आरमार दिन
वसुबारस (गोवत्स द्वादशी) म्हणजेच अश्विन कृष्ण एकादशी च्या शुभमुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याच्या आरमाराची विधिवत मुहूर्तमेढ रोवली म्हणूनच वसुबारस हा आरमार दिन होय.
जैसे ज्यास अश्वबळ त्याची पूजा आहे, तद्वतच ज्याचा आरमार त्याचा समुद्र, याकरिता आरमार अवस्यमेव करावे शिवरायांनी आरमाराचे महत्त्व जाणले होते . दर्यावर हुकूमत गाजवायची असेल तर सक्षम व बलाढ्य अशा जहाजांचे सुसज्ज आरमार आपल्या दिमतीस असावे. समुद्र हे ही राज्यांगच आहे , त्याच्या रक्षणाकरिता सुसज्ज , बळकट आरमाराची गरज त्यांनी ओळखली होती. स्वराज्याचे आरमार हा नव भारतीय आरमाराचा पाया ठरला आहे. त्यामागे छत्रपती शिवरायांची अमोघ अशी दूरदृष्टी होती. सामान्य माणसाच्या कित्येक योजने दूरवरचे महाराज पाहत असत.
शत्रूच्या डोक्यात काय चालू असेल त्याचा पुरेपूर अंदाज त्यांना बांधता येत असे. त्यामुळेच ते बलाढ्य औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन आग्र्याहून निसटू शकले व एकाच वेळी निजामशाही , आदिलशाही, कुतुबशाही व मुघलांविरुद्ध लढून महाराष्ट्राच्या आयाबहिणींसह रयतेचे रक्षण करू शकले.शिवरायांनी १६५६ साली जावळी मारली आणि स्वराज्याचा रायगड , महाड असा कोकणात प्रवेश झाला. स्वतः वेष पालटून शिवराय कोकणात फिरले. त्यांना सिद्धीचा आयाबहिणींवर होणारा अत्याचार दिसला. रयतेची या सिद्धीने छळवणूक मांडली होती. पोरीबाळींना पळवून मस्कतला विकत असे , शेतीची नासधूस व जनावरं पळवून नेत असे, घरादारांची जाळपोळ करत असे. अभेद्य जंजिराच्या कवचकुंडलात तो सुरक्षित होता . त्याचा पराभव करायचा असेल , तर आपल्याकडे लढाऊ जहाजं हवीत .तसेच समुद्रात पोर्तुगीजांची मक्तेदारी होती. त्यांनाही नेस्तनाबूत करायचे असेल व किनारपट्टी सुरक्षित करायचे असेल तर आपले सशक्त , सक्षम असे आरमार हवे , हे शिवरायांनी जाणले होते.
पण आरमार उभे करण्यासाठी योग्य जागा समुद्रापासून आत असावी . कारण पोर्तुगीज सहजासहजी आपणास आरमार उभे करू देणार नाहीत , म्हणून शिवरायांनी आदिलशाहीच्या ताब्यातील कल्याण , भिवंडी, ठाणे व पनवेल असा सुभा १९५७ साली जिंकून घेतला. जहाजासाठी लागणाऱ्या सागाचेही येथे मुबलक प्रमाण होते.
कल्याणच्या खाडीच्या मुखावर वसुबारस (गोवत्स द्वादशी) अर्थात अश्विन कृष्ण एकादशी, शालिवाहन शक १५७९, हेमलंबी संवस्तर (इंग्रजी दिनांक २४ ऑक्टोबर १६५७) या शुभमुहूर्तावर दुर्गाडी किल्ला व जहाज बांधणी कारखाना उभारणीस सुरुवात करून स्वराज्याच्या आरमाराची मुहूर्तमेढ रोवली. सिंधूबंदी उल्लंघन करून धार्मिक कायद्याला छेद देत , दर्यावर राज्य करण्याच्या दृष्टीने एक दमदार पाऊल टाकले . म्हणूनच वसुबारस हा दिवस “आरमार दिन” म्हणून साजरा केला जातो.
