OpinionRSS

वाणीला लगाम हवा

प्रवीण तोगडियांविषयी सर्व प्रकारचा आदरभाव मनात ठेवूनही असे म्हणावे लागते की, प्रवीण, तुम्ही घसरला आहात, तुमची जीभ नको तेवढी सैल झालेली आहे. स्वयंसेवकत्त्वाच्या मर्यादांचे उल्लंघन तुम्ही केले आहे, हे चांगले नाही.

डॉ. मोहनजी भागवत यांचे ‘अखंड भारत’ यावरील वक्तव्य आजही बातम्यांसाठी गरमागरम चर्चेचा विषय झालेला आहे. एका अर्थाने हे चांगले आहे. सध्या महाराष्ट्रात राज ठाकरे, शरद पवार, जितेंद्र आव्हाड, देवेंद्र फडणवीस, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, लेखक लेन्स, या सर्व विषयावर रोजच काही ना काहीतरी चर्चा चालू राहते. आरोप-प्रत्यारोप, खुलासे, एकमेकांच्या बोलण्याची नक्कल, कुणाचा चेहरा नागासारखा दिसतो, तर दुसर्‍याचा चेहरा कोंबडीच्या पार्श्वभागासारखा दिसतो. कुणाला काय दिसतं हा ज्याच्या त्याच्या दृष्टीचा प्रश्न आहे. पण, आपल्याला जे दिसतं ते असं की, महाराष्ट्राच्या राजकारणाने अत्यंत खालची पातळी गाठली आहे. त्याला ‘हीन पातळी’ असे म्हणतात. म्हणून ज्यांना आपली अभिरुची बिघडू द्यायची नाही, त्यांनी या वक्तव्यांची फार चर्चा करू नये, अशा या वातावरणात अखंड भारताची चर्चा निदान काही वैचारिक आधारावर आणि ऐतिहासिक आधारावर होते आहे, तिचे आपण स्वागत केले पाहिजे.

नेहमीप्रमाणे अनेकांनी चर्चेला राजकीय रंग देण्याचा आपापल्या परिने प्रयत्न केला आहे. एखादा राजनेता म्हणतो की, ‘अखंड भारत नंतर करा, अगोदर काश्मिरी पंडितांना काश्मीरमध्ये सुरक्षित पाठवून द्या. त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था करा.’ तर एखादा म्हणतो की, ‘15 वर्षांत काय होईल ते होईल. पण, अगोदर मशिदीवरील भोंगे हटवा.’ दुसर्‍या कुणाला असे वाटते की, डॉ. मोहनजी भागवत यांनी सनातन धर्माचा विषय करून मुस्लीम धर्माला लक्ष्य केले आहे. अखंड भारत झाल्यास मुसलमानांची संख्या 45 कोटींच्या आसपास जाईल. भारतातील 15 कोटी मुसलमान ज्यांना सांभाळता येत नाही, ते 45 कोटी मुसलमानांना कसे सांभाळणार? असे प्रश्न अनेकांनी उपस्थित केले आहेत.

पाकिस्तान, नेपाळ, भारत, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान हे सर्व देश स्वतंत्र आणि स्वायत्त आहेत. त्यांना अखंड भारतात कसे सामावून घेणार? अखंड भारताच्या वक्तव्याचे आंतरराष्ट्रीय संबंधावर कोणते परिणाम होतील? याचीदेखील चर्चा काहीजणांनी सुरू केली. काहीजणांना असे वाटते की, पंतप्रधान संघ स्वयंसेवक आहेत आणि डॉ. मोहनजी भागवत संघाचे सरसंघचालक आहेत आणि त्यांचे वक्तव्य म्हणजे स्वयंसेवकाला दिलेला आदेश आहे. या आदेशाचे पालन स्वयंसेवक पंतप्रधान करतील का? कोण, कुठे आणि कसली चर्चा करेल, हे नाही सांगता येत. परंतु, या सर्व चर्चेला स्तर आहे. कुणीही एकमेकांवर व्यक्तिगत टीका करीत नाही किंवा दुसर्‍याची ‘मिमिक्री’ करीत नाही. त्या आपापल्या परिने काही युक्तिवाद करतात, तर्क मांडतात आणि त्या युक्तिवादात आणि तर्कात कसलेही तथ्य नाही, असे म्हणता येणार नाही.

