इंग्रजांचा कर्दनकाळ : राजे उमाजी नाईक
इंग्रजांना सलग १४ वर्षे सळो की पळो करून सोडणाऱ्या आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे कार्य आज अनेकांना माहित नाही. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील ते आद्य क्रांतिकारक होते. इंग्रजांच्या विरोधातील १८५७ चा उठाव हा पहिला स्वातंत्र्यासाठीचा उठाव म्हणून ओळखला जातो. परंतु या आधीदेखील भारतात इंग्रजांविरुद्ध लढा पुकारण्यात आला होता आणि तो लढा पुकारला होता उमाजी नाईक यांनी. त्यांचे हे कार्य त्यामुळे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते…
७ सप्टेंबर १७९१ हा या आद्य क्रांतिकारकाचा जन्मदिन. अठराव्या शतकाच्या प्रारंभी घडून आलेल्या रामोशांच्या उठावात उमाजी नाईक यांचे नेतृत्व महत्त्वाचे होते. इंग्रजांच्या सल्ल्यावरून १८०३ मध्ये दुसऱ्या बाजीरावाने पुरंदर किल्ला रामोशींच्या ताब्यातून काढून घेण्याचा प्रयत्न केला, यावेळी रामोशींनी कडाडून विरोध केला. त्यामुळे संतापलेल्या पेशव्यांनी रामोशी लोकांचे हक्क, वतने, जमिनी जप्त केल्या. उमाजींनी पेशव्यांच्या या अत्याचाराच्या विरुद्ध संघर्ष केला. महाराष्ट्राच्या मातीतील उमाजी नाईक हे देशातील पहिले वीर आहेत, ज्यांनी इंग्रजी सत्तेच्या मनात दहशत निर्माण केली.
उमाजी उत्तम संघटक होते. बरेचशे रामोशी त्यांना आपला नेता मानत होते. गरिबांना लुटणारे सावकार, वतनदार व जमीनदार यांना त्यांनी आपले लक्ष बनविले. त्यांनी श्रीमंतांकडून पैशाची लूट केली आणि त्या लुटीतून त्यांनी गरीब असहाय्य जनतेला मदत केली.
उमाजींविरुद्ध इंग्रज सरकारकडे तक्रारी वाढल्याने २८ ऑक्टोबर १८२६ रोजी इंग्रजांनी त्यांच्याविरुध्द पहिला जाहीरनामा काढला. यामध्ये उमाजी व त्यांचा साथीदार पांडूजी यांना पकडून देणाऱ्यांना १०० रु. चे बक्षीस जाहीर केले. तर दुसऱ्या जाहीरनाम्यात उमाजीला साथ देणाऱ्यांना ठार मारण्यात येईल, असे जाहीर केले. परिणामी उमाजींनी इंग्रजांविरुद्ध मोहीमच सुरू केली. भिवडी, किकवी, परिंचे, सासवड व जेजुरी भागात त्यांनी लुटालूट केली. त्यामुळे इंग्रज सरकारने उमाजींना पकडण्यासाठी स्वतंत्र घोडदळाची नियुक्ती केली व १५२ ठिकाणी चौक्या बसविल्या, परंतु उमाजी इंग्रजांच्या हाती सापडले नाहीत.
इंग्रजांनी पुन्हा एक जाहीरनामा काढून उमाजींना पकडण्याचे आवाहन केले. असे हे इंग्रज सरकारकडून उमाजींना पकडण्यासाठी जाहिरनाम्याचे सत्र सुरूच होते. यामध्ये जनतेला १८ व्या शतकात १२०० – ५००० असे पैशाचे आमिष दाखविले जात होते. जे लोक सरकारला मदत करणार नाहीत, त्यांना उमाजीचे साथीदार समजण्यात येईल असे घोषित करून इंग्रजांनी वेळोवेळी जनतेला वेठीस धरले. मात्र जनता नेहमीच उमाजींच्या बाजूने उभी राहिली. परिणामी इंग्रज उमाजींना पकडू शकले नाहीत.