त्या आधीची कहाणी थोडी रंजक आणि महाराजांच्या दूरदृष्टीचे महत्त्व अधोरेखित करणारी आहे. व्यापारासाठी जहाज बांधणी करायची आहेत ,असा बहाणा करून त्यांनी दुर्गाडी किल्ल्यावर जहाज बांधणीचे कंत्राट, पोर्तुगीज इंजिनियर जे मोठी बलाढ्य जहाज बांधण्यात वाकबगार आहेत, त्यांनाच दिले . तसेच संपूर्ण कंत्राटच त्यांना दिले. रुई लैनांव व्हियेगस आणि त्याचा मुलगा फर्नांव व्हियेगस हे दोघे पोर्तुगीज इंजिनियर मुख्य कंत्राटदार होते. त्यांच्या हाताखाली तब्बल साडेतीनशे टोपॅझ कामगार (म्हणजे पोर्तुगीज पुरुष आणि भारतीय स्त्री यांची मिश्र संतती) काम करत होते. महाराजांनी चलाखीने आपले कुशल कामगार मदतनीस म्हणून त्यांना दिले. पडेल ते काम करणे आणि अपमानास्पद वागणूक मिळाली तरी , सर्व शिकून घेतल्याशिवाय काम सोडून बाहेर पडायचे नाही. अशा स्पष्ट सूचना कारागीररूपी मावळ्यांना देण्यात आल्या होत्या. स्वराज्याच्या आरमारच्या दृष्टीने हे किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव त्यांना करून देण्यात आली होती.
पण ही बातमी वसईकर धूर्त पोर्तुगीजांना आणि त्यांच्याकडून विजरई म्हणजे व्हाईसरॉयपर्यंत पोचली . त्याने इंजिनिअर कंत्राटदार व्हियेगस याला काम सोडायला लावले. पण यात दोन वर्ष निघून गेली होती. तोपर्यंत स्वराज्यातल्या हुशार कारागिरांनी जहाज बांधणीची कला आत्मसात केली होती .त्यामुळे महाराजांनी ठरवलेल्या कार्यक्रमात कोणताही व्यत्यय न येता , २० युद्धनौकांचे हिंदवी स्वराज्याचे आरमार म्हणजेच मराठा आरमार , कोकण किनारपट्टीवर डौलाने फिरू लागले. पोर्तुगीज, डच ,फ्रेंच ,इंग्रज आणि सिद्धीच्या नाकावर टिच्चून भगवा झेंडा पश्चिम समुद्रावर फडकू लागला.
भारतीय उपखंडात नौकानयन सुमारे अडीच हजार वर्षापासून होतेच. सातवाहन ,वाकाटक, चालुक्य, शिलाहार ते देवगिरीचे यादव इथपर्यंत आरमारचा उल्लेख आढळतो . पण सहाव्या शतकापासून मुस्लिम आक्रमकांनी भारतच गिळंकृत करायला सुरुवात केली आणि चौदाव्या शतकापर्यंत भारतीय आरमाराचाही नायनाट झाला. परंतु एक गोष्ट मात्र जी आपल्यापासून लपवली गेली वा विशेष करून सांगितली गेली नाही. ती म्हणजे ६व्या शतकातील चालुक्य सम्राट सत्याश्रय पुलकेशी , जो स्वतःला पश्चिम समुद्राचा स्वामी असं म्हणवून घेत होता. त्याचे भूदल आणि नौदल म्हणजेच आरमारही प्रचंड बलवान होते . इस्लामची पहिली लाट , जी सन ६३७ मध्ये भारतावर कोसळली ती समुद्रमार्गे महाराष्ट्रात, कोकणात . श्री स्थानक म्हणजे ठाणे या समृद्ध शहरावर अरबांच्या आरमाराने हल्ला चढवला. परंतु पुलकेशीच्या बलाढ्य आरमाराने, त्यांना ठाण्याच्या समुद्रात साफ बुडवून टाकले . म्हणजेच हिंदू आणि इस्लामी आक्रमकांची पहिली लढाई हिंदू विजयाची होती, म्हणूनच बहुतेक ती सांगितली गेली नाही.