या विवादात एकेकाळचे विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण तोगडियाही उतरले आहेत. ते म्हणतात, “आता तुमच्या स्वयंसेवकांचे सरकार आहे. त्यांच्याकडे 15 लाखांचे सैन्य आहे, तर आता करून दाखविण्याची वेळ आलीय. त्यामुळे आपलं स्वागत समर्थन करताना सात वर्षांपासून काश्मिरी हिंदूंना पुन्हा त्यांच्या मूळ घरी विस्थापित करण्यात आलेलं नाही, याची आठवण करून देत पुढील महिन्यात या हिंदूच त्यांच्या मूळ जागी विस्थापन करावं. त्यानंतर स्वतः त्यांनी काश्मिरी हिंदूंसोबत काश्मीरमधील गावात राहावं. हा अखंड भारताचा पहिला टप्पा असेल.”

प्रवीण तोगडिया आणखी पुढे म्हणतात, “पाकव्याप्त काश्मीरवर ताबा मिळवावा. तिथे डॉ. मोहनजी भागवत यांनी संघाची शाखा सुरू करावी. स्वयंसेवक म्हणून तिथे प्रवीण तोगडिया ‘नमस्ते सदा वस्तले’ म्हणायला येईल. रशिया-युक्रेनमध्ये घुसू शकतो, तर पाकव्याप्त काश्मीर तर आपल्या बापाचा आहे. तिसर्‍या टप्प्यात पाकिस्तानवर हल्ला करा. यावेळी डॉ. मोहनजी भागवत यांनी स्वतः टँकमध्ये बसून जावं. भागवत यांचा टँक जिथून जाईल त्या जागेची सफाई करण्याचं काम प्रवीण तोगडिया करेल.”
 
प्रवीण तोगडिया एकेकाळी संघाचे समर्पित, निष्ठावान, ध्येयनिष्ठ स्वयंसेवक होते. असे स्वयंसेवक एक अलिखित बंधन आपणहून पाळतात. ते म्हणजे, सरसंघचालकांच्या वक्तव्यावर कोणतीही जाहीर राजकीय टीका-टिप्पणी करायची नाही, ते पटलं नाहीतरी शांत बसायचं. आपले म्हणणे योग्य अधिकार्‍यांकडे व्यक्त करायचे किंवा पत्र लिहून आपले म्हणणे त्यांच्यापुढे मांडायचे. माझ्या संघ आयुष्यात मी हे काम अनेकवेळा केले आहे. सरसंघचालक हे तर श्रद्धेचे आणि संघनिष्ठेचे प्रतीक मानण्यात येते. सर्व स्वयंसेवक या पदाविषयी अत्यंत पूज्यभाव मनात ठेवून असतात. म्हणून संघात सरसंघचालकपदाचा उल्लेख करताना ‘परमपूजनीय सरसंघचालक’ असे म्हणण्याचा प्रघात आहे. प्रवीण तोगडियांविषयी सर्व प्रकारचा आदरभाव मनात ठेवूनही असे म्हणावे लागते की, प्रवीण, तुम्ही घसरला आहात, तुमची जीभ नको तेवढी सैल झालेली आहे. स्वयंसेवकत्त्वाच्या मर्यादांचे उल्लंघन तुम्ही केले आहे, हे चांगले नाही.

