लोकमान्य टिळकांचा शिक्षण विचार
डॉ प्रशांत धर्माधिकारी
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक म्हणजे भारतभूला पडलेले एक सोनेरी स्वप्न होय.भारतीय विचार परंपरेचे साक्षेपी चिंतन,दुर्दम्य उत्साह ,जीवनाकडे पाहण्याची ऊर्जस्वल दृष्टी, प्रखर विद्वत्ता आणि देशप्रेम यांचा मुर्तीमंत आविष्कार म्हणजे लोकमान्य टिळक. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या भाषेत सांगायचे झाले तर , “टिळकांचे चरित्र म्हणजे विशाल द्रष्टेपणा व अदम्य कर्तेपणा यांचा भव्य संगम होय.टिळक चरित्र म्हणजे 1885 ते 1920पर्यंतच्या आधुनिक भारताच्या इतिहासाचा गाभा होय .ते एक प्रत्यक्षात घडलेले महाकाव्य आहे. हे महाकाव्य साहित्य रुपात प्रकट करणारा प्रतिभासंपन्न चरित्रकार मात्र अजून झाला नाही. परंपरागत अध्यात्मिक भारतीय संस्कृतीच्या कुशीत जन्मलेला व आधुनिक संस्कृतीच्या सिंहीनीच्या स्तनाचे सकस दूध प्राशन केलेला हा “बाळ”आहे. या दुधाची त्यांनी आपल्या लेखनात अनेकदा विशेष प्रशंसा केली आहे.पहिल्या विद्यार्थी दशेतील विचारांच्या उष:काळात त्यांना भारतीय भावी स्वराज्याचे दिव्य स्वप्न दिसले.ते स्वप्न प्रत्यक्ष सृष्टीत पाहण्याचा जो ध्यास लागला या ध्यासाने सर्व टिळक जीवन अखेरपर्यंत भरले गेले.लोकशाही स्वातंत्र्याच्या आंदोलनाचे भारतव्यापी अधिष्ठान निर्माण करणारे अग्रणी आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या कर्तृत्वाला सफल करणाऱ्या लोकशाही शक्तींना गांधींच्या पूर्वी जागृत करणारा दिव्य दिनमणी म्हणजे लोकमान्य टिळक होय.विद्यार्थी दशा संपल्यापासून अखेरपर्यंत सतत 45वर्षे एकाच ध्येयाच्या दिशेने सर्व प्रकारे वैचारिक व सांसारिक मोह टाळून सतत संग्रामस्थ राहणे हाच टिळकांच्या द्रष्टेपणाचा अस्सल निकष आहे.
टिळकांच्या एकूणच व्यक्तिमत्त्वाचे साकल्याने अध्ययन करण्यासाठी तेव्हा प्रचलित असलेल्या विचारधारा समजून घेणे अगत्याचे ठरते.सार्वजनिक जीवनात सर्वस्व अर्पण करण्याची मानसिक तयारी टिळकांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच केली होती.तेव्हा एकूण चार मतप्रवाह अस्तित्वात होते.त्यातील पहिला विचार प्रवाह ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीत दारिद्र्यात खितपत पडलेल्या व दुःख सहन करीत दिवस कंठणाऱ्या जनतेची केविलवाणी दशा पाहून सुशिक्षितांचा मूठभर गट उद्विग्न होऊन विचार करणाऱ्या लोकांचा होता. या गटाला असे वाटे कि या देशातील अधोगती इंग्रजांच्या परकीय राज्य सत्तेमुळे झाली असून यावर सशस्त्र क्रांतिवादी विचार हाच उपाय आहे.या गटात नेताजी सुभाष चंद्र बोस येतात.दुसरा मतप्रवाह असा होता की भारताच्या अधोगतीचे कारण भारताची परंपरावादी धार्मिक ,सामाजिक व सांस्कृतिक रचना जबाबदार आहेअसे माननाराचा.धर्मातील अंध रूढी,जातिभेद व त्यांना कारणीभूत असलेली अंधश्रद्धा नष्ट झाल्याशिवाय भारत नव्या राज्य पद्धतीस पात्र होणार नाही असे त्यांना वाटे.या विचारधारेचे लोक ब्रिटिश राज्यकर्त्यांना भारताच्या अवनतीचे कारण समजत नसत.या विचारधारेत राजा राम मोहन रॉय ,महात्मा ज्योतिराव फुले, लोकहितवादी ईश्वरचंद्र विद्यासागर ,डॉ रा गो भांडारकर ,रँग्लर परांजपे इत्यादिकांची गणना होते.