परंतु १४व्या शतकापर्यंत तुर्क-अफगाण सुलतानांनी यादवांसकट , संपूर्ण दक्षिण भारतच जिंकला आणि तिथून हिंदू आरमाराची परंपरा नष्ट होण्यास सुरुवात झाली. त्याचा परिणाम म्हणजे पश्चिम समुद्रावरचे नौकानयन पूर्णपणे अरबांच्या हातात गेलं. याच कालखंडात पोर्तुगालमध्ये नौकानयन शास्त्रात बरेच क्रांतिकारक शोध लागले . त्यामुळे पोर्तुगालचे आरमार हे सर्वश्रेष्ठ आरमार म्हणून उदयास आले. पोर्तुगीज दर्यावर्दी वास्को-द-गामा सन १४९८ साली भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर पोहोचला आणि पुढे पोर्तुगीजांनी पश्चिम किनाऱ्यावर आपल्या प्रबळ , बलाढ्य अशा आरमारच्या जोरावर समुद्रात हुकूमत गाजण्यास सुरुवात केली.
त्यादरम्यान भारतात आलेले आक्रमक मुघल ,तुर्क, निजामशाही ,आदिलशाही व कुतुबशाही सुलतान आपापले वर्चस्व राखण्यासाठी जमिनीवरील लढायांमध्ये व्यस्त राहिले .पण आता समुद्रातून प्रवास करण्यासाठी, त्यांनाही पोर्तुगीजांकडून कर्ताझ म्हणजे परवाना घ्यावा लागत असे. तरच त्यांना अरबस्थानात जाणे सोयीचे ठरे .एकूण भारतीय पश्चिम समुद्रावर पोर्तुगीज, डच, इंग्रज, फ्रेंच यांची हुकूमत होती. जंजिऱ्याच्या सिद्धीचीही खुल्या समुद्रात त्यांच्याशी दोन हात करण्याची हिंमत नव्हती.
या प्रतिकूल परिस्थितीत मागील ४०० वर्षात आपल्याकडे जहाज बांधणीच झालेली नव्हती. महाराजांच्या दूरदृष्टीने पोर्तुगीज, इंग्रज अशा फिरंग्यांचा धोका ओळखला होता . जुलमी सिद्धीचा बंदोबस्त करायचा, तर त्याची रसद तोडण्यासाठी बळकट आरमाराची गरज लक्षात घेऊनच , महाराजांनी कल्याण भिवंडी जिंकून घेतली . वसुबारसेच्या शुभमुहूर्तावर जहाज बांधणी करता दुर्गाडी किल्ल्याची (डॉकयार्ड म्हणून )उभारणी केली. , नष्ट झालेल्या भारतीय आरमाराचे पुनरुज्जीवन स्वराज्याला बळकटी आणून, आपली किनारपट्टी सुरक्षित करत रयतेचे रक्षण करण्यासाठी केले. आजच्या भारतीय आरमाराचा तो पायाच ठरला.
पुढच्या काळात कल्याण पासून मालवण पर्यंत शिवरायांनी जवळपास प्रत्येक खाडीच्या मुखावर एकेक लष्करी-आरमारी ठाणं उभारलं . अनेक ठिकाणी मुळात सागरी चौक्या होत्याच, त्या बळकट केल्या . तळ कोकणात घेरीया हा प्राचीन दुर्ग होताच तो विजयदुर्ग म्हणून अधिकच बळकट केला. सिंधुदुर्ग , सुवर्णदुर्ग , पद्मदुर्ग आणि खांदेरी हे जबरदस्त जलदुर्ग नव्याने बांधले.
