News

भारता सांगे ब्रह्मज्ञान जर्मनी मात्र कोरडे पाषाण

Alt News या माध्यमे आणि समाज माध्यमांमध्ये प्रसारित होणाऱ्या बातम्यांमधील सत्यासत्यता पडताळून (fact checking) पाहण्याचा दावा करणारी स्वयंसेवी संस्था आहे. तिचा सह संस्थापक, मोहम्मद झुबेर (@zoo_bear) हे उपद्रवी पात्र एव्हाना आपल्या सगळ्यांना ठाऊक झालेच आहे. या महाभागाने हिंदू समाजाच्या भावना दुखावतील अशी ट्विट्स करून समाजात विष कालवण्याचे पाप केले. भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या विधानाची सोयीस्कर मोडतोड करून भाजप व पर्यायाने मोदी सरकार विषयी जगभरात, विशेषतः आखाती देशातीळ मुस्लिम राष्ट्रांचे मत कलुषित करण्याचे पाप तर देशद्रोहच होता.

पराग नेरुरकर

देशद्रोहाचे पाप केले असेल तर त्याचे फळ मिळणारच. आणि त्यात केंद्रात मोदी सरकार नि गृह मंत्री अमित भाई शहा. दिल्ली पोलिसांनी झुबेरला अटक केली. पुढे न्यायालयाने त्याला जामीन दिला परंतु आता उत्तर प्रदेशात दाखल झालेल्या तक्रारी वरून योगी सरकारने झुबेरच्या चौकशीसाठी SIT नेमली आहे. यावरून झुबेरच्या गुन्ह्याचे गाम्भीर्य लक्षात येईल.

झुबेरची अटक व त्याच्यावरील कारवाई ही भारताच्या कायद्याच्या चौकटीत झालेली आहे. त्याला न्यायासनासमोर हजर देखील करण्यात आले. यात कुठेही केंद्राच्या मोदी सरकारने आततायीपणा केलेला नाही अथवा कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केलेले नाही.

मग नेमकी जर्मनीला झुबेरच्या अटकेची चिंता का वाटावी हे न उलगडणारे कोडे आहे.

आमचे जुबेरच्या केसवर बारीक लक्ष आहे, आम्ही युरोपियन युनियनच्या आमच्या सहकाऱ्यांशी या विषयावर संपर्कात आहोत, माध्यमांच्या स्वातंत्र्याचा मुद्दा भारताला देखील लागू होतो हा जर्मनीचा आगाऊपणा अनाकलनीय आहे.

भारताला माध्यमांच्या स्वातंत्र्याचे ज्ञानामृत पाजणाऱ्या जर्मनीने आपल्याच एका महिला पत्रकार ॲलिना लिप्प हिला युक्रेन विषयी सरकारच्या धोरणाविरुद्ध बातम्या दिल्याबद्दल तीन वर्षे तीन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. युक्रेन मध्ये तिने लष्करांकडून नागरिकांवर होणाऱ्या अत्याचारांना रशिया टेलिग्राम चॅनेलच्या माध्यमातून वाचा फोडली होती. विशेष म्हणजे ही शिक्षा तिला न्यायालयात तिची बाजू मांडून न देता सुनावण्यात आली आहे. रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाचे समर्थन केल्याचा तिच्यावर आरोप आहे. तसेच तुरुंगवास नको असेल तर आर्थिक दंड भरण्यात यावा १४०अशी तरतूद असलेल्या कलमाच्या आधारे ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. शिवाय तिची बँकेतील खाती देखील जर्मनीच्या सरकारने गोठवली आहेत.

आपल्या देशातील महिला पत्रकाराला तिच्या अनुपस्थितीत, तिला बचावाची संधीही न देता तुरुंगवासाची शिक्षा सुनावणाऱ्या जर्मनीने मुक्त पत्रकारितेचे ज्ञानामृत आपल्याकडेच ठेवावे.

उगाच भारताला मुक्त पत्रकारितेचे ज्ञानामृत पाजण्याच्या भानगडीत हा आंतरराष्ट्रीय राजकारणात अरे ला कारे करणारा नवा भारत, पलटवार करून जर्मनीच्याच घशात ते ज्ञानामृत ओतेल.

जर्मनीने आपली झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवावी हे उत्तम.

Back to top button