CultureEnvironmentNews

श्री सम्मेद शिखरासाठी जैन समाजाचा संघर्ष

झारखंड सरकारने तीर्थक्षेत्र स्थळांच्या सूचीतून श्री सम्मेद शिखरचे नाव वगळले असून त्याला पर्यटन स्थळाचा दर्जा दिला आहे. मात्र अजून याची शासकीय अधिसूचना (GR) निघायची आहे.

जैन (Jain) समाजातील ऋषीमुनींनी सांगितले आहे की, जैन समाज हा देशाच्या एकूण लोकसंख्येच्या जनतेन १ टक्का आहे, पण तो देशाच्या एकूण कराच्या २४ टक्के कर भरतो,

झारखंड (Jharkhand )सरकारच्या ‘श्री सम्मेद शिखरजी’ हे पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्याच्या निर्णयाविरोधात जैन समाजाने आज मुंबईत जोरदार निदर्शने केली. वास्तविक, श्वेतांबर तसेच दिगंबर जैन समाजाचे पवित्र तीर्थस्थान श्री भगवान पारसनाथ पर्वताला झारखंड सरकारने पर्यटन स्थळ घोषित केले आहे, त्यामुळे नजीकच्या भविष्यात तेथे मांसाहारी हॉटेल्स,बार सुरू होऊ शकतात. या अविचारी बदलामुळे जैन समाज संतप्त झाला असून आंदोलनासाठी रस्त्यावर उतरला आहे. या निर्णयाच्या विरोधात संपूर्ण देशात आंदोलने होत असून याचे लोण आता महाराष्ट्रात देखील पोहचले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात जैन बांधवांनी व्यवसाय बंद ठेवत आपला निषेध नोंदवला आहे.

यासंदर्भात आंदोलकांच्या शिष्टमंडळाने महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन दिले आहे. आंदोलकांचे म्हणणे आहे की ते झारखंड सरकारने श्री सम्मेद शिखराला पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्याच्या विरोधात आहेत. यामुळे जैन समाजाच्या भावना दुखावल्या जाणार आहेत. यामुळे तीर्थक्षेत्राचे नुकसान होईल. झारखंड सरकारने हा अविवेकी निर्णय तात्काळ मागे घेण्याची मागणी आंदोलक करत आहेत.

का होतोय विरोध?

तीर्थक्षेत्र असल्यामुळे श्री सम्मेद शिखराच्या आजूबाजूच्या परिसरात मांस आणि अल्कोहोलची विक्री आणि खरेदी करण्यास कायदेशीर मनाई आहे. मात्र आता तीर्थक्षेत्र स्थळाचा दर्जा जाऊन त्याला पर्यटन स्थळ घोषित केल्या नंतर जैन समाजाची तत्वे न मानणाऱ्या लोकांची येथे गर्दी वाढेल असे या मंदिराशी संबंधित लोकांचे मत आहे. मांस आणि दारूचे सेवन करणारे पर्यटक येथे येऊ लागतील. या अनुषंगाने त्या ठिकाणी नॉनव्हेज हॉटेल्स, पब, बार व इतर अशा बऱ्याच बाजार व चैनीच्या प्रथा सुरू होतील की ज्या अहिंसा तत्वाच्या एकदम विरुद्ध असणार आहेत. धांगड-धिंगा आणि मद्यपी पर्यटकांमुळे उपासनेला,श्रद्धेला बाधा पोहोचणार असल्याने पर्यटन स्थळ घोषित करणाऱ्या निर्णयाचा प्रचंड विरोध होत आहे.

जागतिक पातळीवर जैन समाज हा शांतताप्रिय व अहिंसा तत्वाला मानणारा आहे. जैन समाजातील प्रत्येक व्यक्ती आयुष्यात एकदा तरी श्री सम्मेद शिखरजी येथे जाऊन, २० तीर्थंकर पवित्र मोक्ष भूमीवर पहाड वंदना अनवाणी पायांनी करण्याची इच्छा बाळगतो. परंतु झारखंड सरकारच्या सदर निर्णयामुळे जैन समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र भूमीचे पावित्र्य धोक्यात आले असून जैन समाजाच्या अस्मितेवर घाला घालायचा हा नीच प्रयत्न आहे.

पारसनाथ हिल्स तब्बल १२ हजार ५०० एकरवर पसरलेलं आहे. जैन सांप्रदायिकांचे म्हणणे आहे की, जर पारसनाथ हिल्सला पर्यटन क्षेत्र घोषित केले केले तर त्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना मांसाहार आणि मद्यपान करण्याची मुभा मिळेल. यामुळे श्री सम्मेद शिखरजीचं पावित्र्य नष्ट होईल, यामुळे अहिंसक जैन धर्मीय लोकांच्या आस्थेला, श्रद्धेला आणि उपासनेला धक्का बसेल. त्यामुळे पारसनाथ हिल्सला पर्यटन स्थळ घोषित करण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा.

2019 मध्ये इको-सेन्सिटिव्ह झोन :-

2019 मध्ये केंद्र सरकारने श्री सम्मेद शिखरला इको-सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित केले. यानंतर मात्र झारखंड सरकारने जिल्हा प्रशासनाच्या शिफारशीवरून त्याला पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्याचा ठराव जारी केला. राज्यातील पर्यटन वाढवण्यासाठी झारखंड सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. झारखंड सरकारने हा निर्णय घेण्यामागे केंद्र सरकार विरुद्धची त्याची राजकीय विरोधाची सूडबुद्धी असल्याचे कुठेतरी जाणवते.

