गीता जयंती
भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रावर पार्थास आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली तो
पवित्र दिवस म्हणजेच गीता जयंती. तो दिवस होता मार्गशीष कृष्ण एकादशी.
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।
सकाळी प्रत्यक्ष युद्धभूमीवर कौरवसेना व पांडवसेना एकमेकांसमोर उभी ठाकली असताना, समोर भीष्म पितामह, गुरु द्रोणाचार्य , कर्ण तसेच कौरवादी भावंडांना पाहून अर्जुनाचे मन विचलित झाले. अर्जुन आपले गांडीव ( धनुष्य )सोडून रथात मागे जाऊन बसला. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचे सारथी होते. हताश झालेल्या अर्जुनाला ,”तू तुझे कर्म करणे, हाच तुझा धर्म आहे” हे समजविण्यासाठी त्यांनी गीता उपदेश केला. त्याप्रसंगी आपल्या विराट रूपाचे दर्शन भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दाखवले. मी सर्वव्यापी आहे आणि सृष्टीमध्ये जे काही घडत आहे, ते केवळ माझ्यामुळे घडते आहे. तेव्हा तू कर्म कर, बाकीची चिंता करू नकोस, असा उपदेश केला.
मनुष्याचा अधिकार केवळ कर्म करणे हाच आहे. हार ,जीत, जीवन, मरण, शोक, हर्ष हे काहीच त्याच्या हातात नाही.
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः||
याचा भावार्थ असा होतो की, आत्मा कोणत्याही शस्त्राने खंडित करता येऊ शकत नाही, ना अग्नीद्वारे तो जाळता येईल, ना जळाद्वारे भिजवता येईल , ना वायुद्वारा सुकवता येईल.
आत्मा अमर आहे , शरीर नश्वर आहे .सृष्टीमध्ये जे काही होत आहे ते केवळ माझ्यामुळेच त्यामुळे तू चिंता करू नकोस आणि युद्धासाठी सज्ज हो. अशाप्रकारे भगवंतांनी गीतेचा उपदेश दिला आणि अर्जुनाला ज्ञान प्राप्त होऊन तो युद्धासाठी सज्ज झाला . अशी मान्यता आहे की, यादरम्यान काळही थांबला होता. त्यानंतर स्वतः भगवान श्रीकृष्ण यांनी पांचजन्य फुंकले आणि महाभारताच्या घनघोर युद्धास प्रारंभ झाला.
द्वापार युगात सांगितली गेलेली ही गीता , त्यावेळी तीन जणांनी प्रत्यक्ष ऐकली होती. ज्याला हा गीतोपदेश केला तो अर्जुन, अर्जुनाच्या रथावरील ध्वजावर असणारा हनुमंत व धुतराष्ट्राला आपल्या दिव्यचक्षूंद्वारे रणभूमीवरील वृत्तांत कथन करणारा संजय. भगवंतांनी स्वतःही सांगितली म्हणून ती ” भगवद्गीता ” त्यात १८ अध्याय आणि ७०० श्लोक आहेत . भगवंताने संपूर्ण विश्वालाच गीतारुपाने जगण्याचा योग्य मार्ग दाखवला आहे. गीता एकमात्र ग्रंथ आहे, ज्यामध्ये मनुष्याच्या प्रत्येक समस्येचे उत्तर सापडते. द्वापरयुगापासून आजपर्यंत गीता मनुष्याच्या जीवनाची मार्गदर्शक राहिली आहे.
गीता जयंती का साजरी केली जाते?
