News

‘मासूम सवाल’ चित्रपटाच्या पोस्टरवर सॅनिटरी पॅडसोबत भगवान श्रीकृष्णाचा फोटो

दिग्दर्शकावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

गेल्या काही दिवसांपासून अनेक चित्रपटांच्या पोस्टरवरुन देशभरात वाद सुरु असल्याचे पाहायला मिळत आहेत. भारतीय चित्रपट निर्मात्या आणि दिग्दर्शक लिना मणीमेकल यांच्या ‘काली’ या माहितीपटाच्या पोस्टरवरून वाद झाला होता. या पोस्टरमधून कालीमातेचा अपमान झाल्याचा दावा अनेकांनी केला आहे. त्यानंतर आता आणखी एका चित्रपटाच्या पोस्टरवरुन नव्या वादाला तोंड फुटलं आहे. दिग्दर्शक संतोष उपाध्याय यांचा मासूम सवाल या चित्रपटाच्या पोस्टरवरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सॅनिटरी पॅडसोबत भगवान श्रीकृष्णाचा फोटो दाखवण्यात आला आहे. त्यामुळे या वादाला सुरुवात झाली आहे.

या चित्रपटाचे पोस्टर पाहून अनेक जण सोशल मीडियावर त्याला प्रचंड विरोध करत आहेत. काही नेटकऱ्यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि कलाकारांवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोपही केला आहे. हा चित्रपट उद्या (५ ऑगस्ट) प्रदर्शित होत आहे. मात्र त्याआधीच या पोस्टरवरुन नवा वाद रंगला आहे. नुकतंच याप्रकरणी दिग्दर्शक संतोष उपाध्याय आणि अभिनेत्री एकावली खन्ना यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नुकतंच एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री एकावली खन्ना म्हणाली, “या चित्रपटाचा उद्देश चुकीची विचारसरणी बदलणे आणि मासिक पाळीबद्दल लोकांना जागरुक करणं हा आहे. आजच्या काळात अंधश्रद्धेला काहीच जागा नाही. आपण अनेकदा या गोष्टींकडे फार चुकीच्या दृष्टीकोनातून बघतो, यामुळे ही समस्या निर्माण होते. हा चित्रपट पूर्णपणे मासिक पाळीवर आधारित आहे, त्यामुळे त्यात पॅड दाखवणे बंधनकारक आहे.”

“मी इतकंच बोलू शकते की आमच्या निर्मात्यांना किंवा दिग्दर्शकांना कोणाच्या भावना दुखवायच्या नव्हत्या. आपल्या समाजात लोकांचा याविषयी असलेला चुकीचा दृष्टीकोन बदलला पाहिजे, हाच यामागे विचार होता. आजच्या काळात अंधश्रद्धेला काहीच जागा नाही. महिलांवर ज्या काही पूर्वीपासून चुकीच्या प्रथा थांबवणे हाच यामागचा प्रयत्न आहे.” असेही एकावलीने सांगितले.

दिग्दर्शक संतोष उपाध्याय म्हणाले की, “या गोष्टींकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन हा चुकीचा आहे आणि त्यामुळे गैरसमज निर्माण होतात. या चित्रपटाचे कथानक हे संपूर्ण मासिक पाळी, श्रद्धा अंधश्रद्धा यावर आहे. त्यामुळे त्या पोस्टरवर सॅनिटरी पॅड दाखवणं गरजेचं होतं. पण काहींनी उगाचच चुकीचा गैरसमज निर्माण करत केलेल्या वादाने आमच्या चित्रपटावर परिणाम होताना दिसत आहे.”

दरम्यान मासूम सवाल हा चित्रपट येत्या ५ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर हा १८ जुलै रोजी प्रदर्शित झाला होता. यात एक लहान मुलगी अगदी लहानपणापासून कृष्णाच्या मूर्तीला आपल्या कायम जवळ ठेवत असते. कृष्णाला ती भाऊ मानत असते. थोडं मोठं झाल्यावर जेव्हा तिला मासिक पाळी येऊ लागले तेव्हा तिच्यापासून त्या कृष्णाच्या मूर्तीला दूर केलं जातं. दर महिन्यातील ४ ते ५ दिवस जेव्हा तिला पाळी येईल तेव्हा ती कृष्णापासून लांब राहिल, कारण ते अशुद्ध असतं. हे ऐकून ती मुलगी मात्र हैराण होते आणि याविरोधात ती कोर्टात पोहोचते.

त्यानंतर यावर खटला सुरु होतो. पाळी आली की स्त्री अशुद्ध कशी? असा तिचा प्रश्न समाजात मोठा गोंधळ निर्माण करतो. यात तिला कोण पाठिंबा देतं, कोण विरोध करतं यावर या चित्रपटाची कथा दाखवण्यात आली आहे.

Back to top button