टाकाऊ घनकचऱ्याला सौंदर्याचे वरदान देणारा अफलातून कलाकार

सर्जन हा निर्मितीचा गाभा आहे. त्याला सौंदर्यदृष्टीची जोड मिळाली तर विशेष अर्थही प्राप्त होतो. विकसनशील देशांमध्ये प्रगतीचा आलेख सतत उंचावत असतो. आर्थिक प्रगतीही होत असते. अशावेळी नवे गॅजेट्स, नव्या वस्तू, गरजेच्या किंवा सुशोभीकरणाच्या हव्याश्या वाटू लागतात. लहान मुलांना कसं नवं खेळणं मिळालं की जुनं कोपऱ्यात पडून राहतं, तसंच आपलंही असतं. मग वापरलेल्या जुन्या सामानापासून काय करता येऊ शकतं याची शक्कल लढवली जाते. अनेक ठिकाणी टाकाऊ लोखंडी सामानापासून कित्येक सुशोभीकरणाच्या वस्तू बनवल्या जातात. त्यासाठी लोणावळा आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेसारख्या अनेकांनी पुढाकार घेतलेला आहे.
लोणावळा येथे राहणारा धनंजय होन्नगी नावाचा कलाकार अशाच अप्रतिम कलाकृती बनवत असतो. केंद्र शासनामार्फत संपूर्ण देशभरात स्वच्छ भारत अभियान राबवण्यात येते. त्याचा वापर करून २०२२ पासून मीरारोड आणि भाईंदर शहरात स्वच्छता सर्वेक्षण मोहीम राबवण्यात येते. या मोहिमेअंतर्गत टाकाऊ लोखंडी वस्तूंपासून नवनिर्मिती करून अनेक सुशोभीकरणाच्या वस्तू बनविण्याचे पालिकेने ठरवले. त्यासाठी लोणावळ्यातील धनंजय होन्नगी यांना पाचारण केले. तसेच वस्तू बनवण्यासाठी नव्या कारखान्याचीही व्यवस्था केली. २०२२ पासून राबवण्यात आलेल्या मोहिमेत अनेक उपक्रम राबवण्यात महापालिका आयुक्त यांनी सुरुवात केली. त्यात टाकाऊ पासून टिकाऊ अशी एक योजना सुरु केली. या योजनेपाठी अत्यल्प खर्चात हे शक्य झाले आहे. रस्त्यांवर अनेक बेवारस तसेच गंजलेल्या अवस्थेतील मोटारसायकली आढळून येतात. तुटके पाईप, खराब झालेल्या हातगाड्या तसेच भंगारही आढळून येते. यापासून अनेक वेगळे आकार, पक्षी, प्राणी, विमाने असे बरेच काही बनवता येऊ शकते. भाईंदर पूर्वेकडील प्रमोद महाजन सभागृहात तात्पुरत्या स्वरूपाच्या या कारखान्याची स्थापना झाली. फ्लेमिंगो, मोर, बंदुकी, गोगलगाय, विमाने, मिसाईल, फुलपाखरे अशा विविध वस्तू या कारखान्यात धनंजयच्या कल्पक मेंदूतून आकार घेऊ लागल्या. गंजलेल्या लोखंडावर रंग चढू लागले आणि चौकाचौकात, दुभाजकांवर, तलावाकाठी, विजेच्या खांबांवर, उद्यानात, सेल्फी पॉइंटवर उत्साह संचारला.