तिसरा मतप्रवाह हा सामाजिक सुधारणा व राजकीय सुधारणा एकत्र व्हावयास पाहिजेत असा विचार मांडणारा होता.यामध्ये मुख्यत्वाने न्यायमूर्ती म गो रानडे ,गोपाळ गणेश आगरकर,गोपाळ कृष्ण गोखले इत्यादी नेमस्त राजकीय नेते होते.चौथा विचार प्रवाह म्हणजे परकीय राज्यसत्ता अधोगतीस मुख्यतः जबाबदार धरून राजकीय सुधारणेसाठी प्राधान्य देणे अधिक न्याय्य अधिक इष्ट अधिक शक्य आहे असे म्हणणाऱ्यांचा होता.त्यांचे सर्वश्रेष्ठ नेते म्हणजे लोकमान्य टिळक होत.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी म्हटल्याप्रमाणे टिळकांनी दुसऱ्या व तिसऱ्या विचार प्रवाहातील लोकांवर सडकून टीका केली आहे .त्यांच्या मते राजकीयदृष्ट्या मावळ अशा समाजसुधारकांमध्ये केवळ बोलके,अंगचुकार,संधीसाधू व ब्रिटिश सत्तेचे धार्जिण्या अट्टल स्वार्थी लोकांचा भरणा मोठा होता. लहान-मोठ्या ब्रिटिश सत्ताधीशांना खुश करू पाहणारे खूशमस्करी त्यात थोडे थोडके नव्हते. याच कचखाऊ सुधारणांमुळे सामाजिक सुधारणेच्या आंदोलन मागे पडले असे टिळकांनी लिहिलेआहे.टिळकांच्या या भूमिकेमुळे सशस्त्र क्रांती क्रांतिकारकांचा मोठा गट त्यांच्याकडे आकृष्ट झाला.ज्यामध्ये चाफेकर बंधू,स्वातंत्र्यवीर सावरकर इत्यादी क्रांतिकारक येतात.टिळकांचे संपूर्ण आकलन करण्यासाठी वरील चार मतप्रवाह समजून घेणे महत्त्वाचे ठरते .
प्रस्तुत लेखामध्ये टिळकांचे शिक्षण विषयक विचार समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.टिळकांच्या दृष्टिकोनातून पाश्चात्य शिक्षण व पारंपारिक भारतीय शिक्षण या दोन्ही गोष्टी महत्त्वाचा होत्या.लोकमान्य टिळकांनी दिलेल्या चतुसूत्री मध्ये राष्ट्रीय शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचे होते.कै.विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी आगरकर व टिळक यांच्या सहकार्याने राष्ट्रीय तेजस्वी शिक्षण देण्याकरिता खाजगी माध्यमिक शाळा स्थापन याचा उपक्रम केला.डेक्कन एज्युकेशन सोसायटी या उद्देशाने स्थापन झाली.
“पुनश्च हरिओम” या केसरीतील प्रसिद्ध लेखात टिळक म्हणतात की ‘ज्यावेळी हिंदुस्तानातील लोकांस कोणत्या प्रकारचे शिक्षण द्यावे या प्रश्नाची वाटाघाटी होऊन पाश्चिमात्य पद्धतीने इंग्रजी भाषेत शिक्षण द्यावे असा ठराव झाला, तेव्हा सदर ठराव करणाऱ्यांची बुद्धी हल्लीच्या लोर्ड कर्जन सारख्या अधिकार याप्रमाणे संकुचित नव्हती ही गोष्ट त्यांच्या तत्कालीन लेखावरून सिद्ध होत आहे. इंग्रजी इतिहास, इंग्रजी वाङ्मय, इंग्रजी शास्त्रे ,इंग्रजी हुन्नर वगैरे विद्या कोणाही विद्यार्थ्यांचे मन विकसित करून त्याच्या अंगात व मनात देशाभिमान वगैरे सद्गुन उत्पन्न करण्यास लायक आहेत याबद्दलही वाद नाही .बुद्धीची कुशाग्रता वाढविण्यास हिंदुस्थानातील न्याय ,व्याकरण आदी प्राचीन शास्त्र किती जरी उपयोगी असली तरी देशाभिमान, राज्यव्यवस्था ,राजनीति, देशाची नैतिक आणि सांपत्तिक अभिवृद्धी, राष्ट्र राष्ट्रांचा परस्पर संबंध वगैरे देशाचा उत्कर्ष होण्या विषयांचे ज्ञान लागते त्या विषयांचे शिक्षण या आमच्या जुन्या शाब्दिक शास्त्रांपासून मिळत नाही’.