भारतात अनेक ग्रंथ ,पुराणं ,उपनिषदं, वेद हे ऋषीमुनींनी अभ्यास करून वा कठीण तपश्चर्या करत, ज्ञान आत्मसात करून लिहिली आहेत. परंतु भगवद्गीता हा एकमेव ग्रंथ असा आहे ,जो स्वतः भगवंताच्या मुखातून अर्जुनाला उपदेश करताना सांगितला गेला. संपूर्ण मनुष्यमात्राच्या जगण्याचा योग्य मार्ग यातून सांगितला गेला आहे. म्हणून भगवंतांनी गीता सांगितलेला दिवस, मार्गशीष कृष्ण एकादशी या दिवशी त्याचे स्मरण म्हणून गीता जयंती साजरी करण्यात येते. यावर्षी म्हणजे ३ डिसेंबर २०२२ रोजी ५१५९ वी वर्षपूर्ती आपण साजरी करत आहोत.
गीता जयंती ज्या मार्गशीष कृष्ण एकादशीला भगवंताच्या मुखातून बाहेर पडली त्या एकादशीला मोक्षदा एकादशी असे म्हणतात. कारण केवळ गीता आत्मसात करण्यानेच मनुष्याला मोक्ष प्राप्ती होऊ शकते, म्हणून ही मोक्षदा एकादशी. मनुष्याला अंधकारातून ज्ञानाकडे घेऊन जाणारी गीता , भगवंताच्या मुखातून बाहेर पडली . अज्ञान दूर सारुन मनुष्याला त्याच्या कर्माची जाणीव ,भगवंतांनी गीतेद्वारे करून दिली . भक्तीयोग ,कर्मयोग, सांख्ययोग आणि ज्ञानयोग हे चार मार्ग गीतेत सांगितलेले आहेत.
गीतेचा हाच उपदेश याआधी भगवंतांनी सूर्याला सांगितला होता .त्याने त्याचा पुत्र विवस्वान याला व विवस्वानने त्याचा पुत्र ईश्वाकुला सांगितला होता. परंपरेने हा योग सर्व राजश्रींना ज्ञात होता . पण काही काळाने तो पृथ्वीवरून लुप्त झाला होता. म्हणून कुरुक्षेत्रावर अर्जुनाचे सारथ्य करणाऱ्या भगवान श्रीकृष्णाने, हा लोप पावलेला योग सांगण्याआधी अर्जुनास सांगितले की, ” हा अत्यंत गुप्त आणि रहस्यमय योग मी तुला सांगत आहे” अशाप्रकारे हा गीतोपदेश होऊन मनुष्यमात्राचे कल्याण या पवित्र दिनी( गीता जयंती) झाले.
रामायण , महाभारत, पुराण या सगळ्या पौराणिक ग्रंथात मिळून किमान ६० गीता आहेत. फक्त भारतीय भाषांमध्येच नव्हे, तर जगातील प्रमुख भाषांमध्ये भगवद्गीता उपलब्ध आहे. गीतेवर मोठ्या प्रमाणात संशोधन व प्रवचन भारताबाहेर होत असतात. गीतेचे महत्व पाश्चिमात्यांनी चांगलेच ओळखले आहे. गीतेद्वारे मोक्षाची द्वारे उघडली जातात , यावर त्यांचीही आता श्रद्धा आहे . मागील दोन तीन शतक गीतेचा अभ्यास, जागतिक स्तरावरील साहित्यिक विचारवंतच नव्हे तर शास्त्रज्ञही करत आहेत. गीता ही सर्व जीवनाचे सार आहे, हे त्यांनाही कळून चुकले आहे . गीतेच्या प्रसार करण्यात व आंतरराष्ट्रीय स्तरावर गीता जयंती हर्षोल्लासात साजरी होताना पाहिल्यावर आपसूकच याची जाणीव होते.
