गंगापूर रोड इंडियात आहे आणि फुलेनगर भारतात आहे!
परवा फुलेनगर मध्ये स्वरूपवर्धिनीच्या एका सहज प्रकल्पाला भेट देण्याचे निमंत्रण मिळाले. हल्ली तसाही सेवावस्तीशी असलेला संपर्क आणि नातं तुटलंय. कधीतरी एखादा प्रसंग निमित्तमात्र होतो आणि त्या निमित्ताने जाणं होते. अनेक वेगवगेळ्या क्षेत्रातील कार्यकर्ते आपापल्या परीने सतत काम करीत असतात आणि त्यातून काही ना काही कानावर पडत असते. तीच काय शिदोरी. पाठक काका, योगेश, डॉ. खैरे ही सगळीच मंडळी सतत काही ना काही सेवा कार्यात जोडलेली आहेत. त्यातले कार्यक्रम कळत जातात. कधीतरी निमित्त म्हणून एखाद्या कार्यक्रमात मीही उपस्थित राहतो. पण त्याची वारंवारिता कमी असते. मनात जाणीव असते आणि खंतसुद्धा असते. कधीतरी याही विषयात आपण एक पाऊल पुढे टाकू असं वाटत होते. कुठल्या ना कुठल्या कारणाने ते जमलं नाही. मागे पडलं. असलेल्या जबाबदारीभोवती अधिक गुंफलो गेलो. कुणी ना कुणी आपल्याला साद घालतं आणि ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न करत राहते.
फुलेनगरला जाताना माझ्या छोट्या मुलीला मी विचारलं माझ्या सोबत येणार का? तसंही तिला माझ्यासोबत यायला आवडतं. मी तिला म्हटलं एक वेगळं जग पाहू. ती अवघी ८ वर्षाची तिने आपली मान डोलावली. गुगल मॅप लावला. तिला म्हटलं मला रस्ता सांग आपल्या घरापासून. तीही सरळ, उजवीकडे, डावीकडे असं सांगत राहिली. शेवटी ज्या ठिकाणी पोहचलो ती फुलेनगरची ५६ नंबरची शाळा. शेवटच्या बिंदुला शोधायला लागलं. गुगल मॅप शेवटी आजूबाजूच्या माणसांना पत्ता विचारायला तुम्हाला भाग पाडतो म्हणा.
तिच्या मनात कुतूहल होते आपण नेमकी कुठे आलो. मी तिला म्हटलं तुझ्यापेक्षा छोटी मुलं आहेत त्यांच्याशी गप्पा मारायला आलो आहोत. आजूबाजूला सांडपाणी, घरासमोर चाललेली धुणीभांडी, वेगेवेगळे खेळ खेळत असलेली मुलं. आपल्या दाराच्या पायरीवर गप्पा मारत असलेली बायाबापडी. चिंचोळा रस्ता. असललेला गोंगाट. ती पहात होती. मीही तोपर्यंत तिला सांगितलं आपण नेमकी कुठं आलो. खरं तर स्वरूपवर्धिनीचा पाच सहा दिवसाचा वर्ग चालू त्यातील विद्यार्थ्यांना मी भेटायला आलो होतो. प्रसन्नचित्ताने स्वामीजींनी स्वागत केले. मुलांशी ओळख करून दिली. त्यांनी मला मुलांशी संवाद साधायला सांगितला. मी डोक्यात पूर्वविचार फारसा केलेला नव्हता. सहज संपर्क म्हणून मी आलो होतो.
थोड्या वेळाने मुलं समोर बसली म्हणून मी त्यांना विचारलं कुणाची कविता पाठ आहे का? एक आत वर आला. म्हटलं म्हणून दाखव. त्यानेही त्याला पाठ असलेलं खड्या आवाजात म्हणून दाखवलं. अजून कुणी? असं विचारलं. मग मुलांनी थोडा वेळ घेतला. पुन्हा एक हात वर आला. त्याने सुद्धा छान कविता म्हटली. मग मी संवादाला सुरुवात करायची म्हणून एकेक नाव विचारायला लागलो. मग ओम माहित झाला. लखन, यश, यतीन, देविदास, नवनाथ, मयूर ही मुलं माहित झाली. सगळी नावं लक्षात नाही राहिली. कुणी, पाचवीत, कुणी सातवीत कुणी आठवी. काही त्याच शाळेत. काही वस्तीच्या आजूबाजूच्या शाळेतील मुलं.
सुट्टीत काय वाचलं विचारलं तर मुलं म्हणाली सुट्ट्या लागल्या म्हणून आणि मुलं पुढच्या वर्गात जाणार म्हणून शाळेने मागच्या वर्षाची पुस्तके जमा करून घेतली. आता शाळा सुरु झाली की मग पुढच्या वर्षीची पुस्तकं मिळणार. मग म्हटलं घरात काही पुस्तके आहेत का. एक दोन हात वर आले. गप्पा सुरु ठेवायच्या यासाठी किती जणांना चांगलं वाचता येतं. एकेक हात वर येत गेला. एकजण म्हणाला सर मी अडखळत वाचतो. १४ मुलं होती आणि त्यातल्या चार मुलांना वाचता येत होतं. सगळीच मुलं पाचवीच्या पुढे असणारी होती. मग त्यांनाच म्हटलं आता कसं करायचं. ४ मुलांना विचारलं बाकीच्यांना वाचता येईल याची जबाबदारी घ्याल का? मुलं मोठ्या उत्साहाने तयार झाली. प्रत्येकाला किमान दोन जणांना शिकवायला लागणार होतं. तेवढ्यात ओम म्हणाला मी तिघांची जबाबदारी घेतो.
