांवर अत्याचार करत होता. मुलींचे अपहरण करुन त्यांना परदेशात नेऊन विकणे नित्याचे होऊन बसले होते.शेतकरी,सर्वसामान्य माणुस पिळवटून निघत होता….इस्लामी अत्याचाराने कोकणभूमीचे द्रौपदीप्रमाणे वस्त्रहरण होत होते. प्रजावत्सल शिवाजीमहाराजांना हे सहन होणे शक्यच नव्हते.

“ज्याचे आरमार ,त्याचा समुद्र” असे म्हणत महाराजांनी प्रबळ आरमाराचा पाया घातला. देशाची सागरी सीमा सुरक्षित करण्यासाठी या कठिण परिस्थितीत महाराजांनी एक अचुक निर्णय घेतला तो म्हणजे जलदुर्गांची उभारणी होय.

शिवाजी महाराजांनी कुरटे बेटावर किल्ले सिंधुदुर्गच्या पायाभरणीचा शुभारंभ वायरी मोरेश्वरवाडी येथील समुद्र किनारी असलेल्या मोरयाचा धोंडा येथे केला होता. २५ नोव्हेंबर १६६४ या पवित्र दिनी हा मंगल सोहळा श्रीगणेश पूजनाने पार पडला होता.
बांधकाम मोठ्या हौसेने, उमेदीने केले. पायाचे दगड शिशाच्या रसात बसविले! तीन हजार कामगार अहोरात्र मेहनत घेत होते. मदतीला म्हणून काही पोर्तुगीज इंजिनीयरही मुद्दाम मागवून घेतले होते.या कामावर महाराजांचे जातीने लक्ष होते. सागरी स्वराज्याच्या या मंगलकार्यात शत्रुने विघ्न आणू नये,यासाठी किनार्यावर मराठी फौज तैनात होती.

त्याकाळी पोर्तुगालचा राजा म्हणजे सातासमुद्राचा धनी मानला जात होता. सातासमुद्रावर पोर्तुगिजांची सत्ता होती. त्यामुळे जगभर समुद्री संचार करण्यासाठी पोर्तुगिजांचा परवाना अर्थात ‘कार्ताझ’ घ्यावा लागत असे.मुघल बादशाहाचीदेखील यातुन सुटका नव्हती.

महाराजांनी ‘ज्याचे आरमार ,त्याचा समुद्र’ हे सुत्र लक्षात घेऊन बलाढ्य मराठा आरमार उभे केले. पोर्तुगिज,सिद्दी आणि इंग्रज अशा जलचर राजवटींना पायबंद घातला. पाल,गुराब,गलबत अशा जहाजांची निर्मिती केली.

‘आपण जगातील सर्वश्रेष्ठ नाविक आहोत’ अशी घमेंड बाळगणार्या इंग्रजांचा छत्रपती शिवाजीमहाराजांनी समुद्रात दारुण पराभव करुन शेवटचा श्वास घेतला,हा इतिहास आहे.

“शिवाजीमहाराजांकडे आहेत तशी चपळ जहाजे आमच्याकडे नव्हती ,म्हणून आम्ही पराभुत झालो” अशी कबुली स्वत: इंग्रजानीच लिहून ठेवली आहे.

पुढे हिंदवी स्वराज्याच्या आरमाराचे नेतृत्व सरखेल कान्होजी आंग्रे यांनी केले. परकीयांना समुद्रावर संचार करण्यासाठी मराठ्यांचा दस्तक म्हणजे परवाना घ्यायला भाग पाडले.कान्होजी आंग्रे हे नाव ऐकताच परकीय अत्याचारी राजवटीचा थरकाप होत असे!! आपल्या अतुलनीय पराक्रमाने कान्होजींनी इतिहासाच्या पानावर अमिट ठसा उमटवला आहे.म्हणूनच त्यांना गौरवाने “समुद्रावरील शिवाजी” असे म्हटले जाते.

भारतीय आरमाराकडे दुर्लक्ष केले म्हणून आम्ही पुन्हा पारतंत्र्यात गेलो. म्हणून शिवाजीमहाराजांचा सागरी सुरक्षेचा विचार नेहमी लक्षात ठेवला पाहिजे.

  • रवींद्र गणेश सासमकर
Back to top button