पर्यटक व्हिसावर मिशनऱ्यांचा भारतात शिरकाव ?
भारतभर दीपावली हर्षोल्लासात साजरी केली जात असताना, तिकडे ईशान्य भारतात मिशनरी मंडळी , पर्यटक व्हिसावर भारतात शिरल्याचे समोर आले आहे.
भारतीय व्हिसा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सात जर्मन नागरिकांना आसाम येथील, गोलाघाट जिल्ह्यातील काझीरंगा नॅशनल पार्क येथील एका खाजगी रिसॉर्ट मधून शुक्रवारी २८/१०/२०२२ रोजी ताब्यात घेण्यात आले. मिशनरी व्हिसा न घेता , पर्यटक व्हिसावर भारतात प्रवेश करून त्यांनी भारतीय व्हिसा नियमांचा भंग केला होता. मंगळवार 25 ऑक्टोबर पासून ते तिथे राहत होते. पोलिसांनी त्यांच्यासोबतच मुकुट बोधरा या झारखंडवासी भारतीय नागरिकाला , जर्मन समूहासोबत ताब्यात घेतले आहे.
गोलाघाटच्या पोलीस अधीक्षक रमणदीप कौर यांनी ,त्यांना पर्यटक व्हिसावर मिशनरी काम करता येणार नाही, हे त्यांच्याकडील पर्यटक व्हिसा पाहिल्यावर सांगितले. भारतीय व्हिसा नियमांचा भंग केल्याबद्दल, त्यांना त्यांच्या देशात परत पाठवले जाईल.
या जर्मन नागरिकांना, व्हिसाबाबत योग्य ती माहिती न देता बोलावणाऱ्या, ख्रिस्ती मंडळींवरही कारवाई करण्यात येणार आहे. या सात जर्मन नागरिकांनी तिनसुकिया, मार्गारिटा आणि कारबी अॅंगलॉंग येथील धार्मिक मंडळींना भेट दिल्याचे उघड झाले आहे .तसेच शनिवारी २९/१०/२०२२ रोजी तेजपूर येथील धार्मिक कार्यक्रमात सामील होण्याचा त्यांचा बेत ठरला होता. परंतु आता त्यांची रवानगी त्यांच्या देशात झाली आहे.
अशा प्रकारचा हा दुसरा प्रयत्न , राज्यात बुधवार २६/१०/२०२२ नंतर पाहायला मिळतो आहे. तीन स्विडीश नागरिकांना दिब्रुगड जिल्ह्यातील, नामरुप येथून ताब्यात घेण्यात आले होते. त्यांनीही अशाच प्रकारे व्हिसा नियमांना पायदळी तुडवत, धार्मिक मंडळींना भेटीचा सपाटा लावला होता व मिशनरी कार्यास मदत केली होती. गुरुवारी त्यांना स्वीडनला परत पाठवून देण्यात आले होते.
भारतात अशाप्रकारे पर्यटक व्हिसाद्वारे शिरकाव करून धर्मांतरण कार्य जोमाने सुरू ठेवण्याचा ख्रिस्ती मंडळींचा हा डाव तर नाही ना?
वेळीच सावध होऊन कारवाई करणा-या आसामच्या पोलिसांचे कौतुकच आहे. पण हे हिमनगाचे टोक ठरु नये, अन्य अनेक मार्गांनीही मिशनरी आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नशील असतीलच . नागरिकांतील पोलिसांनी त्यांना शोधून ताब्यात द्यायला हवे. तरच यावर थोडा चाप बसू शकेल .
पंधराव्या शतकात भारतात प्रवेश घेतल्यापासून युरोपीय समुदयातील सर्वच देशांमधून व्यापाराबरोबरच धर्मांतरणाचाही मार्ग प्रशस्त करण्यास सुरुवात केलेली होती. त्यांना भारतभूमी ही एक प्रकारे धर्मांतरणासाठी सुपीक अशी जमीन जाणवली. येथील भोळ्या भाबड्या नागरिकांना सहजपणे फसवून धर्मांतरित करता येऊ शकते. प्रसंगी बळजबरीने देखील धर्मांतरित करता येऊ शकते , हे त्यांनी जाणले आणि मिशनऱ्यांच्याही टोळधाडी भारताच्या कानाकोपऱ्यात पसरल्या. मोठ्या प्रमाणात गरीब आणि दलित समाजामध्ये तसेच मुख्य प्रवाहापासून दूर असणाऱ्या वनवासी बंधूंना धर्मांतरित करणे त्यांना सोपे होते . तसेच या सर्व कार्यासाठी त्यांना युरोपमधून आणि व्हॅटिकन सिटी येथून मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य होत होते.
परंतु आता ते दिवस राहिलेले नाहीत , आता भारत पूर्णपणे बदललेला आहे .छत्रपती शिवरायांनी इंग्रजांचे आणि एकूणच युरोपीय समुदायाचे धर्मांतराचे षडयंत्र ओळखले होते. परंतु लबाड इंग्रज त्यावेळी स्वराज्यापासून दूर राहिले व ईशान्य भारत आणि इतर मागास प्रदेशात त्यांनी आपली पाळेमुळे घट्ट रोवली. परंतु आताच्या नवीन भारतामध्ये आलेल्या जागृतीमुळे, धर्मांतरांसाठी संस्थांच्या माध्यमातून जमा केला जाणारा पैसा गोठवून टाकण्यात आला आहे. तसेच भारतात येणाऱ्या प्रत्येक विदेशी नागरिकावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे .
धर्मांतराच्या बाबतीत हे सरकार जागरूक आहे. त्याचाच परिणाम म्हणून अशाप्रकारे लपवाछपवी करत, लबाडी करत धर्मप्रसारासाठी भारतात शिरकाव करणाऱ्यांची चांगलीच कोंडी आता करण्यात येऊ लागली आहे. आसाम मधील या घटना याचे द्योतक आहे .भविष्यात अधिकच मोठ्या प्रमाणात मोहिमा उघडून धर्मप्रसारकांना आळा नक्कीच घातला जाईल ,यात काहीच शंका नाही . नागरिकांनीही आपल्यातील पोलीस जागा ठेवून वेळोवेळी सरकारच्या निदर्शनास या प्रकारच्या हालचाली आणून दिल्या पाहिजेत .त्यामुळे या सर्व प्रकारास खीळ बसू शकेल आणि एकूणच धर्मांतराच्या बाबतीत आपण जागरूक झाल्यामुळे भविष्यात लबाडीने वा लपवाछपवीकरुन धर्मांतरित करण्याचे प्रमाण घटवता येईल.