वरील उदाहरणावरून असे दिसते की टिळकांनी इंग्रजी शिक्षणाचे जी स्तुती केली आहे या मताबद्दल पुढच्या काळात त्यांनी बराच बदल केला. टिळक म्हणतात की, ‘आरंभी तर कित्येक मुत्सद्द्यांनी असेही म्हटले होते की तुम्हास आम्ही जे इंग्रजी शिक्षण देत आहोत ते तुमच्या अंगी राज्य करण्याची योग्यता यावी म्हणून देत आहोत आणि ती आली म्हणजे आम्ही येथील आपले चंबु गबाळे आटपून प्रदेशात परत जाऊ .ज्या लोकांनी अशा हेतूने व बुद्धीने हिंदुस्थानातील लोकांना पाश्चिमात्य शिक्षण देण्याची सुरुवात केली त्यांच्या सद्हेतू ची आम्ही मोठ्या आनंदाने तारीफ करतो. परंतु दुःखाची गोष्ट ही की हा सद्हेतू, ही सद्बुद्धी किंवा वासना शेवटपर्यंत टिकली नाही.
टिळकांनी “खरे विद्यापीठ कोणते” या शीर्षकाचा 25 फेब्रुवारी 1896 रोजी एक अग्रलेख केसरीमध्ये लिहिला. या लेखामध्ये भारतात पन्नास वर्षापासून सुरु असलेल्या इंग्रजी शिक्षणाच्या फलश्रुती वरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. टिळकांच्या मते इंग्रज सरकारने लादलेले हे शिक्षण विशिष्ट दिशेने फलद्रूप होत नाही हे पाहून त्यांची फार निराशा झाली. टिळक लिहितात, ‘ नेमके जे घडायला पाहिजे ते घडत नाही असे दिसून आले .दुधाने ज्याप्रमाणे ताकाचे अनुकरण करावे त्याप्रमाणे युरोपियन विद्यापीठाचे आमच्या देशातील विद्यापीठे हे अनुकरण होय. या संस्था कशा असाव्यात ,तशा नसल्यामुळे कोणत्याही शास्त्राचा शोधक बुद्धीने आस्थापूर्वक अभ्यास करणारे गृहस्थ अलीकडे पैदा होत नाहीत. नवीन शोध करण्याइतकी बुद्धी अथवा योग्यता आमच्या अंगात नाही असे नाही .ज्या देशात पाणिनी, कणाद, शंकराचार्य, भास्कराचार्य वगैरे विद्वान पूर्वकाली होऊन गेले त्यात सध्या लुई पाश्चर, एडिसन, मिल वगैरे ग्रहस्थाप्रमाणे विद्वान का निपजु नयेत याचे खरे कारण शोधून काढून त्याचा प्रतिकार करणे हे प्रत्येक विद्या बुद्धी इच्छिणाऱ्या यांचे कर्तव्य आहे. सुधारलेल्या देशात विद्यापीठांची व्यवस्था गुरुंकडे असते. आयुष्य अध्ययन व अध्यापन यात ते घालवितात त्यामुळे विद्यार्थ्यांचे खरे गुण-दोष अथवा अडचणी त्यांना समजून येतात .गुरूंच्या विद्या अभ्यासाचा आणि सद्वर्तनाचा परिणाम त्यांच्या मनावर होण्यास गुरुजी खरोखर विद्या व्यसनी असून छात्रवासी वर्गाशी प्रेमभावाने वागणारे असले पाहिजेत. तसला प्रकार आमच्याकडे नाही. मुंबई विद्यापीठ1857 साली स्थापन झाले पण तेव्हापासून या संस्थेतून एकही जगप्रसिद्ध विद्वान निघू नये हे आश्चर्य नव्हे काय? तेलंग, रानडे, भांडारकर वगैरे काही विद्वान यापूर्वी निघाले आहेत. पण त्यापैकी काही इतर धंद्यात शिरल्यामुळे शास्त्र अभ्यासाच्या कामी त्यांचा जसा उपयोग व्हावा तसा झालेला नाही. तरी ते कायद्याच्या अभ्यासांत गडून गेले आहेत. पण त्याचा उपयोग काय? ज्याने समरांगणी अश्वारूढ होऊन दोन हात करावयाचे त्यांनी आपले कौशल्य घरात बायकोचा नथीतून तीर मारण्यात खर्च करावे तसा प्रस्तुतचा प्रकार आहे. आमच्या विद्यापीठात खरे विद्याव्यासंगी गुरु नाहीत. पदव्यांचे शिक्के ठोकण्यापलीकडे काही काम चालत नाही. विद्यापीठ परीक्षा घेणारी रजिस्टर्ड कंपनी झाली आहे असे म्हटले तरी चालेल.’
