द्वेष सावरकरांचा की हिंदुत्वाचा..
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातही सावरकर या देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत.सावरकरांविषयी द्वेष आणि विष पसरवूनही ते लोकांच्या मनावर अढळपणे विराजमान आहेत.”
स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त गरळ ओकण्यात डाव्यांनी हद्द पार केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा यांच्यात तुलना करुन नव्या वादाला तोंड फोडले आहे.डावे म्हणतात की,”स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बिरसा मुंडा यांच्यातील फरक पहा.२४ व्या वर्षी ते हुतात्मा झाले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एक पुस्तक लिहीले ज्यात स्वातंत्र्यवीर सावरकर किती वीर आहेत,हे सांगण्याचा प्रयत्न केला.सावरकर इंग्रजांकडून पेंशन घेत होते. राष्ट्रविरोधी कामांसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर ब्रिटीशांना मदत करत होते.”,
काय म्हणावे याला, सावरकर म्हणजे जाज्वल्य “हिंदुत्व“.त्यांना माफीवीर म्हणायची डाव्यांची हिंमतच कशी होते, ज्यांनी कायमच क्रूरकर्मा स्टालिनला आपला आदर्श मानले,त्यांना कोणताच अधिकार नाही सावरकरांना बोल लावण्याचा.हा देश हिंदूंचा आहे आणि जे जे म्हणून या मातीत जन्माला आले आहेत, ते ते सगळे हिंदू आहेत,असं म्हणून सगळ्यांना एकत्र करू पाहणारे सावरकर अनेकांना खुपले कारण या गोष्टी मुळे अनेक लोकांना स्वतःची राजकीय पोळी भाजायला त्रास झाला असता.
सावरकर म्हणजे एक इतिहासातील ज्वलंत कालखंडच आहे. कान्हेरे, जॅक्सन, मदनलाल धिंग्रा, अभिनव भारत, परदेशी कापडांच्या होळ्या, परदेशातून क्रांतिकारकांना पाठवलेली २८ ब्राऊनिंग पिस्तुले, ‘मोरिया’ बोटीवरून सागरात झोकलेली उडी, हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयातला खटला, अंदमानचा काळा तुरुंगवास असे कष्टप्रद जीवन त्यांनी या राष्ट्रासाठी भोगले.
सावरकरांनी ब्रिटिश सरकारला आपल्या धाकात ठेवले होते. या सावरकरांमुळेच हिंदुस्थानात आपली सत्ता राहणार नाही या भयापोटीच ब्रिटिश सरकारने त्यांना अंदमानच्या कारागृहात टाकून त्यांचा अनंत छळ केला. त्यांच्या सर्व संपत्तीवर टाच आणली. त्यांचा नित्य वापरायचा चष्मा सुद्धा इंग्रज सरकारने जप्त केला. त्या इंग्रज सरकारकडून सावरकर पैसे घेत होते आणि इंग्रज सरकार सावरकरांना पैसे देत होते यावर रात्री झोपेत गादी ओली करणारे छोटे बाळ सुद्धा विश्वास ठेवणार नाही.
क्रांतिकारक म्हणून सावरकरांच्या नावावर अनेक विक्रम जमा आहेत;सावरकर हे परतंत्र हिंदुस्थानातील एकमेव अशी व्यक्ती आहे की, ज्यांना आपल्या क्रांतिकारक विचारांसाठी ‘बॅरिस्टर’ पदवी गमवावी लागली.सावरकर व त्यांच्या दोन्ही भावंडांनी सर्वस्वच गमावले. अंदमानातून सुटल्यावर अखेरपर्यंत त्यांच्यापाशी तसे कोणतेच साधन नव्हते. त्यांच्यासारखा विद्वान हा जगण्यासाठी परावलंबीच राहिला. स्वातंत्र्यवीर ही पदवी त्यांना जन-मानसाने दिली.
सावरकरांच्या द्वेषातून एक नपुंसक पिढी पोसली गेली.सावरकरांना सातत्याने खलनायक ठरविण्याचे प्रयत्न झाले तरी प्रखर हिंदुत्ववादी, राष्ट्रभक्तांसाठी ते ‘नायक’च आहेत. गांधीजींच्या विरोधात सावरकरांना उभे करून विषाचे प्रवाह निर्माण केले गेले,डाव्यांच्या बुद्धीचा आवाका सर्वांना ज्ञात आहे.कर्तृत्व शून्य माणसाने आपली पात्रता ओळखून समाजात वावरावे असा एक शिष्टसंमत संकेत आहे. याचे भान नसलेल्या डाव्यांनी अनेक वेळा स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या तेजस्वी पुरुषाचा अपमान केला आहे.
गांडूळाने गरुड भरारी घेण्याचे स्वप्न पहावे किंवा स्वतःची गरुडाशी तुलना करण्याचे दु:साहस करावे तसा हा प्रकार आहे. तर्कहीन, मूर्खासारखी बडबड करणार्यांना ज्ञानयोगी, कर्मयोगी, संन्यस्त वृत्तीच्या सावरकरांच्या नखाशी सुद्धा बरोबरी करता येणार नाही.
ही गोष्ट सुमार बुद्धिमत्ता असलेल्या डाव्यांच्या अधू मेंदूपर्यंत पोहोचू शकत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे सूर्यासारखे तेजस्वी आणि स्वयंप्रकाशी आहेत.
राष्ट्रनिष्ठा, राष्ट्रभक्ती, शौर्य, वीरता, प्रतिकारनिष्ठा, विजिगीषुवृत्ती, अशा शतावधी गुणांनी ज्यांचे जीवन नटलेले आहे आणि ज्यांना आपल्या संस्कृतीचा, धर्माचा, थोर ऐतिहासिक परंपरेचा उत्कट अभिमान आहे अशा सावरकरांवर टीका करून डाव्यांनी स्वत:च्या हातानेच स्वतःचे वस्त्रहरण केले आहे.
इतिहासात,भविष्यात सावरकरांचे स्थान ‘नायक’ म्हणून राहू नये यासाठी एक विशिष्ट वर्ग सतत ‘माफीवीर’ म्हणून त्यांना हिणवत आला आहे. तरीही अंदमानातील त्यांची अंधारकोठडी ही जगातल्या शूरवीरांसाठी सतत प्रेरणाच देत राहील. सशर्त सुटकेसाठी सावरकरांनी केलेले निवेदन म्हणजे माफीनामा नाही.सावरकर ही एक केवळ व्यक्ती नव्हती तर स्फूर्ती होती, एक धगधगती मशाल होती आणि राहील यात शंका नाही.
भारत माता की.. जय !!