
संभाजीनगर। सेवा करण्यासाठी नियोजनाची आवश्यकता नसते. नियोजन करून सेवा करता येत नाही. सेवा करण्यासाठी जे दुःख, वेदना डोळ्याने पाहिली आहे, ती हृदयात उतरावी लागते, तेव्हा सेवा करता येते. असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य मा. सुरेशजी उपाख्य भैय्याजी जोशी यांनी केले. ते संभाजीनगर शहरात सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ अंतर्गत रेडिओ देवगिरी 91.2 या रेडिओच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते.
भैय्याजी पुढे म्हणाले, आजचा डिजिटल युग असला तरी लोकांनी नभोवाणीला दूर केलेले नाही. प्रवासात, घरकाम करताना लोक सहज आनंद घेतात. शांत, संयमित व सत्यतेच्या निकषावर आधारित नभोवाणी आजही लोकांच्या जीवनाचा भाग आहे. रेडिओ देवगिरी हा कम्युनिटी रेडिओ प्रकार असल्यामुळे या भागातील कला, संस्कृती, लोक परंपरा, लोकांच्या गरजा, त्यांचे अंगभूत कौशल्य अश्या सर्व गोष्टींना एक हक्काचे व्यासपीठ मिळत आहे. लोक स्वतःहून रेडिओ देवगिरी ऐकण्यासाठी वेळापत्रक शोधतील, इथे भेट देतील अशी खात्री आपण बाळगू शकतो.
अनेकजण स्वतःचं गाणं वाजवण्यासाठी अश्या साधनांचा वापर करतात. परंतु लोकांना आवडेल, रुचेल असं चांगलं काय देता येईल असा विचार आपल्याला करावा लागेल. सावित्रीबाई महिला एकात्म समाज मंडळाविषयी बोलताना ते म्हणाले, या संस्थेचं काम फार जुनं आहे. दरवेळेस येतो तेव्हा नवीन काहीतरी बघायला मिळतं. समाजाप्रती संवेदना असणारे लोक या समूहात काम करतात. व्यक्तीला क्रियाशील करणारी संवेदना त्यांच्याकडे आहे, असे म्हणत त्यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.
‘सेवा’ विषयी बोलताना भैय्याजी म्हणाले, सेवा केवळ नियोजन करून नाही करता येत. त्यासाठी संवेदना आवश्यक असते. डोळ्याने पाहिलेलं हृदयात उतरतं, तेव्हा सेवा करता येते. आई आपल्या बाळाची सेवा करण्यासाठी किंवा मुलगा आपल्या आई वडिलांची सेवा करण्यासाठी नियोजन करत नाही. सेवा हा त्याचा सहज भाव असतो. त्यामागे संवेदना असते. तसेच, सेवेसाठी ‘धन’ लागत नाही तर ‘मन’ लागतं. ज्यांच्याकडे मन आहे ते नक्की सेवा करू शकतात, असेही ते म्हणाले.
भैयाजीनी समाजालाही आपल्या प्रतिभा उंचावण्यासाठी आवाहन केले. ते म्हणाले, आपल्या भारतीय समाजात प्रतिभा कमी नाहीत. परंतु, प्रतिभा असलेल्या लोकांना शोधून काम देणं गरजेचं आहे. प्रेम, स्नेह, आपुलकी यामुळे माणसाच्या आयुष्यात प्रकाश येऊ शकतो. हा प्रकाश अधिकाधिक लोकांच्या आयुष्यात आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. देवगिरी रेडिओ आणि सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ या संस्थेला केवळ भेट देऊ नका तर ते लोक काम कसे करतात हे जवळून बघा व आपल्यालाही काही वेळ देता येईल का असा प्रयत्न करा असे आवाहन त्यांनी समाजाला केले.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय राज्यमंत्री मा. डॉ. भागवत कराड, ज्येष्ठ उद्योजक मा. संजीवजी तांबोळकर उपस्थित होते.
– विश्व संवाद केंद्र, देवगिरी