टिळकांनी वरील लेखात जो संदर्भ दिला आहे त्यातून इंग्रजी शिक्षणामुळे भारतीयांचे कुठलेही मूलगामी उत्थान झाले नाही. मात्र भारतीय विचार परंपरेने दिलेले साक्षेपी विचार नष्ट होऊन केवळ पोपटपंची करणारा व खर्डेघाशी करून इंग्रज सरकारला कारकुनी करण्यात मदत करणारा वर्ग प्रचलित शिक्षण व्यवस्थेत निर्माण होत होता याचा टिळकांनी खेद व्यक्त केला आहे. आज 2020 मध्ये देखील टिळकांनी विद्यापीठाला “परीक्षा घेणारी रजिस्टर्ड कंपनी” असे म्हटले आहे ते रास्त वाटते. टिळकांनीही केसरीमध्ये मांडलेले विचार हे ते इंग्रजांनी लादलेल्या शिक्षणाबद्दल होते. मात्र भारत स्वातंत्र्य झाल्यापासून जे शिक्षण सध्या भारतात प्रचलित आहे त्या शिक्षणाकडे पाहून देखील मागच्या शंभर वर्षात कुठलाही बदल झाला नाही असेच वाटते.
लोकमान्य टिळकांनी तत्कालीन इंग्रजी शिक्षणाची केलेली चिकित्सा ही आज सुद्धा आपल्याला डोळ्यात अंजन घालू शकते. “युनिव्हर्सिटी उर्फ सरकारी हमालखाने” हा 19 ऑगस्ट 1902 रोजी टिळकांनी लिहिलेला केसरी तील अग्रलेख विशेष विचारणीय आहे. त्यामध्ये टिळक असे म्हणतात की ‘इंग्रजी शिक्षण एकांगी आहे व ते फक्त सरकारी नोकरीत लागणारे अवश्य गुणच एतद्देशीय लोकांच्या अंगात आणण्याकरिता योजलेले आहे. या शिक्षणक्रमात तयार झालेल्या लोकांस धर्मनीती, शास्त्रीय शोध, धंदे शिक्षण वगैरे राष्ट्राचा उत्कर्ष अवश्य लागणाऱ्या ज्ञानाची व कलांची बिलकुल माहिती नसते. नोकरी मिळण्याचे प्रमाणही उत्तरोत्तर कमी होत गेल्यामुळे अधिकाराचा दुजोरा कमी होऊन इंग्रजी शिकलेल्या यांच्या ज्ञानाचा अपुरेपणा आणि कच्चेपणा अधिकाधिक उघडकीस येत चालला. सारांश आमच्या दृष्टीने पाहिले तर हल्ली चालू असलेल्या युनिव्हर्सिटीच्या शिक्षणात अनेक प्रकारचे फेरफार व्हावयास पाहिजेत, असे की ,जेणेकरून युनिव्हर्सिटी म्हणजे खरोखरीच विद्वत्तेची किंवा विद्वानांची माहेरघरे होतील.निरनिराळ्या विषयात निष्णात असलेल्या प्रोफेसरांच्या समुदाय, विद्यार्थ्यांच्या डोळ्यादेखत सतत चालू असलेला विद्याव्यासंग, मोठी मोठी पुस्तकालये किंवा यांत्रिक उपकरणे वगैरे ज्या संस्थेत नेहमी दृष्टीस पडतील अशा संस्था येथे निघाल्या पाहिजेत असे आमचे म्हणणे आहे . परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की युनिव्हर्सिट्या स्थापन होऊन आज पन्नास-साठ वर्षे झाले तरीही त्या तशा प्रकारची सुधारणा करण्याचे सरकारच्या मनात येत नाही. युनिव्हर्सिटी म्हणजे कनिष्ठ प्रतीच्या सरकारी नोकऱ्याकरिता लागणारे उमेदवार तयार करण्याचा टाकसाळे किंवा हमालखाने होत, असे शब्दांनी नाही तरी कृतीने तरी सरकार स्पष्ट दर्शवित आहे .हल्ली सरकारी कॉलेजातून तिसऱ्या-चौथ्या प्रतीच्या प्रोफेसरांचे भरताड भरले होते ते कमी करून त्याच्या ऐवजी खरोखरच पहिल्या प्रतीचे विद्वान प्रोफेसर आणण्याची सूचना कमिशनने करावयास पाहिजे होती. पण तशी किंवा त्या प्रकारची दुसरी कोणतीही सूचना हल्लीच्या रिपोर्टमध्ये आढळून येत नाही. चांगल्या लायब्ररी किंवा लॅबोरेटरी स्थापन कराव्या याबद्दल सूचना केलेली आहे, पण सरकार जोपर्यंत या कामाकडे सढळ हाताने पैसा खर्च करण्यास तयार नाही तोपर्यंत ही सूचना कशी अमलात यावी हे आम्हाला समजत नाही.