ख्यातनाम शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन, ज्यांच्या विद्वत्तेचा जगाला हवा वाटतो .त्यांनाही गीता ज्ञानाने भारावून टाकले होते. गीतेचा सखोल अभ्यास त्यांनी केला होता . त्यांचे तर म्हणणे होते की , गीता सर्वांनीच स्वतः अभ्यासावी व पहावे की, आपल्या जीवनावर त्याचा किती प्रभाव आहे. गीता अद्भुत आहे. आपल्या तारुण्यवस्थेत आपल्याला गीता अभ्यासता आली नाही , याची त्यांना कायम खंत वाटली. सर्वांनाच ते गीता वाचावी असा आग्रह करत. “जेव्हा मी भगवद्गीता वाचतो, तेव्हा तिच्याशिवाय इतर सगळंच मला अपूर्ण वाटत राहते”. हे त्यांचे बोलच ते गीतेशी किती समरस झाले होते , हे स्पष्ट करते.हेन्री डेव्हिड थोरो या अमेरिकेतील प्रसिद्ध साहित्यकाने आपल्या “वाल्डेन” या सुप्रसिद्ध पुस्तकात अनेकदा गीतेचा उल्लेख केला आहे.
थॉमस मर्टन , टी एस इलियट, रुडॉल्फ स्टेनर , वॉरेन हेस्टींग्स, रॉल्फ वाल्डो इमरसन, फ्रेडरिक वॉन हमबोल्ट, एलडस हक्सले, ह्युग जैकमैन, फिलीप ग्लास, ब्लुनेट इसेविट या पाश्चिमात्य साहित्यिक, शास्त्रज्ञ व विचारवंतांनी गीतेचा त्यांच्या जीवनावर झालेल्या प्रभाव व गीता ही मानव कल्याणाकरता अत्यंत उपयुक्त ग्रंथ असल्याचे, जगाला सांगितले आहे. डॉ. ॲनी बेझंट यांना आपण भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक अग्रणी म्हणून ओळखतोच. पण त्या बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या संस्थापकांपैकी एक होत्या आणि त्यांनी ” द लॉर्ड सॉंग ” ( देवाचे गीत )असा गीतेचा अनुवादही केला आहे.
भारतीय वंशाची अंतराळ वीरांगणा सुनीता विल्यम्स ही, महिलांमध्ये अंतराळात अधिक काळ चालण्याचा विक्रम करणारी ,म्हणून विश्वाला परिचित आहे. दोन वेळा यशस्वी अवकाश यात्रा करून येणाऱ्या सुनीताने अंतराळात ,आपल्यासोबत गणेश मूर्ती आणि भगवद्गीता सोबत घेऊन गेली होती . “गीतेमुळे मला मी काय करते आहे ,त्याचे कारण काय आहे, हे समजण्यास मदत होते” असे तिने मुलाखतीत सांगितले होते.
ज्युलियस रॉबर्ट ओपेनहायमर अर्थात अणुबॉम्बचे जनक यांनी १६ जुलै १९४५ रोजी, अणुबॉम्बच्या विस्फोटानंतर मुलाखती सांगितले होते ,”मला गीतेतील त्या श्लोकाची आठवण येते (अध्याय ११ श्लोक ३२वा) ज्यात भगवान अर्जुनाला सांगतात,” मी लोकांचा नाश करणारा महाकाल आहे आणि या समयी मी अधर्माचा नाश करण्यासाठी प्रवृत्त झालो आहे.” ओपेनहायमर यांनी गीता समजून घेण्यासाठी ते संस्कृत शिकले. कारण गीता त्यांना संस्कृत मधून समजून घ्यायची होती. महाभारतात ज्या ब्रह्मास्त्राचा उल्लेख आहे ,तो अणुबॉम्ब सारखाच मानला जातो. उल्लेखनीय बाब ही आहे की, या संभावनेवर ओपेनहायमर हेही विश्वास करत होते.