सहवासाचा आणि संवादाचा कृतिरूप आनंद आणि समाधान असते. विक्रमजींनी मुलांसाठी वह्या आणलेल्या होत्या. त्यांना त्या वाटायच्या होत्या. मग त्या सगळ्या वह्या माझ्या हस्ते वाटण्यात आल्या होत्या. अशीच एक वही कधी काळी माझ्या हातात पडली होती. उसतोडणीच्या कामगारांच्या संगतीत असलेला मी लांडे गुरुजी मला शाळेत घरातून घेऊन आले होते. क्षणभरासाठी आठवलं. का कुणास ठाऊक मुलांच्या वहीवर आपण नाव टाकून देऊ यात. मग मुलं माझं आधी, माझं आधी असं करायला लागली. शेवटी मुलं प्रयत्नाने रांगेत उभी राहिली. मी एकेका वहीवर नाव टाकायला सुरुवात केली. मुलं हळूच म्हणाली सर तुमचं नाव पण याच वहीवर टाका.
हल्ली बौद्धिक म्हणून मोठ्या माणसात तात्विक बोलणं होत जाते. पण त्यात माणसांशी सहज संवाद असण्याचा आनंद हरवून जातो. मी समोर जे अनुभवत होतो ते निरामय आणि आनंददायी होतं. माझी मुलगी अवनी बारकाईने हे सगळं पाहत होती. तिच्याही मनात एक वेगळीच आंतरिक जाणीव होत होती आणि ते माझ्या लक्षात येत होतं. म्हटलं परतीच्या वाटेवर गप्पा मारू. बराच उशीर झाला होता. घरी कधी येणार असा फोन आलेला होता. अवनीला म्हटलं आता गुगल मॅप. आलेला रस्ता लक्षात आहे का? आता आपण घरापर्यंत कसं जायचं. मला म्हणाली मी सांगते रस्ता. ओळखीच्या रस्त्याला लागेपर्यंत तिला रस्ता लक्षात येत होता.
आमच्या गप्पा सुरु झाल्या. मला म्हणाली यालाच वेगळं जग म्हणायचं का? मी सावध झालो. हळूच म्हणालो वेगळं नाही आपलं च जग आहे. फक्त आपण ध्रुवनगर मध्ये राहतो ते फुलेनगरला. कधी संवादात शब्द सोपे करायला लागतात.
मीही मनात प्रश्चचिन्ह घेऊन निघालो होतो. अनेक वर्षांचा काळ कळतनकळत जोडू पाहत होता. व्रतस्थ काम करणाऱ्या कार्यकर्त्यांविषयी मनात अजून अधिक आदर वाटायला लागला. सेवावस्तीत काम करताना वागण्याबोलण्यात प्रसन्नतेचा दरवळ अनेकदा कार्यकर्त्यांचा जाणवत राहतो. सेवाभाव जपताना कुठेही उपकाराचा लवलेश नाही. आपण काही भलं मोठं सामाजिक काम करतो असा अविर्भाव नाही. संपर्कात सोबत असते. आणि ती प्रदीर्घ कालावधीसाठी असते. येता झगमगाट असलेला गंगापूर रोड लागला. गमतीने अवनीला म्हटलं हा गंगापूर रोड इंडियात आहे आणि फुलेनगर भारतात आहे. बिचारी फारसं लक्षात आलं नाही. मला म्हणाली तुम्ही त्यांना वह्या का दिल्या? त्यांचे आई वडील नाही देत का? ज्यांना वाचायला येत नाही आता त्यांना वाचायला कोण शिकवणार?
७५ वर्षाचा स्वातंत्र्याचा उपभोग घेणारी आपण शिकली सवरलेली माणसे आपल्या चार चाकीच्या खिडकीतून अजूनही समाज आपण पुस्तकातून, टीव्हीतून बघण्याचा प्रयत्न करतो हे मोठं दुर्दैव आहे. एकेक सेवा कार्यातील कार्यकर्ता आपापल्या परीने तपस्या करत राहतो त्याच्या पाठीशी सुद्धा पुरेसे पाठबळ उभे राहत नाही ही गोष्ट मोठी विषण्ण करणारी वाटत जाते. सत्तेचा आणि राजकारणाचा खेळ रोज हल्ली टीव्हीवर पहायला आरोप प्रत्यारोपातून पाहायला मिळत जातो. ही तर सामान्य माणसे आहेत. वर्ष उलटत जातात. समाजाचे मूळ प्रश्न विस्मरणात जात राहतात.
अवनी बरोबर परत येत असताना काही आगळ्या जाणिवेची सोबत घेऊन मी येत होतो. मीही अवनीला म्हणालो टीव्ही बाहेरही जग आहे आणि ते आपण पाहायला हवं.