1904 साली मद्रासचे लॉर्ड बिशप यांनी भारतीय व जपानी लोकांमध्ये झालेल्या इंग्रजी शिक्षणाच्या प्रचाराचे प्रसाराचे मूल्यमापन करणारे भाषण दिले होते. या भाषणात बिशप यांनी भारतात इंग्रजी शिक्षणाची फलश्रुती व्यवस्थित झाली नाही याचे कारण मुळात भारतीयांच्या अवगुणांमुळे व त्यांच्यातील जातिभेदांमुळे हे झाले नाही असे म्हटले होते. या मुद्द्याला उत्तर देण्यासाठी 6 डिसेंबर 1904 रोजी “जपान आणि हिंदुस्थान” या शीर्षकाचा एक अग्रलेख टिळकांनी लिहिला व त्यामध्ये बिशप महाशयांच्या मतांचा खरपूस समाचार घेतला. टिळक म्हणतात, “रसायन शास्त्र, भूगर्भशास्त्र ,उद्योगधंदे किंवा नाना प्रकारच्या कला या शिकण्याकरिता दरवर्षी शेकडो विद्यार्थी जपानने ज्याप्रमाणे गेल्या तीस-चाळीस वर्षात परदेशात पाठविले तसे हिंदुस्थान सरकारने केले आहे काय? नाही म्हणायला आता कोठे दर इलाख्याला दोन स्कॉलरशिप ठेवलेल्या आहेत. पण देशाचे हे खरे हित जर करावयाचे होते तर यापूर्वी शेकडो हिंदी विद्यार्थी परदेशात पाठवावयास नको होते काय?
घरामध्ये शोभेसाठी किंवा चैनी करिता कुंडीतून लावलेल्या झाडांमध्ये आणि मोठ्या बागेत वाढणार्या झाडांमध्ये जे अंतर आहे तेच हिंदी आणि जपानी विद्यार्थ्यात दिसून येते. स्वतंत्रतेचे वारे मिळून गगनचुंबी वाढलेला मंदार वृक्ष कोणीकडे आणि मेघदूतात सांगितल्याप्रमाणे यक्षाच्या बायकोने आपल्या रत्नवापी जवळ कौतुकाने लावलेला “हस्तप्राप्य स्तबक नमितो बालमंदारवृक्ष:” बाल मंदार कुणीकडे. हिंदुस्थानातील युनिव्हर्सिटीतून किंवा इतर नोकरखाण्यातून जे विद्वान बाहेर पडतात ते या बाल मंदार वृक्षासारखे होत. ते गोंडस रहावे, त्यांची फळे पुष्पे युरोपियन अधिकारी वर्गास फार प्रयास न पडता खुडता यावी, अशा बेताबातानेच त्यांची वाढ होण्याबद्दल पहिल्यापासून खबरदारी घेण्यात येते . पाश्चिमात्य शिक्षणाने जपान इतका हिंदुस्तान सुधारला नाही हे तर निर्विवाद आहे. अर्थात त्याचा दोष कोणावर तरी लागला पाहिजे. राज्यकर्त्यांवर लादावा, तर ते पडले आपल्या जातीचे ,तेव्हा हिंदी लोकांवर दोषाची गोणी लादून बिशप साहेब मोकळे झाले आहेत . पण आम्ही त्यास सविनय असे कळवितो की ह्या त्यांच्या हातचलाखीने किंवा ‘अशुभवर्तमानाने’ फसून जाण्याइतके मूर्ख आता आम्ही राहिलो नाही. जपान चाळीस वर्षात पुढे येऊन पाश्चिमात्य राष्ट्रांच्या पंक्तीत बसले आणि आम्ही दरवर्षी अधिकाधिक हाताश, हतवीर्य आणि परकीयांची ओझी वाहणारे बनत चाललो याचा योग्य खुलासा जर कोणास पाहिजे असेल तर तो “स्वतंत्रता” या एकाच शब्दाने होईल.