भारतातही भगवद्गीतेवर आधारित असंख्य ग्रंथ , पुस्तकं, कवणं, अभंग हजारो वर्षांपासून लिहिली जात आहेत . ज्याला गीता जशी भावते , तशी तो त्याची उकल करून गीतेवर परीक्षणात्मक टीका( म्हणजेच उकल )करत आली आहे. ७०० वर्षांपूर्वी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी संस्कृत मधील गीता मराठीत सोपी करून सांगताना, “भावार्थदीपिका “अर्थात “ज्ञानेश्वरी” रूपाने टीका केली आणि सर्वसामान्य माणसाला गीता समजण्याचा मार्ग मोकळा करून दिला . स्वातंत्र्यपूर्वकाळात मंडालेच्या तुरुंगवासात असताना लोकमान्य टिळक यांनीही, “गीतारहस्य” हा कर्मयोगावर आधारित परीक्षणात्मक टीका ग्रंथ लिहिला . आचार्य विनोबा भावे यांनी ” गीताई “या नावाने गीता ओवीबद्ध केली. गीताई माऊली माझी, तिचा मी बाळ नेणता| पडता रडता उचलून घेई कडेवरी || असे गीतेचे यथार्थ वर्णन विनोबांनी केले आहे. “यथार्थ गीता” हा टीकाग्रंथ परमपूज्य स्वामी परमानंदजी महाराज यांना प्राप्त झालेला अर्थ, त्यांचे शिष्य स्वामी अडगडानंदजी महाराज यांनी अलीकडच्या काळात लिहिला आहे.
“गीता म्हणजे मानवमात्राचे धर्मशास्त्र आहे” असे महर्षी वेदव्यास यांनी म्हटले आहे. वेदांच्या अखेरच्या रचनेतील एक ग्रंथ “गीतोपनिषद” म्हणूनही प्रसिद्ध आहे . “भगवद्गीता” हा भारतीयांचा अत्यंत पवित्र धर्मग्रंथ आहे. म्हणूनच न्यायालयात सत्यतेसाठी गीतेवर हात ठेवून शपथ घेतली जाते. मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान सुखकर करण्याकरता उपयुक्त ठरेल असा हा संदर्भ ग्रंथ आहे .जगातील शास्त्रज्ञ व विचारवंतांनी गीतेला मानवी जीवनाच्या अथांग सागरातील दीपस्तंभाचे स्थान दिले आहे.
गीता प्रेस गोरखपुर ही भारतात फक्त धार्मिक पुस्तक छापून प्रकाशित करणारी संस्था आहे. भगवद्गीता भारतातील सर्व प्रमुख भाषांमध्ये छापून अत्यल्प किमतीत सर्व घराघरात पोहोचण्यासाठी सतत प्रयत्नशील असते. चिन्मय मिशन ही स्वामी चिन्मयानंद यांची धार्मिक संस्था. गीता बालकांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध स्पर्धा घेऊन विद्यार्थी तसेच मुलांना गीतेची ओळख करून देण्याकरिता कार्यरत असते. इस्कॉनचे श्री प्रभुपाद स्वामी यांनी जगभरात भगवद्गीतेचा प्रसार करत, जगाला कृष्णभक्तीत रममाण करून सोडले आहे. पाश्चात्त्य देशात मोठी मोठी पारायणं, प्रवचनं व यात्रा इस्कॉन भरवत असते.
गीता जयंती ही आता जागतिक पटलावर बहुतेक सर्वच देशात हर्षोल्लासात साजरी केली जाते. भारतात प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनास गीतोपदेश केला त्या कुरुक्षेत्र , हरियाणा येथे पंधरवडावर मोठा आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव साजरा केला जातो.
एकूणच भगवद्गीता ही भारतीयांसाठीच नसून अखिल विश्वाच्या कल्याणासाठीच भगवंतांनी आजच्या दिवशी अर्जुनाला निमित्त करत, मनुष्यमात्रासाठी सांगितली होती. या दिवशी गीतेतील श्लोकांचे वाचन केल्यास पूर्वजन्मीच्या दोषांचा नाश होतो व मोक्षप्राप्तीचा मार्ग सुकर होतो.
गीता आपणही वाचावी ,इतरांनाही गीता वाचण्यासाठी प्रवृत्त करावे व जीवनातील नैराश्याला फेकून देण्याचे सामर्थ्य प्राप्त करावे , हीच गीता जयंतीदिनी प्रार्थना.
गीता जयंतीच्या ५१५९ व्या वर्षपूर्तीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!