व्यापारातून राज्याला फार मोठा महसूल मिळत असतो हे लक्षात घेऊन महाराजांनी मोठी व्यापारी जहाजेही बांधून घेतली. सुभेदार रावजी सोमनाथ हे या व्यापारी जहाजांचा कारभार पहात असत. हिंदवी स्वराज्याच्या व्यापारी नौका पश्चिम समुद्र ओलांडून प्रथम इराणच्या आखाताच्या तोंडावरचे जे प्रसिद्ध बंदर मस्कत तिथवर जाऊ लागल्या. मस्कतचे इमामास शिवाजी राजेंचे सलाम झाले हा शिवकालीन भाषेतला पुरावा आहे.
रोमपर्यंत शिवरायांची कीर्ती पोहोचली होती , याचा अर्थ पोर्तुगाल, स्पेन, फ्रान्स , इंग्लंड , हॉलंड आणि डेन्मार्क या दर्यावर्दी युरोपीय देशांपर्यंत पोचली होती, हे नक्की.आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील झांझिबार, दारे सलाम बंदरातून भारताबरोबर व्यापार सुरू होता . इथल्याच इथिओपिया देशातून सिद्धी ही हशबी जमात भारतात येऊन लुटमार करून जात असे.
अशाप्रकारे शिवरायांनी पश्चिम समुद्रावर व्यापारी आणि आरमारी वर्चस्व प्रस्थापित करून प्राचीन हिंदू नौकानयन परंपरांचे पुनरुज्जीवन करून दाखवले. आणि स्वराज्याच्या आरमाराचा दर्यावर दरारा निर्माण केला, तो सुद्धा सन १६५७ ते १६८० अशा अवघ्या २३ वर्षांत.
तर असा हा पराकोटीची दूरदृष्टी असणारा अलौकिक राजा आम्हाला लाभला , हे आमचे भाग्यच . महाराजांनी जे जे सांगितले ते ते मावळ्यांनी पुढे सिद्ध करून दाखवले .म्हणूनच महाराजांच्या मृत्यूनंतरही स्वराज्य घेणे औरंगजेबाला शक्य झाले नाही .आरमाराच्या बाबतीतच बोलायचे झाले तर, शिवाजी रचिला पाया, कान्होजी झालासे कळस असा भीम पराक्रम सरखेल कान्होजी आंग्रे यांनी शिवरायांच्या मृत्यूनंतर काही वर्षांनी , समुद्रात स्वराज्याच्या आरमाराची दहशत निर्माण करून दाखवून दिला. कान्होजी आंग्र्यांच्या शिक्कामोर्तबी शिवाय कोणाचेही जहाज पश्चिम किनाऱ्यावर फिरू शकत नव्हते. तेवढी दहशत व दरारा कान्होजी आंग्रे यांनी निर्माण केला होता. तसेच शिवरायांची नीती वापरून त्यांनीही विजयदुर्ग येथे आरमारी गोदी निर्माण केली. ज्यात मोठ्या गलबत गुराबांची डागडुजी केली जात असे . फिरंगी तर कान्होजी आंग्रे यांस लँड शार्क म्हणत आंग्रेंची जहाजं अंदमान -निकोबार बेटांपर्यंत गेल्याचे इतिहासात नमूद आहे.
लोप पावलेल्या भारतीय नौकानयन परंपरेचे पुनरुज्जीवन स्वराज्याचे आरमार उभारुन महाराजांनी एकप्रकारे त्याला संजिवनीच दिली.
अशा या स्वराज्याच्या भरभक्कम आरमाराचा पाया छत्रपती शिवाजी महाराजांनी दूरदृष्टीने वसुबारस या शुभमुहूर्तावर घातला . म्हणून वसुबारस हा दिवस “आरमार दिन” म्हणून अभिमानाने सांगायलाच हवा.