टिळकांनी पुकारलेल्या “स्वदेशी” चळवळीकडे विद्यार्थी ओढले जात होते . 1905 सली डेक्कन कॉलेजचे प्रिन्सिपल मिस्टर सेलबी यांनी आपल्या एका जुन्या विद्यार्थ्यांचा विनंतीस मान देऊन जे पत्र पाठविले ते ‘इंदुप्रकाश’ या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले. या पत्रामध्ये सेल्बी यांनी स्वदेशी चळवळीमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊ नये अशी भूमिका व्यक्त केली होती. त्यावर टीका करणारा खणखणीत लेख ” हे आमचे गुरुजी नव्हेत क्रमांक 1″ या शीर्षकाचा 17 ऑक्टोबर 1905 रोजी केसरी मध्ये टिळकांनी प्रकाशित केला. त्यात टिळकांनी शिक्षण व्यवस्थेवर सडकून टीका केली आहे. टिळक लिहितात “आमच्या देशात सरकारने जी कॉलेजे व युनिव्हर्सिटी काढल्या आहेत त्यात सरस्वती देवीस राजसत्तेची दासी बनविली आहे, आणि लॉर्ड कर्जन साहेबांनी तर हे दास्यत्व चिरकाल कायम ठेवण्याचा बंदोबस्त केला आहे. पाश्चात्त्य देशात ज्या युनिव्हर्सिटी किंवा कॉलेज आहेत तेथे हे राष्ट्रीय विचारांची जशी चर्चा होते अथवा राष्ट्रास हिताच्या गोष्टी कोणत्या आणि अहिताच्या गोष्टी कोणत्या यांचा जसा निर्णय होतो, तसा इंग्रज सरकारने या देशात काढलेल्या कॉलेजातून किंवा युनिव्हर्सिटीतून होणे अशक्य आहे. आमच्या युनिव्हर्सिटी व कॉलेज म्हणजे सरकारच्या ताटाखालची मांजरे होत. किंबहुना प्रजेने कोणत्या स्थितीत राहावे,याबद्दल सरकारचे विचार असतील तेवढेच विद्यार्थ्यांच्या मनात बिंबवावे, यापेक्षा जास्त उदात्त विचारांचा त्यांच्या मनात विटाळ लागू नये , अशा प्रकारची खबरदारी सरकारी शाळांतून कॉलेजातून किंवा युनिव्हर्सिटी आतून घेतली जावी याबद्दल सरकारचा कटाक्ष आहे. लॉर्ड कर्झन यांच्या कारकिर्दीत या कटाचा अगदी कळस झाला आहे . हिंदुस्तानवर ज्या परकीय लोकांचा अंमल आहे त्यांच्या जातीचे हे शिक्षक असून, या राज्यकर्त्यांचे राजकीय धोरण शिक्षणाच्याद्वारे नवीन पिढीच्या मनात बिंबविण्याच्या करिता यांचा अवतार आहे. शेक्सपिअरची नाटके किंवा बेकनचे ग्रंथ शिकविण्यास, किंवा त्यांच्यावर नोट्स लिहून ही पुस्तके विद्यार्थ्यांकरिता प्रसिद्ध करण्यास हे लायक आहेत व तेवढ्यापुरती त्यांची योग्यता ओळखूनच आम्ही फीच्या रुपाने सरकारास त्याचा मोबदला देत असतो. पण राष्ट्रभक्ती, राष्ट्रहित, राजकीय चळवळ ,राजकीय उन्नतीचे प्रयत्न वगैरे बाबतीत यांचे मत घेणे म्हणजे उंदरांनी बोक्याचे मत घेण्यासारखेच आहे. प्राचीन काळी आर्यभूमीत जो गुरुला मान मिळत असे, त्या मानास पात्र होणारा गुरू निराळा, आणि आणि पैशाकरिता सरकारच्या धोरणाने शेक्सपिअर शिकविणारा हल्लीचा गुरु निराळा.
सेलबी साहेब म्हणतात की स्वदेशी चळवळ देशात हितकारक आहे पण विद्यार्थ्यांनी चळवळीत पडू नये.
या विधानावर टिळक म्हणतात की,
‘चेंबरलेनच्या चळवळीत ऑक्सफर्ड, केंब्रिज मधील विद्यार्थी पडले नाहीत काय? आमचे विद्या खाते जर स्वतंत्र असते व निसर्गतः त्या देशाचे हितचिंतक विद्वान प्रोफेसर त्यात असते, तर ते सुरेंद्रनाथ बॅनर्जी प्रमाणे स्वदेशी चळवळीवर व्याख्याने देण्यात गावोगाव फिरले असते.
