संविधान म्हणजे काय? संविधान म्हणजे राज्य घटना. (constitution)राज्यसंस्थेचा कारभार सुरळीतपणे चालावा म्हणून सनदशीर राज्यपद्धतीविषयी तयार केलेला नियमावलींचा मसुदा किंवा संहिता. ज्या मूलभूत तत्त्वांनुसार किंवा प्रस्थापित कार्यपद्धतीप्रमाणे एखादया राज्यशासनाचा अथवा इतर संस्था वा संघटना यांचा कारभार चालतो, त्यांच्या संहितेला सामान्यपणे संविधान किंवा राज्य-घटना म्हणतात. शासनसंस्थेचे स्वरूप, कार्यपद्धती, न्यायव्यवस्था ह्यांचा समावेश संविधानात असतो. तसेच त्यात नागरिकांचे हक्क आणि कर्तव्ये ह्यांचाही अंतर्भाव होतो. शासनसंस्थेसंबंधीचे नियम राज्य- घटनेत वा संविधानात समाविष्ट असतात.
अवघड वाटते का ही व्याख्या? मग अगदी सोप्या शब्दांत सांगायचे तर सार्वभौम भारताची एकता कशी टिकेल, शासन कोणत्या पद्धतीचे असेल, शासन कोण निवडणार आणि भारताचा व्यवहार, कारभार कशा प्रकारे चालेल ह्या सर्वांसाठी जी नियम पद्धती तयार केली गेली ती नियमावली म्हणजे संविधान. आपल्या देशाचा कारभार सुरळीतपणे चालावा ह्यासाठी आधारभूत असणारी तत्वे, आचार आणि विचार पद्धती म्हणजे संविधान. त्यात काय काय असेल? निरनिराळ्या कार्यपध्दती, कायदे, नीतिमूल्ये, सामान्यांच्या हिताचे रक्षण, देशाचे संरक्षण, अर्थ समायोजन हे सगळे त्यात असेल. देशाच्या उज्वल भविष्याच्या दृष्टीने कोणताही निर्णय घेण्यासाठीची मार्गदर्शक तत्वे संविधानात असतील.
अगदी थोडक्यात आणि अजून सोप्या भाषेत सांगायचे तर देशाच्या, समाजाच्या कल्याणासाठी केले गेलेले नियम म्हणजे संविधान. पण संविधान म्हणजे केवळ लिखित कायदा किंवा तत्वज्ञान नसते तर देशाच्या परंपरा आणि संस्कृतीला अनुसरून मांडलेला मूल्यविचार असतो.
आपल्या सर्वांच्याच दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या संविधानाची तुमच्या माझ्यासारख्या जनसामान्यांना थोडक्यात का होईना, पण माहिती असावी, ज्यांना आधीच ही सर्व माहिती असेल, त्यांना पुनः एकदा वाचता यावी, ह्याचसाठी ही लेखमालिका.
तुम्ही म्हणाल की संविधान दिन २६ जानेवारीला का नाही? कारण २६ जानेवारी १९५० ला तर भारताचे संविधान लागू झाले. २६ जानेवारी हा दिवस आपण म्हणूनच गणतंत्र दिवस किंवा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो.
आता जाणून घ्यायची गोष्ट अशी की जरी १५ ऑगस्ट १९४७ ला भारत ब्रिटिश अंमलाखालून मुक्त झालेला असला तरी खऱ्या अर्थाने स्व’तंत्र’ व्हायचे तर भारताला स्वत:ची राज्यघटना- संविधान असणे आवश्यक होते. अनेक वर्षे आणि अनेक सदस्यांच्या समितीने अत्यंत अभ्यासपूर्वक तयार गेलेले संविधान स्वीकारून सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक भारताच्या नागरिकांनी स्वतःला संविधानाच्या स्वाधीन केले तो दिवस होता, २६ नोव्हेंबर १९४९. तसा स्पष्ट उल्लेख आपल्याला भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत आढळतो.
त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस आपण संविधान दिवस म्हणून साजरा करतो.हे संविधान तयार कसे झाले? कोणी केले? ह्या विषयी वाचू या पुढच्या भागात.
- वृंदा टिळक
- संदर्भ:-
- १. https://vishwakosh.marathi.gov.in/33978/
- २. https://vishwakosh.marathi.gov.in/30091/