Opinion

आपण वाचलेलं पुस्तक इतरांना सांगणं ही एक कला आहे

आपण वाचलेलं पुस्तक इतरांना सांगणं ही एक कला आहे.

प्रत्येक पुस्तकाशी आपलं नातं म्हटलं तर अगदी वैयक्तिक स्वरूपाचे असते. आपल्या हाताशी अशी काही पुस्तके आपण ती हवी तेंव्हा हवी तशी वाचत असतो. माझा पुस्तकांचा पसारा तसा घरभर पसरलेला. घरात वावरत असताना ती कधी केंव्हा कशी हातात येतील सांगता येत नाही. सकाळी बॅग भरताना हमखास काही पुस्तके असतात. त्यात काहींची अदलाबदल होत असते. ती सगळीच वाचून होतात अशी नाही. पण त्यांचाही प्रवास माझ्या बरोबर सुरु होतो. अगदी जवळच्या प्रवासातही ती हमखास बरोबर असतात.

पानापानाशी आपलं वाचता वाचता जोडणं याची मजा काही वेगळीच असते. म्हणूनच काही पुस्तके आपण वारंवार उघडून पाहत असतो, चाळत असतो, आपल्याला हवं ते वाचत असतो. पुस्तके सुरुवातीपासून शेवटपर्यंत चाळत जाणे काय किंवा अगदी शेवटच्या पानावरून पहिल्या पानापर्यंत येत राहणे यात एक आपण साधलेली तन्मयता असते म्हणा. बऱ्याचदा पुस्तक सुरुवातीला वाचत जातो. मग कधी तरी पुढचे वाचायचे राहून जाते. काही काही सहजपणे सलग वाचून होतात.

पुस्तके वाचण्याची पद्धती या प्रत्येकाने आपापली विकसित केलेली असतात. वेळ, दिवस असं काही जण ठरवून करतात. मला मात्र ते फारसं कधी जमलं नाही. ती नेहमीच बरोबर असल्यासारखी असतात. एखादे पुस्तक लगेच वाचून होतं. काही महिने आपली सोबत करत असतात. लहानपणी कुणी म्हटलं पुस्तक आपली जवळची मित्र असतात. किंवा वाचाल तर वाचाल. सुरुवातीला अनेक दिवस हे लक्षात यायचं नाही. पण जसं जसं वाचत गेलो ते पटायला लागलं. मग त्याचं रुपांतर म्हणून अनुभव समृद्ध होत गेला.

पुस्तक निवडणं हे कधी कधी माझ्यासाठी मोठं आव्हान होऊन बसते. तासनतास पुस्तक शोधण्यासाठी घालणं हा मला सर्वात आवडता विरंगुळा वाटतो. पुस्तकांबद्दल सांगणारी, बोलणारी माणसे किती किती आपल्याला भरभरून देत असतात. आपण वाचलेलं पुस्तक इतरांना सांगणं ही एक कला आहे. कधी भावविश्व, कधी विचारविश्व उलगडत पुस्तकांविषयी गप्पा सुरु होतात.

आमच्या पुण्याच्या विद्यार्थी परिषद कार्यालयात चांगल्या अक्षरात पुस्तकांची यादी लावलेली असायची. यादी होती त्यावेळेस त्यातली पुस्तके फारशी वाचली नाही. पण त्या वेळेस लक्षात राहिलेली पुस्तके पुढच्या आठ दहा वर्षात कधीतरी वाचण्यात आली. मग हे पुस्तक वाचलं का? असं सांगणारी अनेक माणसे भेटत गेली. वयाच्या खूप सुरुवातीला रशियन साहित्य जे मराठीत भाषांतर झालेलं असं माझ्या हातात गोष्टी स्वरुपात पडले.

वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्यालयात गेलो की बाळासाहेब दीक्षित बोलता बोलता सहज माझ्या हातात एखादे पुस्तक देतात आणि म्हणतात हे पान काढ आणि त्याच्या दुसऱ्या परिच्छेदापासून वाच. सुरुवातीला कंटाळा यायचा आणि मग नंतर मग वाचायला मजा येते. मी त्यांना हळूच विचारतो हे पुस्तक घेऊन जाऊ का? छानपैकी हसतात आणि होकार देतात. मी पुस्तक वाचायला मागितल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतो. आपण वाचता वाचता त्यात अजून कुणाला सामील करून घेणं याचाही आनंद वेगळाच. हल्ली एक पुस्तकाचा  माझ्या विद्यार्थ्यामध्ये एकाकडून दुसरीकडे प्रवास सुरु केला. त्याचा पाठपुरावा करणं एवढंच काम. हळूहळू साखळी तयार होईल. वेळ लागेल. पण एकविचाराचा, संस्काराचा, मनस्थितीचा एक समान धागा नक्की तयार होईल.

संजय साळवे
#तन्मात्र
#SanjaySalve

Back to top button