सेल्बी साहेबां सारखे आमचे गुरुच नव्हेत. एबीसी शिकविण्याकरिता, इंग्रजी भाषा शिकविण्याकरिता, ऑफिसात खर्डेघाशी आम्हास शिकविण्याकरिता हे सरकारने नेमलेले नोकर होत. त्यांना जुन्या धर्मशास्त्रात सांगितलेल्या गुरु प्रमाणे मान देणे, म्हणजे नवसास पावणार्या म्हसोबास परब्रह्मपदास चढविणे होय! फी करिता , सरकारी पगारा करिता , इंग्रजी भाषा बोलण्याची लिहिण्याची कला शिकविणारे हे भाडोत्री कामगार आहेत.
रँग्लर परांजपे जेव्हा फर्ग्युसन कॉलेजात प्रिन्सिपल होते तेव्हा परकीय कपड्यांची होळी करण्याच्या कार्यक्रमात विनायक दामोदर सावरकर विद्यार्थी दशेत असताना सामील झाले होते. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल फर्ग्युसन कॉलेजच्या प्रिन्सिपॉल यांनी सावरकरांना दहा रुपये दंड भरून कॉलेजच्या बोर्डिंगमधून काढून टाकले. ही गोष्ट टिळकांना समजल्यास त्यांनी 24 ऑक्टोबर 1905 रोजी “हे आमचे गुरुच नव्हेत क्रमांक 2” या शीर्षकाचा अग्रलेख लिहिला. त्यामध्ये टिळक असे म्हणतात की,
“फर्ग्युसन कॉलेजातील एक विद्यार्थी स्वदेशी चळवळी संबंधाने भरलेल्या विद्यार्थ्यांच्या सभेत बोलला म्हणून सदर कॉलेजातील प्रिन्सिपॉल यांनी त्यास दहा रुपये दंड करून, सदर शाळेच्या बोर्डिंगातून त्यास काढून टाकले, हे पाहून कपाळास हात लावल्या खेरीज राहवत नाही. राष्ट्रीय चळवळीत नवीन पिढीने किती पडावे हे विद्यार्थ्यास शिकविण्यास आपले असले गुरु निरुपयोगी आहेत. कृष्ण भक्तीस लागलेल्या प्रल्हादाने ज्याप्रमाणे आपल्या बापाने नेमलेल्या गुरूचा उपदेश सदर कामापुरता झुगारून दिला; तसाच राष्ट्रीय चळवळीच्या कामी सरकारी कॉलेजातील गुरुंनी केलेला उपदेश क्षणभर आम्ही बाजूला ठेवला पाहिजे. शाळेच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थी म्हणून राजकीय चळवळीत पडू नये; मोठ्यांनी राजाचे नोकर म्हणून पडू नये; आणि म्हाताऱ्यांनी पेन्शनर म्हणून पडू नये; जन्मल्यापासून मरेपर्यंत चुकून एखादा मनुष्य गेल्यास जावा, बाकी सगळे चिरडून जाऊन जन्मल्यापासून मरेपर्यंत एक सारखे दास्यत्वात मुरले जावे, आणि एक पिढी अशी मुरली म्हणजे तिचे अनुवंशिक संस्कार दुसऱ्या पिढीत मिळून अशा रीतीने राष्ट्रभक्तीशून्य पुरुषांची सरकारी नोकरी करिता परंपरा तयार व्हावी”.
वर उल्लेख केलेल्या अनेक अग्रलेखातून लोकमान्य टिळकांना अपेक्षित असलेला शिक्षक व शिक्षण या दोन्ही संकल्पनांचा अंदाज मनाशी बांधता येतो. टिळकांच्या दृष्टिकोनातून शिक्षक हा तरुण पिढीला नीती, ज्ञान, विनय, शौर्य वगैरे गुणांनी संपन्न करून राष्ट्राचे काम अव्याहत सुरू ठेवतो व व्यावहारिक लोभापासून अलिप्त, शांत , ज्ञानसंपन्न, जितेंद्रियद, निस्पृह आणि सत्वशील असतो. अरण्यात वास करणाऱ्या अशा गुरुंच्या आश्रमात जे शिष्य काही वर्षे काढीत, त्यांच्यामध्ये अशा प्रकारच्या गुरुबद्दल किंवा आचार्य बद्दल स्वभावतः पूज्य बुद्धि उत्पन्न होत असे.
