शत्रूला भस्मसात करणारे… महेश्वरास्त्र
भारताच्या शस्त्रसामुग्रीमध्ये आणखी एक शक्तीशाली अस्त्र सामील होणार
भारतीय संरक्षण खात्याकडून आत्मनीर्भरतेकडे वाटचाल करताना आणखी एका लांब पल्ल्याच्या विनाशकारी अस्त्राची घोषणा करण्यात आली आहे. लवकरच म्हणजे येत्या दीड वर्षात , महेश्वरास्त्र या घातक अस्त्राची चाचणी घेण्यात येईल. महेश्वरास्त्र म्हणजे भगवान शंकराच्या तिसऱ्या डोळ्याची शक्ती , ती जिथे पडेल तिथे राख झाल्याशिवाय राहणार नाही. महेश्वरास्त्र त्याच तोडीचे असेल.
महाभारतात दहा महाशक्तिशाली अस्त्रांचा उल्लेख आलेला आहे, त्यातीलच एक महेश्वरास्त्र.
१) नारायणास्त्र – हे श्रीविष्णुचेअस्त्र
२) पाशुपतास्त्र- भगवान शिव व महाकाली यांचे घातक अस्त्र.
३) महेश्वरास्त्र- भगवान शंकराच्या तिसऱ्या नेत्राची शक्ती सामावलेले अस्त्र.
४) ब्रह्मशीर्ष अस्त्र – ब्रह्मास्त्रा पेक्षा चारपट अधिक शक्तिशाली.
५) ब्रह्मांड अस्त्र – संपूर्ण सौरमंडलाला नष्ट करण्या इतके शक्तिशाली.
६) ब्रह्मास्त्र- मानवी इतिहासातील सर्वात विनाशकारी व अचूक अस्त्र.
७) नागअस्त्र- सर्प रूप धारण करणारे अस्त्र .
८) वासवी शक्ती- इंद्रदेवाचे अस्त्र, कर्णाने कवचकुंडलाच्या बदल्यात इंद्र देवाकडून प्राप्त केले. याचा एकदाच उपयोग होऊ शकत होता.
९) वरुण अस्त्र – वरुण देवाचे अस्त्र , प्रतिष्ठित योद्ध्यांकडे हे अस्त्र होते.
आणि दहावे सुदर्शनचक्र हे सर्वात प्रभावी व परिणामकारक घातक अस्त्र. जे युद्धात वापरणार नाही असे भगवान श्रीकृष्णांनी सांगितले होते.
अग्नि ५च्या धडकी भरवणाऱ्या यशस्वी चाचणीनंतर लगेचच सरकारने महेश्वरास्त्र या घातक अस्त्राचे सुतोवाच केले.
या अस्त्राची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे:-
- दीड वर्षात बनवून तयार होईल, ३०० कोटींची तरतूद
- वेग हेच वैशिष्ट्य , ध्वनीच्या चारपट वेग
- ५६८० किलोमीटर प्रतितास इतका वेग असेल
- एका सेकंदात दीड किलोमीटर इतका प्रचंड वेग
- ही एक गायडेड रॉकेट सिस्टीम आहे
- कोणत्याही ऋतूत व कोणत्याही भौगोलिक क्षेत्रात हे मारा करू शकतील
- त्यावर पारंपरिक हत्यारं लावली जातील. सैन्याची तुकडी, बंकर , टॅंक, वाहनांना उडवण्यासाठी याची मदत होईल.
यात दोन प्रकार आहेत एक महेश्वरास्त्र १ व दुसरे महेश्वरास्त्र २;-
महेश्वरास्त्र १
५.७ मीटर लांबीचे व ०.६२ मीटर व्यासाचे आहे, याची मारक क्षमता १५० किलोमीटर पर्यंतची आहे.
महेश्वरास्त्र २
७.६ मीटर लांबीचे व ०.३२ मीटर व्यासाचे असेल याची मारक क्षमता २९० किलोमीटर इतकी असेल. हे ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या तोडीचे असेल.
याला देशी हिमार्स ( Desi HIMARS) असेही म्हणता येईल.
ही दोन्ही व्हर्जन मल्टिपल रॉकेट लॉंचर सिस्टीमवरुन डागली जातील. टॅक्टिकल बॅलेस्टिक मिसाईल सिस्टीममध्येही त्यांची गणना केली जाऊ शकते. MI42( High Mobility Artiller Rocket System) प्रमाणेच हे असेल. आता भारताला मल्टिपल रॉकेट सिस्टीम खरेदी करण्याची आवश्यकता नाही . ज्या आधीच्या आहेत त्याच अपग्रेड केल्या जातील. नवीन सिस्टीम देशातच तयार केल्या जातील. त्यामुळे संरक्षण विभागाचा खर्च कमी होईल व देशांतर्गत कंपन्यांना लाभ मिळेल .
सोलर इंडस्ट्रीज ही कंपनी हे रॉकेट सिस्टीम तयार करते आहे.
सध्या आपल्याकडे पिनाका गायडेड रॉकेट सिस्टीम मारक क्षमता ७५ किलोमीटर आणि सरफेस टू सरफेस मिसाईल ज्याची मारक क्षमता ३५० किलोमीटर आहे. त्यांच्या मधल्या अस्त्राची भारताकडे कमतरता आहे.महेश्वरास्त्र रॉकेट गायडेड सिस्टीम या दोन अस्त्रांच्या मधल्या क्षमतेचे असेल. भारताच्या या नव्या अस्त्रामुळे पाकिस्तान व चीन या देशासोबत असलेल्या सीमा अधिक सुरक्षित करणे शक्य होईल.
चीन व पाकिस्तानने आपल्याला वाकुल्या दाखवल्यास भारत आता महेश्वरास्त्राच्या माध्यमातून आपले तिसरे नेत्र उघडेल आणि पाकिस्तान व चीनच्या सीमेलगतचे बंकर , टँकर ,सैनिकी तुकडी, वाहनं यांची राख रांगोळी करायला भारताला वेळ लागणार नाही.