News

वक्तव्ये दोन आशय मात्र एक

रा.स्व. संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांचे 9 ऑगस्ट रोजी नागपूर येथे भाषण झाले. भारताचे सरन्यायाधीश एन.व्ही. रामण्णा यांचे 11 ऑगस्ट रोजी दिल्लीत भाषण झाले. दोन्ही कार्यक्रमांचा एक समान विषय होता. नागपूरला सुनील किटकरू लिखित ‘वार्ता ईशान्य भारताची’ या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम होता आणि दिल्लीला ‘सुप्रीम कोर्ट केस प्री- 1969’ या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होता. मोहनजी भागवत एका स्वयंसेवी संघटनेच्या सर्वोच्च पदावर आहेत आणि रामण्णा न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पदावर आहेत.

श्रीप्रकाश मिश्रा
 
दोघांनीही आपल्या भाषणात ‘जनतेची कर्तव्ये’ या विषयाला स्पर्श केला. मोहनजी भागवत संघाच्या परिभाषेत बोलले आणि रामण्णा राज्यघटनेच्या परिभाषेत बोलले. दोघांची मांडणी वेगवेगळी असली, तरी दोघांच्या भाषणाचा आशय एकच होता. हे साम्य आनंद देणारे आहे. मोहनजी भागवत आपल्या भाषणात म्हणाले, “देश चालवायचे काम, कधी आज या ठेकेदाराला तर कधी त्या ठेकेदाराला दिले जाते. संघ लोकप्रिय झाला तर संघालासुद्धा हे काम द्यायला लोक मागेपुढे पाहणार नाहीत. पण संघ तो ठेका घेणार नाही. केव्हातरी समाजाला स्वावलंबी होऊन याचा विचार करावा लागेल, हा देश आम्ही चालवायचा आहे. हे सगळे आम्ही करायचे आहे. संघाने करायचे असे नाही…” देशापुढे अनेक आव्हाने उभी असतात. एक पक्ष, एक नेता या सगळ्या आव्हानांवर मात करू शकत नाही किंवा परिवर्तन घडवून आणू शकत नाही.
 
नेहमीप्रमाणे माध्यमांनी मोहनजींच्या भाषणावर राजकीय भाष्य करायला सुरुवात केली. ‘नरेंद्र मोदी आणि भाजपा देशापुढील सर्व आव्हानांवर मात करू शकत नाहीत किंवा परिवर्तन घडवून आणू शकत नाहीत’ असे भागवत यांना म्हणायचे आहे, हे माध्यमांनी सांगायला सुरुवात केली. चांगल्याही बोलण्याचा विपरीत अर्थ कसा करायचा, हे या माध्यमांकडून आपण शिकावे. खरे म्हणजे हे शिकण्यासारखे नाही, ही वाईट गोष्ट आहे. पण आपण ती लक्षात घ्यावी. नरेंद्र मोदी स्वयंसेवक आहेत आणि कोणताही स्वयंसेवक कधीही असे म्हणत नाही की, माझ्यामुळे अमुक अमुक संस्था चालू आहे किंवा चालू राहील. असो.

न्यायमूर्ती रामण्णा आपल्या भाषणात म्हणतात की, “देशातील मोजक्या नाागरिकांनाच आपल्या सांविधानिक अधिकाराची आणि कर्तव्याची माहिती असते. प्रत्येकाला आपले अधिकार आणि कर्तव्ये यांची माहिती असणे आवश्यक आहे. पाश्चात्त्य देशातील लहान मुलांनाही या गोष्टी माहीत असतात. जनतेला त्यांचे अधिकार आणि कर्तव्याची माहिती करून दिली पाहिजे.” त्यांच्या भाषणाचा हा थोडक्यात आशय आहे. यावर थोडे भाष्य करणे आवश्यक आहे.

संविधान नागरिकांकडून कोणत्या अपेक्षा करते? संविधान नागरिकांकडून कायद्याच्या पालनाची, राष्ट्रीय जबाबदारीची, सामाजिक बंधुभावाची, राष्ट्रीय ऐक्याची, कुणीही कुणाचे शोषण न करण्याची आणि घटनात्मक नीतीचे काटेकोर पालन करण्याची अपेक्षा करते. संविधान स्वत: काही बोलत नाही, म्हणजे संविधान ही कुणी व्यक्ती नाही अथवा कुणी राजनेता नाही. संविधान हे लिखित कलमांचे पुस्तक असते. त्यात राज्य कसे चालवायचे, कोणत्या नियमांनी चालवायचे, न्यायालयाने खटले कोणत्या नियमांच्या आधारे चालवायचे, विकासाच्या योजना करताना कोणती काळजी घ्यायची, इत्यादी गोष्टी आहेत.