असाच उपक्रम लोणावळा नगरपालिकेनेही हाती घेतला. डम्पिंग ग्राउंडवर मिळालेल्या भंगारापासून अशा सुशोभीकरणाच्या वस्तू बनविण्याचे योजले आणि स्थानिक कलाकार धनंजय होन्नगी त्याला पाचारण करण्यात आले. फुलपाखरू, गोगलगाय आणि पक्षांसोबतच विंचू, बगळे, बदक, रॉकेट, नांगर अश्या विविध क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वस्तूंची निर्मिती करण्यात आली. शहरात वेगवेगळ्या ६ भागांत या वस्तू उभारण्यात येणार होत्या. त्यासाठी धनंजय अथक परिश्रम करत होता. भारताच्या सीमेवर तैनात सैनिकांकडे आपले नकळत दुर्लक्ष होते. त्यांना मानवंदना देण्यासाठी तसेच त्यांचे नेहमी स्मरण होण्यासाठी लढाऊ विमाने, बंदुका यांची निर्मिती करावी अशी कल्पना धनंजय यांना सुचली. कचरा डेपोत टाकून दिलेले भंगार आणि प्लास्टिक, लोखंडी रॉड, पत्रा, बेअरिंग, अँगल, लाईट, खिळे, तारा, यांपासून कौशल्यपूर्ण आणि कल्पक वस्तूंची निर्मिती होऊ लागली. दरवाजाच्या कड्यांपासून विमानांची निर्मिती झाली तर बेअरिंग, अँगल, लाईट, खिळे, तारा, यांपासून विविध पक्षी व फुलपाखरे उडू लागली. ब्राम्होस चे हुबेहूब चित्रशिल्प बनवण्यात आले आहे. फायर फायटर मधील सिलेंडरचा वापर करून मिसाईल व विमानांची निर्मिती केली आहे. पाईप व पात्र यांचा वापर करून राफेल आणि मि२१ अशी लढाऊ विमाने बनवली आहेत. या ठिकाणांचा उपयोग पर्यटकांचे लक्ष वेधून घेण्यास होऊ शकतो.

या वस्तू पाहून आपल्या कल्पनाशक्तीला चालना मिळते. आपल्या घरातही टाकाऊ वस्तूंपासून आपणसुद्धा अशा प्रकारे काही सुंदर कलाकृती निर्माण करू शकतो. उद्योग, व्यवसाय या दृष्टीनेही ही कल्पना उत्तम आहे. माणसाचं मन बऱ्याच गोष्टीत गुंतलेलं असतं. लग्नात मिळालेली भांडी, घरात लेक कमावता झाल्यावर पहिल्यांदा घेतलेला पंखा, लग्न होणार आणि नवी सून घरात येणार म्हणून कौतुकाने बनवून घेतलेला लोखंडी पलंग, आजी आजोबा गेले तशी शेती बंद झाली पण शेतीची अवजारे अशी कोनाड्यात गंजत पडली असतात, तेव्हा त्या सगळ्या वस्तू नकोशा होतात पण त्यांचा मोह सोडवत नाही. अशावेळी घरात त्यांची अडगळ होते मग आऊटहाऊस किंवा स्टोर रूम मध्ये अशा आवडत्या कचऱ्याची गर्दी होते. या वस्तू ऊन पावसाने कितीही गंजून जीर्ण झाल्या तरी आपल्याला तो नात्यांच्या आठवणींचा वर्ख वाटतो. अशावेळी धनंजय सारख्या एखाद्या कुशल कारागिराला बोलावून आपण त्याची मदत घेऊ शकतो. आपल्या माणसांच्या आठवणी अशा आऊटहाऊस मध्ये पडून न राहता त्यांना आपण बैठकीच्या खोलीत मिरवू शकतो. नाहीतरी हल्ली सुशोभीकरणाच्या नावाखाली अँटिक दिवे आणि झुंबर आपण विकत घेतो ती आपल्याच जुन्या लाडक्या वस्तूंपासून बनवून घेतलेली केव्हाही उत्तम. आपल्या घरात आपल्या माणसांचा सहवास निरंतर लाभण्यासाठी हा पर्याय किती छान वाटतो! यातून आपल्या घराचे सुशोभीकरण होईल व कलाकारांना वाव मिळेल. तसेच रोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याला मर्यादा येतील व स्वच्छतेच्या दृष्टीने आपलीही काही मदत होऊ शकेल.
मृगा वर्तक
सौजन्य : साप्ताहिक विवेक