इंग्रजांच्या विरोधात स्वातंत्र्याचा जाहीरनामा :
इंग्रजांनी उमाजींना पकडण्यासाठी ॲलेक्झांडर मॅकिंटॉश यांची नियुक्ती केली. पुण्याचा कलेक्टर जॉर्ज गिबर्न याने २६ जानेवारी १८३१ रोजी उमाजींविरुध्द जाहीरनामा काढून पुन्हा जनतेला पैशाचे आमिष दाखवले, तथापि उमाजींविरुद्ध कोणीही तक्रार केली नाही. त्यानंतर उमाजींनी इंग्रजांच्या विरोधात आपला जाहीरनामा काढला (१६ फेब्रुवारी १८३१). हा जाहीरनामा ‘स्वातंत्र्याचा जाहीरनामा’ म्हणून देखील ओळखला जातो. यामध्ये त्यांनी “दिसेल त्या यूरोपियनला ठार मारावे, ज्या रयतेची वतने व तनखे इंग्रजांनी बंद केली आहेत, त्यांनी उमाजीच्या सरकारला पाठिंबा द्यावा, त्यांची वतने व तनखे आपण त्यांना परत मिळवून देऊ. कंपनी सरकारच्या पायदळात व घोडदळात असणाऱ्या शिपायांनी कंपनीचे हुकूम धुडकावून लावावेत, अन्यथा आपल्या सरकारची शिक्षा भोगण्यास तयार राहावे व कोणत्याही गावाने इंग्रजांना महसूल देऊ नये, नाहीतर त्या गावांचा विध्वंस केला जाईल” असा इशारा उमाजींनी दिला होता.
स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यात एक राष्ट्र ही संकल्पना –
उमाजींनी आपण सर्व हिंदुस्थानासाठी हा जाहीरनामा काढला आहे, असा उल्लेख केला होता. संपूर्ण भारत एक देश अथवा एक राष्ट्र ही संकल्पना यामध्ये दिसून येते. तसेच यामध्ये हिंदू-मुसलमान राजे, सरदार, जमीनदार, वतनदार, सामान्य रयतेचा समावेश होता.
उमाजींचे साथीदार आमिषाला बळी ;
उमाजी व त्यांच्या साथीदारांनी कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे व मराठवाड्यात अक्षरश: धुमाकूळ घातला. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अनेक इंग्रज अधिकारी नेमले गेले. ८ ऑगस्ट १८३१ रोजी इंग्रजांनी आणखी एक जाहीरनामा काढून उमाजींना पकडून देणाऱ्यास १०,००० रु. बक्षीस व ४०० बिघे जमीन देण्याचे जाहीर केले. या आमिषाला उमाजीचे दोन साथीदार काळू व नाना हे बळी पडले. त्यांनी उमाजींना १५ डिसेंबर १८३१ रोजी स्वत: पकडून इंग्रजांच्या स्वाधीन केले. त्यानंतर इंग्रजांनी उमाजींना पुणे येथे ३ फेब्रुवारी १८३४ रोजी फाशी देण्यात आली. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रातील इंग्रज सत्तेच्या विरोधात तळागाळातील लोकांकडून घडून आलेला हा पहिला क्रांतिकारी प्रयत्न होता.
इंग्रज अधिकाऱ्यांकडून उमाजींच्या शौर्याचे कौतुक :
उमाजी नाईक यांची हीच शौर्यगाथा त्यांना आद्य क्रांतीकारकाची उपाधी देऊन गेली. खुद्द इंग्रज अधिकारीही त्यांच्या शौर्याचे कौतुक करून गेले आहेत. इंग्रज अधिकारी रॉबर्ट याने १८२० ला ईस्ट इंडिया कंपनीला लिहिताना म्हटले आहे –
उमाजीचा रामोशी समाज इंग्रजांविरुद्ध तिरस्काराने पेटला असून तो कोणत्या तरी राजकीय बदलाची वाट पाहत आहे. जनता त्यांना मदत करत असून कोणी सांगावे हा उमाजी राजा होऊन छत्रपती शिवाजीसारखे राज्य स्थापणार नाही?
तर उमाजींना पकडणारा मॉकिन टॉस म्हणतो –
उमाजींपुढे छत्रपती शिवरायांचा आदर्श होता. त्यांना फाशी दिली नसती तर तो दुसरा शिवाजी झाला असता.
उमाजींना अवघे ४१ वर्षांचे आयुष्य लाभले. त्यातील ११ वर्षांचा कालावधी हा त्यांच्या जीवन संघर्षाचा महत्वपूर्ण काळ ठरला. या काळात उमाजी नाईक हे इंग्रज सरकारला गर्दनकाळ ठरले. त्यामुळे कमी कालावधीत स्वातंत्र्यासाठी केलेला हा उमाजींनी संघर्ष इतिहासातील काळ्या दगडावरची रेघ आहे.