चीनची मस्ती जिरवावीच लागेल…
भारत-चीन सैनिकांत तवांग सीमेवर झटापट,अरुणाचल प्रदेशच्या तवांग सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न
अरुणाचल प्रदेशच्या (Arunachal Pradesh) तवांग सीमेवर (Tawang Border) पुन्हा एकदा भारत आणि चिनी सैनिकांमध्ये झटापट झाली.तब्बल ६०० हून अधिक चिनी सैनिक चाल करून आले होते. मात्र भारतीय जवानांनी त्यांना सडेतोड उत्तर दिले.(indian troops in area of face off in tawang gave befitting response to chinese troops)
चीनचं शेपूट वाकडं ते वाकडंच. अरुणाचल प्रदेशच्या तवांग सीमेवर कुरापती चीननं पुन्हा एकदा घुसखोरीचा प्रयत्न केला. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीनं 9 डिसेंबरच्या रात्री नियंत्रण रेषेपर्यंत धडक दिली. मात्र चीनचा हा घुसखोरीचा खटाटोप जिगरबाज भारतीय जवानांनी हाणून पाडला. यावेळी भारत आणि चीनचे जवान पुन्हा एकदा एकमेकांना भिडले. या झटापटीत दोन्ही बाजूंचे सुमारे २६ जवान जखमी झाल्याचं समजतंय.ज्यात भारताचे ६ आणि चीनचे २० जवान आहेत. या झटापटीनंतर दोन्ही देशांचे सैनिक तवांग सीमेवरून मागे हटल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. या घटनेनंतर परिसरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही देशांच्या लष्करी कमांडर्सनी फ्लॅग मिटींग घेतली. अरुणाचल प्रदेशमध्ये चीनच्या कुरापतीची ही पहिलीच वेळ नाही.
ड्रॅगनच्या कुरापती थांबेनात
अरुणाचलच्या तवांग सीमेवर २००६पासून झटापटी सुरू आहेत. ऑक्टोबर २०२१ मध्येही भारत आणि चीनचे सैनिक एकमेकांना भिडले होते. यांगसे भागात चिनी सैनिकांनी काही भारतीय सैनिकांना काही तास ताब्यात घेतलं होतं. तर १५ जून २०२० रोजी लडाखच्या गलवान खो-यातही दोन्ही देशांच्या जवानांमध्ये चकमक झाली होती. त्यावेळी भारताचे सुमारे २० जवान शहीद झाले होते. तर केवळ ६ चिनी सैनिक ठार झाल्याचा खोटा दावा चीननं केला होता. २०१७ साली देखील डोकलाममध्ये दोन्ही सैन्यामध्ये तब्बल ७३ दिवस धुमश्चक्री सुरू होती.
लडाख असो नाहीतर अरुणाचल प्रदेश, भारताची कुरापत काढण्याची एकही संधी चिनी ड्रॅगन सोडत नाही. मात्र चिनी ड्रॅगनचं वळवळणारं शेपूट ठेचून काढण्याची क्षमता भारतीय सैनिकांमध्ये आहे आणि प्रत्येक हल्ल्यात भारतीय जवानांनी ते सिद्ध देखील करून दाखवलंय.
चिनी सीमावाद :-
चीनचा सीमावाद फक्त भारताबरोबरच नाही,तर चीनच्या शेजारी असलेल्या सगळ्याच देशांबरोबर आहे.रशिया,भारत ,पाकिस्तान ,नॉर्थ कोरिया ,व्हिएतनाम, अफगाणिस्तान,भूतान ,नेपाळ,लाओस,कझाकिस्तान,किर्गिस्थान,मंगोलिया,ताजिकिस्तान,म्यानमार या सगळ्याच शेजाऱ्यांसोबत चीनचा सीमाविवाद आहे.
