गोधनाच्या कृतज्ञतेचा सोहळा: बैलपोळा
साक्षात भगवान शंकराचे वाहन असलेल्या नंदीचा हा सण. आपल्या संस्कृतीमध्ये पर्यावरणाला अनन्य साधारण महत्व आहे. आमची संस्कृती विज्ञाननिष्ठ आहे याची प्रचिती आपल्या प्रत्येक सणांमधून अधोरेखित होते.
शेतीत कितीही यांत्रिकीकरण झाले तरी शेतीतील कामासाठी बैलाचे महत्व आजही कमी झालेले नाही. शेतकऱ्याच्या उत्पन्नात त्याच्या सचोटीइतकाच त्याच्या बैलांच्या कष्टाचा मोलाचा वाटा असतो. बैलांच्या या कष्टाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी “बैलपोळा” सण साजरा केला जातो.महाराष्ट्रातील काही भागात भाद्रपद पोळा साजरा केला जातो ज्याला “कारहूनी”म्हणतात. कर्नाटकातील शेतकरी जेष्ठ महिन्यात मूळ नक्षत्रावर बेंदूर सण साजरा करतात.
बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी बैलपोळा हा सण श्रावण अमावस्या दिवशी साजरा केला जातो. या दिवसाला पिठोरी अमावस्या देखील म्हणतात. पोळ्याच्या दिवशी वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला नांगरापासून आणि शेतीपासून आराम दिला जातो.या दिवशी बैलांचे कौतुक केलं जातं.पोळा सणाच्या आदल्या दिवशी बैलांना आवतण देण्यात येते.या दिवशी बैलांना नदीवर नेऊन उटणे लावून स्वच्छ आंघोळ घातली जाते. बैलांना विविध रंगांच्या वस्त्रांनी आणि दागदागिन्यांनी सजवले जाते.त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात. गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य दाखवतात. त्यांना सजवून त्यांची मिरवणूक देखील काढली जाते.
कशी झाली बैलपोळ्याला सुरवात,
बैलपोळ्याची सुरुवात कशी झाली असा प्रश्न अनेकांना पडला असेल. पुराणकाळात एके दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती कैलासावर सारीपाट खेळत होते. एका डावात भगवान शंकर विजयी झाले मात्र पार्वती मातेला तो डाव पटला नाही आणि दोघांमध्ये वाद सुरु झाला. तेव्हा भगवान शंकरांनी नंदीला कोण जिंकलं याबाबत विचारणा केली. नंदीनेही मग शंकर जिंकले असं सांगितलं. पार्वती मातेला त्यांच्या या उत्तराचा राग आला आणि त्यांनी मग नंदीला शाप दिला. मृत्यूलोकी तुझ्या मानेवर वजन ठेवून तुझ्याकडून मेहनतीची कामं करुन घेतली जातील असा शाप त्यांनी नंदीला दिला. काही काळाने आपला राग शांत झाल्यावर पार्वतीला आपली चूक उमगली आणि त्यांनी नंदीला वर्षातनं एक दिवस लोकं तुझी पूजा करतील असं सांगितलं आणि तेव्हापासून वर्षातनं एक दिवस बैलपोळा साजरा केला जातो.
आधुनिकीकरणाच्या युगात आज देखील शेती मोठ्या प्रमाणात बैलांवर अवलंबून आहे म्हणून एक दिवस ग्रामीण भागातील लोक पोळा साजरा करुन आपली कृतज्ञता व्यक्त करतात.पोळा हा सण मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागातही हा सण साजरा होतो. खिलार, अमृत महल,कृष्णा,कांकरेज बरगुर या बैलांच्या विशिष्ट जाती प्रसिद्ध आहेत. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात दर्श अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात पोळा सण साजरा केला जातो.
ग्लोबल वोर्मिंग,जमिनीचा होणारा ह्रास, घटलेली उत्पादन क्षमता,कमी होत चाललेला कस यावर उत्तर म्हणजे गोसंवर्धन.गोवंशाची सेवा आणि संवर्धन काळाची गरज आहे.गायी पासून मिळणारे,शेण ,गोमूत्र शेतीसाठी वरदान आहे.म्हणूनच गायीला कामधेनू म्हणतात. जगत पालकाने स्वतःस ‘गोपाल’ म्हटले याहून गायीची महती दुसरी काय असू शकते.