स्वराज्याच्या आरमाराची मुहूर्तमेढ रोवलेल्या दुर्गाडी किल्ल्याला भारतीय नौदलाची अनोखी मानवंदना…
भारतीय नौदलाची T 80 ही युद्धनौका २३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर, ७ ऑक्टोबर २०२१ निवृत्त झाली आहे. २४ जून १९९८ साली आपल्या नौदलात रुजू झालेली ही जलद गतीने हल्ला करणारी युद्धनौका इस्राएलमध्ये मे. आयएनएस रामता यांनी बांधली होती. उथळ पाण्यातील मोहिमेसाठी हीची खास बांधणी करण्यात आली होती. महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यावर या युद्धनौकेने अत्यंत तत्परतेने २३ वर्षे अव्याहत गस्त घातलेली आहे.
आता ही सेवानिवृत्त युद्धनौका कल्याणच्या दुर्गाडी खाडीकिनारी नौदल गॅलरी कॅम्पसमध्ये, सर्वसामान्य जनतेला बघता यावी यासाठी उभी करण्यात येणार आहे. भारतीय नौदल आणि कल्याण डोंबिवली स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त प्रयत्नांनी हा प्रकल्प उभा करण्यात येणार आहे.
वसुबारस १६५७ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी दुर्गाडी देवीच्या साक्षीने याच दुर्गाडी किल्ल्यावर स्वराज्याच्या आरमाराची मूर्तमेढ रोवली होती. पोर्तुगीज नौदल अभियंत्यांकडून गनिमी काव्याने जहाज बांधणी शिकून घेतलेल्या स्वराज्याच्या कुशल कामगारांनी पुढे आपले “आत्मनिर्भर” सुसज्ज व बलाढ्य आरमार उभे केले. छत्रपती शिवरायांच्या हयातीत आणि त्यांच्या पश्चात दीर्घकाळ, स्वराज्याच्या या आरमाराने पोर्तुगीज, ब्रिटिश, फ्रेंच, डच अशा त्यावेळच्या सगळ्या बलाढ्य फिरंगी आरमारांना विलक्षण धाकात ठेवले होते. सरखेल कान्होजी आंग्रे यांचा तर स्वराज्याच्या किनारपट्टीवर दीर्घकाळ विलक्षण दरारा होता.
भारतीय नौदलाचे हे दुर्गाडी किल्ल्यावरील गॅलरी कॅम्पस म्हणजे छत्रपती शिवरायांच्या नौदलाला दिलेली अनोखी मानवंदना आहे.
केंद्र सरकार, भारतीय नौदल आणि कल्याण डोंबिवली स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन निश्चितच कौतुकाला पात्र आहेत.
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_MULK_20221104_4_1