टिळकांच्या मते अशा गुरुंच्या आश्रमात शांतपणे , समृद्धीने, निर्लोभीपणाने आणि स्वतंत्र रीतीने विचार होत असे व त्यातून तेजस्वी व आपल्या कर्तव्यास जागणारी पिढी निर्माण होत असे . आपल्या गुरु समोर जर आपण एकदा प्रश्न मांडला तर त्याचे उत्तर राजापासून रंकापर्यंत कोणाचीही भीड न धरता गुरुजी निष्ठूरपणे सांगतील असा विश्वास विद्यार्थ्याला होता. टिळक म्हणत असत की धर्मशास्त्रात पित्यापेक्षा गुरूला अधिक मान द्यावा असे सांगितले आहे. मात्र ते गुरु ज्ञानसंपन्न निस्पृह व निर्मल अंतःकरणाचे असले पाहिजेत. टिळकांच्या दृष्टिकोनातून शिक्षण म्हणजे माणसाच्या सर्वांगीण विकासाला वाव देत देशाप्रती दुर्दम्य निष्ठा निर्माण करू शकणारे एक राष्ट्र उद्धाराचे साधन होय. व्यक्तीने केवळ स्वतःचा विचार न करता आपल्या सोबत समाजाचा व देशाचा विचार प्रामुख्याने करावा हा शिक्षणाचा खरा भाव आहे. टिळकांच्या स्मृती शताब्दी वर्षांमध्ये आपण जेव्हा त्यांच्या शैक्षणिक विचारांचे मूल्यमापन करतो तेव्हा, असे खेदाने म्हणावे लागते की आज देखील शिक्षण क्षेत्रात म्हणावे तेवढे बदल झाले नाहीत.
केवळ राजकीय अभिनिवेशाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणे हे आजचे शैक्षणिक वास्तव आहे. परीक्षेच्या निकालात होत असलेला विलंब, विद्वत्तेच्या क्षेत्रात होणारा ह्रास, शिक्षण क्षेत्रातील झालेला जातीय व पक्षीय राजकारणाचा शिरकाव, शिक्षणातील नावीन्यपूर्णतेचा अभाव, ज्ञानदानापेक्षा कागदी घोडे नाचवण्याची कला अवगत करणे व शिक्षणसंस्थांकडे आपली खाजगी मालमत्ता म्हणून पाहण्याची सरकारची दृष्टी हे आजचे शैक्षणिक वास्तव आहे.
टिळक म्हणतात त्याप्रमाणे, ‘विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन आपले काम भागले असे सुधारलेल्या राष्ट्रातील यूनिव्हर्सिटीस वाटत नाही. शास्त्रांचा अभ्यास उत्तरोत्तर वाढत जावा, व प्रत्येक शास्त्रात काही ना काहीतरी नवीन शोध व्हावा, या हेतूने त्या स्थापन झालेल्या असतात, व तो हेतू तडीस नेण्याकरिता, चांगल्या रीतीने निर्वाह चालेल असे वेतन देऊन, बरेच विद्वान गृहस्थ या युनिव्हर्सिटीतून, त्यांची योग्यता पाहून केवळ विद्यावृद्धि करण्याच्या इराद्याने ठेवलेले असतात . अशा प्रकारची विश्वविद्यालय असली म्हणजे शास्त्रास उत्तेजन येऊन विद्येची अभिवृद्धी कायमची होत असते’.
टिळकांनी जे अग्रलेख लिहिले ते इंग्रजांच्या परकीय शिक्षणानी हतबुद्ध झालेल्या पिढीकडे पाहून लिहिले. मात्र शिक्षणाचा हेतू काय? शिक्षण मिळाल्यानंतर त्याची फलश्रुती काय? व भारताला अधिकाधिक सर्वंकष प्रगत बनविण्यासाठी शिक्षणाचे उपाययोजन काय? या विषयांचा अभ्यास टिळकांच्या वरील विचारांच्या परिप्रेक्ष्यात नव्याने करावयास हवा अशी परिस्थिती सध्या उद्भवली आहे.
टिळकांच्या एकूण व्यासंगाचा पट आपल्यासमोर त्यांचा अग्रलेखातील संदर्भांवरून उभा राहतो.प्राचीन भारतीय विद्या, संस्कृत ,ज्योतिष शास्त्र, गणित, प्राच्यविद्या तसेच तेव्हा उपलब्ध असलेल्या सर्व ग्रंथांचे, परकीय अभ्यासकांचे व प्राच्यविद्या विशारदांचे लेखन टिळकांनी बारकाव्याने अभ्यासले होते. वाघिणीचे दूध असलेल्या इंग्रजी भाषेसोबतच भारतीय विचार परंपरांचा अत्यंत साक्षेपी विचार करून टिळकांनी ‘स्वदेशी’ व ‘राष्ट्रीय शिक्षण’ या अत्यंत महत्त्वाच्या विचारांकडे आपले लक्ष वेधले आहे. टिळकांचे विचार हे आज देखील तेवढेच उपयोगी व मार्गदर्शक ठरतात व आपल्याला ‘आत्मनिर्भर’ बनवण्यासाठी उपयुक्त ठरतात.