इतकेच काय तर साऊथ चायना समुद्रात देखील साऊथ कोरिया,जापान,ब्रुनेई,मलेशिया,फिलिपिन्स, इंडोनेशिया या देशांसमवेत सागरी सीमा विवाद आहे. यातून कित्येक वेळा तणावाची परिस्थिती निर्माण होते.
चीनने आताच कुरापत काढण्याचे कारण काय ?
चीन मधील अंतर्गत कलह:-जगभरात कोरोनाची (Corona) चर्चा जवळपास संपलीये मात्र चीनमध्ये (China) खळबळ उडाली आहे, जनता रस्त्यावर उतरली आहे.याचे कारण म्हणजे कोविड-१९, ज्याचा प्रसार रोखण्यासाठी(zero covid policy) लागू करण्यात आलेल्या कठोर निर्बंधांविरोधात लोक संतप्त झाले आहेत.”राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हटवा, चिनी कम्युनिस्ट पक्ष हटवा, आम्हाला स्वातंत्र्य हवे आहे., आम्हाला मानवी हक्क हवे आहेत.” याउलट भारत कोरोनाचे संकट मागे सारून प्रगतीपथावर घोडदोड करतोय, ‘१०० दिवस कडक लोकडाउन असून सुद्धा भारतात एकही भूकबळी गेला नाही’ ही नव्या,समर्थ भारताची ताकद आहे.
आत्मनिर्भर भारत
भारत सरकार स्वदेशीकरणावर आणि देशांतर्गत उद्योगांकडून खरेदीवर भर देत शस्त्रे, दारुगोळा, लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर्स, क्षेपणास्त्र प्रणाली, युद्धनौका, पाणबुड्या, चिलखती वाहने, रडार, दळणवळण प्रणाली, टेहळणी प्रणाली इत्यादींसारख्या प्रगत लष्करी सामग्री देखील भारतातच बनवत आहे. त्यामुळे भारताची युद्ध सज्जता वाढली आहे.चीनला पर्याय फक्त भारत आहे हे चीन पक्के जाणून आहे.
सीमेसमीप रस्ते बांधणी आणि शस्त्रसज्जता
गेल्या ८वर्षात भारताने सीमारेषेजवळ मोठ्या प्रमाणात रस्ते व पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण केले आहे.पूर्वी सीमारेषेजवळ पोहोचणेच दैवदुर्लभ होते आता मात्र काही मिनिटांत लष्कराला सीमारेषेजवळ पोहोचता येते.
भारताने मोठ्याप्रमाणात घातक शस्त्रात्रे सीमेवर तैनात केली आहे, S -४००,आकाश सरफेस टू एअर मिसाईल,ब्राम्होस मिसाईल,७७७ हॉवित्झर,राफेल ,तेजस सारखी प्रगत विमाने…आणि भारतमातेसाठी प्राणार्पण करण्यास सिद्ध असलेला पोलादी सैनिक .. त्यामुळेच आता घुसखोरी करणे अशक्य होऊन बसले आहे
G- २० अध्यक्षता
G-२० ही जागतिक आर्थिक सहकार्याची प्रभावशाली संघटना आहे. हे जागतिक जीडीपीच्या सुमारे ८५ टक्के, जागतिक व्यापाराच्या ७६ टक्क्यांहून अधिक आणि जगाच्या सुमारे दोन तृतीयांश लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करते.अश्या ताकदवान G-२० परिषदेचे अध्यक्षपद आता भारताला मिळाले आहे.भारत G-२० चे सफल आयोजन करून जगाला आपले सामर्थ्य दाखवणार हे निश्चित..
सेमीकंडक्टर, रसायने, खते,लष्करी सामग्री, सौर तसेच नवीकरणीय ऊर्जा,मोबाईल निर्मिती, या आणि अश्या अनेक क्षेत्रात भारत उल्लेखनीय प्रगती करतोय त्यामुळे आपल्या पाताळयंत्री शेजाऱ्यांचा जळफळाट होणे स्वाभाविक आहे..
“A bad neighbor is a misfortune, as much as a good one is a great blessing.”