श्री सम्मेद शिखराचे महत्त्व :-

श्री सम्मेद शिखरजीचं महत्व सुरु होतं जैन संप्रदायाच्या स्थापनेपासून…

जैन धर्माचे संस्थापक ऋषभ देव यांच्यानंतर अजितनाथजी हे जैन संप्रदायाचे तीर्थंकर झाले. त्यांनी दिव्य ज्ञान प्राप्तीसाठी श्री सम्मेद शिखरजीवर तपस्या केली. ज्ञानप्राप्तीनंतर त्यांनी जैन संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केला आणि शेवटी याच शिखरावर त्यांना मोक्षपद प्राप्त झालं.

अजितनाथ जी यांच्यासह एकूण २० तीर्थंकरांनी याच श्री सम्मेद शिखरावर दिव्य ज्ञानाची प्राप्ती करून मोक्ष प्राप्त केला. याला अपवाद फक्त जैन संप्रदायाचे पहिले तीर्थंकर ऋषभदेव, १२ वे तीर्थंकर वासुपूज्य जी, २२ वे तीर्थंकर अरिष्ठनेमीजी आणि २४ वे तीर्थंकर वर्धमान महावीर. या तीर्थंकरांचा अपवाद वगळला तर उर्वरित सर्व तीर्थंकरांनी श्री सम्मेद शिखरजीवर मोक्ष प्राप्त केला आहे. यात २३ वे तीर्थंकर पारसनाथ यांचा देखील समावेश आहे.

जैन धर्मातील आख्यायिकांनुसार श्री सम्मेद शिखराचं महत्व :-

जैन वाङ्मयानुसार जगाच्या निर्मितीनंतर सर्वात आधी दोन ठिकाणे अस्तित्वात आली होती; त्यात पहिलं ठिकाण म्हणजे श्री सम्मेद शिखरजी आणि दुसरं ठिकाण म्हणजे अयोध्या. श्री सम्मेद शिखरजीची यात्रा केल्यास माणसाला पशु योनी प्राप्त होत नाही. पुढची ४९ जन्म माणूस सांसारिक कर्मबंधनांच्या फेऱ्यापासून मुक्त राहतो, असं मानलं जातं.

जैन तीर्थंकरांसोबत अनेक जैन मुनींनी याच ठिकाणी दिव्य ज्ञान आणि मोक्षपद प्राप्त केलं आहे. त्यामुळे या ठिकाणी २० तीर्थंकरांची मंदिरं बांधण्यात आलेली आहेत. त्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने जैन सांप्रदायिक श्री सम्मेद शिखरजीला भेट देतात आणि या शिखराच्या सभोवताली २७ किमी लांब प्रदक्षिणा करतात.

जैन सांप्रदायिकांची मान्यता आहे की, तीर्थंकरांच्या प्रभावामुळे सिंह,वाघ, अस्वल यांसारख्या हिंस्त्र पशूंचा हिंसक व्यवहार देखील श्री सम्मेद शिखरजीवर शांत होतो. यामुळे या ठिकाणचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे.

जैन समाज हा भारतातील प्रमुख व्यापारी समाजांपैकी एक आहे. व्यापारासोबतच राजकारण आणि समाजकारण क्षेत्रात देखील जैन सांप्रदायिकांचा लक्षणीय प्रभाव आहे. जैन समाज काटेकोरपणे शाकाहाराचे नियम पाळतो. यासाठी “पर्यषुण” काळात वेगवगेळ्या शहरांमध्ये मांसाहाराची दुकाने बंद ठेवण्याची मागणी देखील केली जाते. अगदी घरासमोर मांसाहाराच्या जाहिराती असल्यावर देखील जैन सांप्रदायिक त्याला कोर्टात आव्हान देत असल्याचे दिसते. परंतु आता थेट जैन सांप्रदायिकांच्या सर्वात पवित्र तीर्थस्थळीच मांसाहार आणि मद्यपान होण्याची शक्यता असल्यामुळे जैन समाजाकडून या निर्णयाचा कठोर विरोध केला जात आहे.

जैन समाज हा अतिशय शांतता प्रिय समाज आहे. त्याला दुखावण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न तर नाही ना?

अहिंसा आणि शांततेला आपली जीवन मूल्ये मानणाऱ्या जैन समाजाला झारखंड सरकार दुर्बल तर समजत नाही ना?

‘श्री सम्मेद शिखरजी’ हे पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्याच्या या निर्णयामागे ख्रिश्चन मिशनरी तर नाहीत ना ?

अशी शंका येण्याचे कारण म्हणजे झारखंड सरकारच्या छत्रछायेत राजरोसपणे होणारे ख्रिस्ती कन्वर्जन अर्थात धर्मांतरण (conversion). झारखंडमध्ये ख्रिस्ती धर्मांतराचा क्रूर खेळ सुरू आहे. गोरगरिब वनवासी बांधवांना आमिष दाखवून धर्मांतर केले जात आहे. गरीब,दीनदुबळ्या लोकांना आमिष दाखवून त्यांना धर्म बदलण्यासाठी धमकावण्यात येत आहे. आणि झारखंड सरकार हे सगळे उघड्या डोळ्यांनी बघते परंतु काहीही कारवाई करत नाही.

आमचा इतकाच सल्ला आहे की, झारखंड सरकारने आपली ही सूडबुद्धी वापरायचीच असेल तर ख्रिस्ती धर्मांतरावर आणि ते करत असलेल्या ख्रिस्ती मिशनऱ्यांवर खर्च करावी. ‘श्री सम्मेद शिखरजी’ हे जैन समाजाच्या परम आस्थेचे प्रतीक आहे. त्यावर वक्र दृष्टी ठेवू नये. अन्यथा आपणास त्याची जबर किंमत मोजावी लागेल हे निश्चित.

कारण संपूर्ण हिंदू समाज आत्म-सन्मानासाठी एकवटतो आहे…

Back to top button