Opinion

शाळा म्हणजेच सरस्वतीचा दरबार – सावित्रीबाई फुले

सावित्रीबाईंचा फोटो लावण्यासाठी,ज्ञानाची देवता असलेल्या सरस्वती मातेचा फोटो काढण्याची गरजच काय ?

{महाराष्ट्रातील एका माजी मंत्र्याने “शाळेत सरस्वतीचा फोटो कशाला लावता? फुले-शाहु-आंबेडकरांचे फोटो लावा आणि सरस्वतीने फक्त 3% लोकांना शिकवले” असे हिंदुद्वेषाचे फुत्कार काढले आहेत.}

सभ्य समाजाचे निर्माण त्या देशातील शिक्षित नागरिकांमुळे होते. असे म्हटले जाते की एका पुरुषाला शिक्षित केल्याने एकच व्यक्ती शिक्षित होतो आणि एका स्त्री ला शिक्षित केल्याने संपूर्ण कुटुंब शिक्षित होते. स्त्री कुटुंबाचा केंद्रबिंदू असते,आईच्या रूपात आपल्या मुलांना संस्कार,नीती,न्याय,धर्म यांची शिकवण देत असते. देशाच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी पुरुषांसोबत स्त्रियांनाही शिक्षित करायलाच हवे. भारतात आज विशेष करून शहरी भागात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत. शिक्षण आयुष्यात खूप महत्त्वाचे आहे. शिक्षणाने बुद्धीचा विकास होतो आणि सोबतच ज्ञान देखील वाढते. खरे पाहता शिक्षण हेच मुर्खाला विद्वान बनवते.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (savitribai phule) यांचे सरस्वती या विद्येच्या देवतेबद्दल काय विचार होते ते पाहूया,

शिक्षिका, लेखिका, कवियित्री, माता, समाजसेविका अशा विविध भूमिकेतून सावित्रीबाईंनी समाजातील गोरगरीब, दुर्बल घटकांची सेवा करण्यात आपले सारं आयुष्य पणाला लावलं. समाजातलं स्त्रीदास्यत्व मिटविण्यासाठी स्त्रियांनी शिकून सवरुन स्वावलंबी बनावं, म्हणजे त्यांना आपल्या खर्‍या शक्तीची ओळख होऊन पुरुषप्रधान समाजाची गुलामगिरी पत्करण्याची वेळ येणार नाही, असं ठाम मत त्यांनी स्त्रियांपुढे मांडलं.

स्त्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या सावित्रीबाई फुले. त्यांचा स्त्रीशिक्षणाचा विचार अनुकरणात आणण्यापेक्षा काही लोकांना सावित्रीबाई फुले यांचे नाव घेणे म्हणजे विद्येची देवी सरस्वतीवर टीका करण्याची संधी याचा असूरी आनंद जास्त असतो.सावित्रीबाई फुले यांचे श्री सरस्वतीबद्दल विचार काय होते? याबाबत तथाकथित पुरोगाम्यांनी काहीही वाचलेले दिसत नाही. स्वत: सावित्रीबाईच शाळेला “सरस्वतीचा दरबार” म्हणत असत.श्री शंकरपार्वती यांच्याबद्दल सावित्रीबाईंना विलक्षण आदर होता. त्यांच्या “काव्यफुले” या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर शंकर आणि पार्वतींचे चित्र होते.भगवान शंकरांवर त्यांनी कविताही केलेली आहे.कुठल्याही कार्यक्रमात सावित्रीबाई फुले यांचे विचार आणि कर्तृत्व यांचे स्मरण करण्याऐवजी पुरोगाम्यांना असे कार्यक्रम म्हणजे हिंदु देवीदेवतांवर टीका करण्याची संधी हाच अर्थ अभिप्रेत असावा.

सावित्रीबाईंचा फोटो लावण्यासाठी,ज्ञानाची देवता असलेल्या सरस्वती मातेचा फोटो काढण्याची गरजच काय ? दोघांचे फोटो शेजारी लावा असे ते म्हणू शकले असते. पण त्यांच्या मनातला हिंदू द्वेष उफाळून आला असावा.

समाजाने अशा भ्रामक लोकांपासून सावध राहिले पाहिजे. यांना सावित्रीबाई फुले यांचे नाव घेण्याचा कवडीचाही आधिकार नाही. राष्ट्रीयता,एकात्मता या विचारातून प्रेरणा घेत देशभरात समाजव्रतींनी उपेक्षित,वंचित आणि स्त्रीयांसाठी शेकडो प्रकल्प आणि सेवा कार्य उभे केले आहे ,हीच वास्तविक सावित्रीबाईंची कृतीरुप स्मारके आहेत. हजारो एकल विद्यालये,यमगरवाडी शाळा, पुनरुत्थान समरसता गुरुकुलम , महाराष्ट्रभर सुरु असणार्या पालावरची शाळा ही त्यांची उदाहरणे आहेत. सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाची असंख्य सेवाकार्य ही सावित्रीमाईंच्या विचारांचाच वारसा चालवत आहेत.ज्योतीरावांच्या समता, सत्यपरायणता, मानवतावाद या तत्त्वांचा अंगिकार करुन सावित्रीबाईंनी आपलं सारं जीवन व्यतित केलं.
याउलट दिवसरात्र सावित्रीमाईंच्या नावाचा जप करणार्या पुरोगाम्यांनी हिंदुधर्मावर टीका करण्यासाठीच त्यांचा वापर केला आहे.
आज भारत हा स्त्री शिक्षणात नित्य प्रगती करीत आहे. भारताचा इतिहास अनेक शूरवीर महिलांनी परिपूर्ण आहे. घरातील चुल आणि मूल या व्यवस्थेतून बाहेर पडून व्यवसाय, साहित्य, प्रशासन, पोलिस, सैन्य, खेळ इत्यादी क्षेत्रांमध्ये महिला मार्गक्रमण करत आहेत. आजच्या इंटरनेट च्या युगात तर अनेक महिला घरची कामे सांभाळीत ऑनलाइन शिक्षण प्राप्त करीत आहेत. देशाच्या उज्वल भवितव्यासाठी स्त्रियांचे शिक्षण फार महत्त्वाची बाब आहे. म्हणून आपण सर्वांनी स्त्रियांना अतिशय उत्साहाने पुढे जाण्यास मदत करायला हवी. आणि सोबतच जुन्या शिक्षण पद्धतीत बदल करून नवनवीन गोष्टी अभ्यासक्रमात सामील करायला हव्यात,जेणेकरून स्त्रियांना आपले ध्येय गाठण्यास प्रोत्साहन मिळेल.

  • रवींद्र गणेश सासमकर
    संदर्भ – महाराष्ट्र शासन प्रकाशित सावित्रीबाई फुले समग्र वाड्मय
Back to top button