 
सामान्य लोकांना या सर्वांची माहिती असणे गरजेचे आहे. जगातील सर्व संविधानतज्ज्ञ एक गोष्ट आवर्जून सांगतात, ती म्हणजे संविधानाचे अंतिम मायबाप सामान्य लोक असतात. आपल्या संविधानाच्या उद्देशिकेत ‘गणतंत्र’ (प्रजासत्ताक) असा शब्द आहे, इंग्लिशमध्ये त्याला रिपब्लिक म्हणतात. आधुनिक जगातील पहिले रिपब्लिक अमेरिकेने निर्माण केले. तेथील संविधानकार म्हणतात की, ‘रिपब्लिकचे म्हणजे गणतंत्राचे यश सामान्य माणसाच्या कर्तव्यभावनेवर आणि नीतिमत्तेवर अवलंबून आहे. राजेशाहीत लोक राजाची प्रजा असतात. गणतंत्रामध्ये लोक स्वत:च राजे असतात.’ हे वाक्य तसे ऐकायला खूप गोड वाटते. परंतु राजेपणाची असंख्य कर्तव्ये असतात. त्यांचे काटेकोर पालन करावे लागते.

मोहनजी भागवत जेव्हा म्हणतात की, समाजाने समस्यांचा आणि आव्हानांचा सामना करण्यासाठी स्वावलंबी झाले पाहिजे, म्हणजे आपली सामाजिक आणि राष्ट्रीय कर्तव्ये कोणती आहेत हे सामान्य माणसांनी जाणून घ्यायला पाहिजे, त्याप्रमाणे व्यवहार करायला पाहिजे. कोणताही नेता समाजाची निर्मिती करीत नाही, तर नेता समाजातून निर्माण होतो, असेही ते म्हणाले. याचा अर्थ असा होतो की, जसा समाज असेल तसे त्यांचे नेते तयार होतात. आपल्या समाजात काहीही कामधंदा न करता एखादा राजनेता कोट्यधीश कसा होतो? याचे उत्तर समाज त्याला सहन करतो म्हणून होतो. रामण्णा यांनी म्हटल्याप्रमाणे सामान्य माणसाने आपले अधिकार आणि कर्तव्ये ओळखली, तर त्यांचे राजकीय नेतेदेखील त्याच गुणवत्तेचे निर्माण होतील.

मोहनजी भागवत आणि न्यायमूर्ती एन.व्ही. रामण्णा वेगवेगळ्या क्षेत्रांतील माणसे आहेत, परंतु देशाच्या संदर्भातील त्यांचे चिंतन मूलभूत विषयांना स्पर्श करणारे आहे. दोघांच्याही भाषणातून एक समान बिंदू येतो, तो म्हणजे सामान्य माणूस. सामान्य माणूस जर अधिक प्रगल्भ झाला, तर देश संविधानाप्रमाणे आज आहे त्यापेक्षा अधिक उत्तम प्रकारे चालेल.

 
रामण्णा यांच्या भाषणाचे राजकीय अर्थ कुणी काढले नाहीत, हे आपले भाग्य. त्यांच्या भाषणात त्यांनी न वापरलेला परंतु आशयाच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय म्हणजे संविधान साक्षरतेचा आलेला आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांत संविधानाच्या संदर्भात साक्षरता निर्माण करण्यात आपण फार मोठी मजल मारली आहे असे म्हणता येत नाही. सामान्य माणसाला संविधान समजावून सांगण्याचा प्रयत्न कुणाकडून होताना दिसत नाही. शाळा-महाविद्यालयांत संविधान हा विषय असतो. आपली शिक्षणपद्धती प्रश्न आणि उत्तर यावर आधारित आहे, ती ज्ञानाधारित नाही. संविधान हा प्रश्नाची उत्तरे देण्याचा विषय नसून तो ज्ञान देण्याचा विषय आहे. आणि हे ज्ञान खूप कष्ट करून मिळवावे लागते. त्यासाठी संविधान कोणत्या तत्त्वावर उभे आहे, कोणत्या मूल्यांवर उभे आहे, संविधानाचा उत्तुंग ध्येयवाद कोणता आहे याचे खूप गहन चिंतन, मनन आणि विवरण करावे लागते. संविधानाचे कायदे सांगणे म्हणजे संविधान सांगणे नव्हे.
 
हे काम वेगळ्या प्रकारे संघ आपल्या क्षेत्रात करीत असतो. देशासाठी कसे जगायचे, प्रत्येक विषयात देशाचा विचार का आणि कसा करायचा हे संघ शिकवितो. मोहनजी भागवत आपल्या भाषणात म्हणाले, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शतकाकडे वाटचाल करीत असून, विपरीत परिस्थितीत सर्वांना जोडण्याचे काम सातत्याने करीत आला आहे. संघाला काही गोष्टींची जबाबदारी घ्यावी लागणार आहे. जबाबदारी घेणारा समर्थ समाज निर्माण झाला पाहिजे.” जबाबदारीची जाणीव करून देणारी, आशय मांडणारी ही दोन भाषणे नित्य चालणार्‍या राजकीय साठमारीत वेगळेपणामुळे उठून दिसणारी आहेत, हे निश्चित.

Back to top button