विश्व हिंदू परिषद तुम्हाला सोडावी लागली. ती का सोडावी लागली, याचे आत्मचिंतन तुम्ही करायला हवे होते, ते का केले नाही हा तुमचा प्रश्न. पण, एका बाजूला ‘नमस्ते सदा वत्सले’ मी तुमच्या बरोबर म्हणेल, त्यावरून मी संघ स्वयंसेवक आहे, हे व्यक्त करायचे आणि लगेचच तुम्ही टँकमध्ये बसून जावे, असे म्हणायचे हा उपरोध करण्याचे काही कारण नाही. तुमच्या सगळ्या वक्तव्यातून तुम्हाला हे म्हणायचे आहे की, डॉ. मोहनजी तुमचे वक्तव्य हास्यास्पद आहे. ते व्यवहारात आणण्याची तुमच्यात शक्ती नाही. ही नुसती शब्दवाफ आहे. परंतु, तुम्ही असे म्हणत नाही. तुम्हाला जे म्हणायचे आहे ते तुम्ही उपरोधिक शैलीत म्हणून दाखविले आहे.

तुम्ही जर स्वयंसेवकत्त्व सोडले असेल, तर असे म्हणण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. राहुल गांधी, गेहलोत, दिग्विजय सिंग इत्यादींच्या पंगतीत जाऊन बसण्याचा सन्मान तुम्हाला जर हवा असेल, तर तो नाकारणारे आम्ही कोण? एकदा स्वयंसेवकत्त्व सोडले की, सरसंघचालक काय किंवा शंकराचार्य काय, राष्ट्रपती काय की पंतप्रधान काय, सर्वच सारखे आणि मग प्रत्येकावर जे मनात येईल ते तोंडसुख घेण्याचा अनिर्बंध अधिकार प्राप्त होतो. पण, एका बाजूला ‘नमस्ते सदा वत्सले’ म्हणायचे आणि दुसर्‍या बाजूला सरसंघचालकांना लक्ष्य करायचे, ही तार्किक विसंगती आहे. ती आपण लवकरात लवकर दूर करावी.

तुमच्या रुपाने सरसंघचालकांवर तोंडसुख घेणारा आणखी एक वक्ता सापडला याचा आनंद सीताराम येचुरी आणि कंपनी, राहुल गांधी आणि दिग्विजय कंपनी, ओवेसी आणि कंपनी यांना नक्कीच झाला असेल. तुम्ही या सर्वांशी हातमिळविणी करण्यास काही हरकत नाही. भाषण स्वातंत्र्य आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा घटनेने दिलेला मूलभूत अधिकार आहे. उद्या वरील सर्वांनी जर परिषद भरविली आणि त्यात आपल्याला वक्ता म्हणून बोलवले, तर जायला काही हरकत नाही.

 
पण, एक स्वयंसेवक म्हणून आम्ही स्वयंसेवक मात्र तुमच्याकडे एकेकाळी आपला असलेला माणूस म्हणूनच पाहणार आहोत.
संघाची शिकवण अशी आहे की, जे आपल्यबरोबर आहेत ते आपलेच आहेत. आपल्याला सोडून गेलेलेही आपलेच आहेत आणि विरोधकही आपलेच आहेत. सगळेच आपले असल्यामुळे कुणाविषयी वैरभावना, द्वेषभावना स्वयंसेवक बाळगू शकत नाही. संघाचे मत असे आहे, काहीवेळेला ते माझ्या बुद्धीला पटत नाही, पण अनुशासनाचे पालन करून मी ते मतच पाळीन हा स्वयंसेवकाचा स्वभाव असतो. त्यामुळे तुमचे मत वेगळे असले तरीही कोणे एकेकाळी तुम्हीही आमच्यासारखे कट्टर निष्ठावंत होतात हे विसरता येणार नाही. म्हणून आपलेपणाचे नाते हे कायमच राहील. कुणी सांगावे आज न उद्या तुम्हीही शांत व्हाल आणि पुन्हा संघाच्या मूळ प्रवाहात आपण असलो पाहिजे, असे तुम्हाला वाटेल. आम्ही त्या क्षणाची वाट पाहतो आहोत.

-रमेश पतंगे (www.mahamtb.com)

सौजन्य : सा. विवेक

Back to top button