…आणि आपण हल्दीघाटीचे युद्ध जिंकलो
आजच्याच दिवशी भारताने डॉ. माशेलकरांच्या नेतृत्वात अमेरिकेसोबतचं हळदीचं युद्ध जिंकलं होतं.
हळद त्वचा आणि आरोग्यासाठी गुणकारी हळद आहे एक आयुर्वेदिक औषध ही मसाल्यांच्या पदार्थांमधील एक प्रमुख घटक आहे. कारण हळदीशिवाय अनेक भारतीय पदार्थ तयारच होऊ शकत नाहीत. एवढंच नाही तर भारतीय आयुर्वेद शास्त्रातदेखील हळदीला अगदी महत्त्वाचं स्थान आहे. एखादी गंभीर जखम हळदीमुळे भरून निघू शकते तर हळदीचं दूध प्यायल्यामुळे सर्दी, खोकल्यासारखे आजार पटकन बरे होतात.
अनेक आरोग्य समस्या दूर करण्यासाठी हळद एक गुणकारी औषधदेखील आहे. हळदीचा लेप लावल्यामुळे तुमचं सौदर्य अधिक खुलून येतं आणि चेहरा उजळतो म्हणूनच अनेक सौंदर्य उपचारांमध्ये हळदीचा आवर्जून वापर केला जातो. भारतात मेघालय,तामिळनाडूतील सेलम आणि महाराष्ट्रातील सांगली येथे मोठ्या प्रमाणात हळदीचे उत्पादन होते. भारत सरकारने हळदीचे भौगोलिक वैशिष्ट्ये जपण्यासाठी त्याच्या संवर्धनासाठी जीआय GI-Tag (Geographical indication) देखील दिला आहे.
पण अशी आपल्या हक्काची हळद आपली नव्हती ! ती होती अमेरिकेची !!!
भारत राष्ट्राने जगाला योग्,आयुर्वेद,गणित,खगोलशास्त्र.. दिले ही यादी न संपणारी आहे पण त्यावर कधीही आपण आपला अधिकार गाजवला नाही. जे काही आमच्याकडे आहे ते संपूर्ण विश्वाचे आहे.’हे विश्वची माझे घर’ हीच आपली संस्कृती आहे. हळदीची निर्मिती हा शोध असू शकतो हे भारतीयांच्या ध्यानीमनी नव्हतं तेव्हाच अमेरिकेनं हळदीचं पेटंट आपल्या नावावर केलं होतं.हजारों वर्षांपासून भारतीय संस्कृतीशी एकरुप असणाऱ्या हळदीचे अधिकार हे आपल्याकडे नाहीत हे डॉ रघुनाथ माशेलकरांच्या लक्षात आलं. त्यांनी अमेरिकेविरोधात जोरदार प्रतिकार करण्यास सुरवात केली. ते युद्ध माशेलकर जिंकले व हळद पुर्णपणे भारतीयांच्या हक्कांची झाली. या घटनेनंतर इतिहासातील प्रसिद्ध हल्दीघाटच्या लढाईवरून माध्यमांनी अमेरीकेविरोधातील ही लढाई जिंकणाऱ्या माशेलकरांचं वर्णन ‘हल्दीघाटीचा योद्धा’ असं केलं होतं.
साल होतं १९९६.
भारतातील काही संशोधकांची टीम आयुर्वेदावर संशोधन करीत होती. संशोधन करता करता काही संदर्भ शोधताना या गटाच्या लक्षात आलेल्या एका गोष्टीने या गटाला आश्चर्याचा धक्काच बसला होता.अमेरिकेतील मिसिसिपी विद्यापीठातील वैद्यकशास्त्र केंद्रात संशोधनाचं काम करणाऱ्या सुमन दास आणि हरिहर कोहली या भारतीय वंशाच्या अमेरिकन शास्त्रज्ञांनी साधारणतः वर्षभरापूर्वी म्हणजे मार्च १९९५ साली हळदीच्या औषधी गुणधर्माच्या संशोधनाचा दावा करून अमेरिकेसाठी ते पेटंट मिळवलं होतं.पेटंट अधिकाऱ्याच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्या शास्त्रज्ञांनी हे पेटंट अमेरिकेला मिळवून दिलं होतं. याचा अर्थ असा होता की त्यांच्या परवानगीशिवाय कुणालाही हळदीच्या औषधी वापर करता येणार नव्हता. कुणाला जर तसा वापर करायचा असेल तर रॉयल्टी म्हणून मोठा पैसा त्यांना द्यावा लागणार होता.खरं तर हळद हे गुणकारी आहे हे आपल्याला कितीतरी वर्षापासूनच माहित होतं.
अमेरिकेने हळदीचं पेटंट मिळवल्याच ज्यावेळी भारतीय शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं त्यावेळी रघुनाथ माशेलकर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शास्त्रज्ञांच्या एका मोठ्या टीमने याविरोधात न्यायालयीन लढाई लढली आणि भारताचा हळदीवरचा दावा सादर केला. आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ या टीमने आयुर्वेदातील अनेक पुरावे सादर केले.शास्त्रज्ञांच्या साधारणतः १५ महिन्यांच्या लढाईला यश आलं आणि २३ ऑगस्ट १९९७ रोजी अमेरिकेतील पेटंट कार्यालयाने आपली चूक झाल्याचं मान्य करत अमेरिकेला देण्यात आलेलं पेटंट रद्द केलं.भारतासाठी हा मोठाच विजय होता. भारताच्या या विजयाचे हिरो होते डॉ रघुनाथ माशेलकर.
हा विजय इतका मोठा होता कि त्यानंतर इंटरनॅशनल आर्बिट्रेशन संघटनेने निसर्ग निर्मित(natural elements) वस्तूंवर पेटंट देता येणार नाही असे घोषित केले.खरोखर आपल्या संशोधकांनी कोणाचीही मदत न घेता,आपल्या संशोधनाच्या बळावर महासत्ता अमेरिकेचा पराभव केला. भारत राष्ट्र डॉ रघुनाथ माशेलकर आणि त्यांच्या टीमने केलेल्या अथक परिश्रमाचा सदैव ऋणी राहील. राष्ट्रविरोधी,व्यसनी फिल्मी हिरोंपेक्षा,राष्ट्रभक्त आणि देशासाठी अथक परिश्रम करणारे संशोधक आमचे खरे आदर्श आहेत.