जिथे समाधीस्थ विश्वाची माऊली… तिथेच धर्माची काहीली..

आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव ।
आळंदीत धर्मांतराच्या धक्कादायक प्रकारानंतर गुन्हा दाखल!
संत ज्ञानेश्वर ( sant dnyaneshwar)महाराजांचे समाधीस्थळ असलेले आळंदी हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. आळंदीचा उल्लेख अलंकापुरी, अलंकावती या नावाने सुद्धा केलेला सापडतो. याला देवाची आळंदी असेही म्हणतात. वारकरी भक्तांसाठी तसेच समस्त मराठी जनांसाठी आळंदीला मोठे महत्त्व आहे. पंढरपूर, आळंदी, देहू या तीन क्षेत्रांना महाराष्ट्राची त्रिस्थळी म्हटले जाते. ज्ञानेश्वरांनी वयाच्या १९ व्या वर्षी आळंदी येथे १२१८ साली संजीवनी समाधी घेतली. त्यानंतर समाधी स्थानी १५४० साली भव्य समाधी मंदिर बांधण्यात आले.
याच आळंदीत (aalandi ) आज धर्मांतर करण्याची धक्कादायक घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आळंदीच्या साठेनगर परिसरात एका घरातील काही व्यक्तींना ख्रिश्चन धर्माविषयीची माहिती देण्यात येत आहे, तसेच व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या महिलेच्या हातामध्ये एक ताट असून त्यात लाल रंगाचं पाणी असलेले ग्लासही दिसत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे लाल पाणी म्हणजे द्राक्षाचं पाणी असून ते येशूचं रक्त म्हणून दिलं जात असल्याचं समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, रीतसर तक्रार दाखल करून पोलिसांनी ३ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात उद्धव नागनाथ कांबळे यांनी याबाबत तक्रार दिली आहे. येशूचं रक्त म्हणून द्राक्षाचं पाणी दिल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. त्यानंतर सुधाकर बाबुराव सूर्यवंशी याच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सुधाकर बाबुराव सूर्यवंशी हा त्याच्या दोन साथीदारांसह काही स्थानिकांना “ख्रिश्चन( christian)धर्माच्या प्रार्थनेने तुमचे आजार बरे करतो, तुम्ही येशूची पूजा करा, तुमच्या आर्थिक आणि आरोग्याच्या समस्या दूर होतील, हिंदू (hindu) धर्म सोडून तुम्ही ख्रिश्चन धर्म स्वीकारा” असा आग्रह करत असल्याचं पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.
देवाच्या आळंदीत घडलेली ही धर्मपरिवर्तनाची घटना काळीज पिळवटून टाकणारी आहे. तुमचे देव फेकून द्या, मातंग समाजाचे देव भंगार आहे, तुमचे देव टाकून दिले तर तुम्हाला दवाखान्यात जाण्याची गरज नाही असं म्हणत त्यांनी येशूचं रक्त म्हणून अनेकांना द्राक्षाचं पाणी पाजल्याचा प्रकारही केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. आम्ही तुम्हाला आजारांपासून बरं करु, येशू ख्रिस्तांकडे चांगले मंत्र आहेत, आमच्या प्रार्थना श्रेष्ठ आहे, असं सांगून तक्रारदार आणि त्यांच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना भावनिक व मानसिक त्रास दिला आहे.
ख्रिश्चन धर्मप्रसार( conversion)आता आपल्या उंबरठ्यापर्यंत पोहोचला आहे. या धर्मांध ख्रिश्चन मिशनरी लोकांना वेळीच अटकाव नाही केला हिंदू संस्कृतीचे फार मोठे नुकसान होईल यात शंका नाही. म्हणूनच आपण सदैव सचेत राहून आपल्या आजू-बाजूला घडणाऱया घटनांवर लक्ष ठेवले पाहिजे…
वेळीच सावध होऊन तक्रार करणा-या उद्धव नागनाथ कांबळे कौतुकच आहे. पण हे हिमनगाचे टोक ठरु नये. अन्य अनेक मार्गांनीही मिशनरी आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नशील असतीलच. पोलिसांनी त्यांना शोधून ताब्यात घ्यायला हवे. तरच यावर थोडा चाप बसू शकेल .

भोळ्या भाबड्या नागरिकांना सहजपणे फसवून धर्मांतरित करता येऊ शकते. प्रसंगी बळजबरीने देखील धर्मांतरित करता येऊ शकते , हे या धर्मांध ख्रिश्चन मिशनरींनी ओळखले आणि मिशनऱ्यांच्या टोळधाडी भारताच्या कानाकोपऱ्यात पसरल्या. मोठ्या प्रमाणात गरीब आणि दलित समाजामध्ये तसेच मुख्य प्रवाहापासून दूर असणाऱ्या वनवासी बंधूंना धर्मांतरित करणे त्यांना सोपे होते. तसेच या सर्व कार्यासाठी त्यांना युरोपमधून आणि व्हॅटिकन सिटी येथून मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य होत असते.
आता हेच बघा ना… ईशान्य भारतातील जनजाती विशेषतः नागालँड मधील नागा, मिझोरम मधली मिझो, मणिपूर मधील तांगखुल नागा , मेघालयातील खासी, गारो, जयंतीया या आणि अशा अनेक जनजाती जवळपास पूर्णपणे ख्रिश्चन झालेल्या आहेत. त्यामुळेच तेथे फुटीरतावादी चळवळी, देश विघातक आंदोलने वेळोवेळी डोके वर काढत असतात.
स्वातंत्रवीर सावरकरांच्या शब्दात सांगायचे झाल्यास ,“धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर..”

धर्मांध ख्रिश्चन मिशनरी( christian missionaries)विल्यम पॅटीग्रिव्ह (willam pettigrew) १८९४ साली मणिपूर मधील उरखुल जिल्ह्यात दाखल झाला आणि १९८० पर्यंत संपूर्ण तांगखुल नागा जमाती ख्रिश्चन झालेली होती.
याला कारण देशातील उर्वरित ग्रामावासी, शहरवासी हिंदू समाज या सुदूर जंगलात राहणाऱ्या जनजातींशी समरस झालाच नाही. आपसात गाठीभेटी नाहीत, येणेजाणे नाही, सुखदुःखाच्या गोष्टी नाहीत की संकटात धाऊन जाणे नाही… हिंदू असल्यामुळे जो एक नैसर्गिक बंधुत्वाचा भाव पाझरायला हवा होता… तो कधी पाझरलाच नाही.
पोलिसी(police) कारवाईने धर्मांतराचे प्रमाण कमी जरूर होईल पण पूर्णपणे थांबेल असे भोळ्या भाबड्या हिंदूंनी कदापि समजू नये. त्यासाठी हिंदू समाजातील समरसतेसाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे.
शेवटी आपल्या मनात काही प्रश्न उद्भवतात;
- हिंदूंना ३३ कोटी देव कमी पडायला लागले की काय ??
- गेली ८०० वर्ष ज्या माऊलींनी आपल्याला सांभाळले; ते आता अचानक नकोसे का झाले ??
- असा कोणता रोग आहे जो ज्ञानेश्वर माऊली बरा करू शकत नाहीत आणि येशू बरा करू शकतो ??
आज आळंदीत उद्या अयोध्येत (ayodhya) हे धर्मांध ख्रिश्चन मिशनरी धुमाकूळ घालणार नाही कशावरून म्हणूनच सुजाण नागरिकांनी सरकारच्या निदर्शनास या प्रकारच्या हालचाली आणून दिल्या पाहिजेत. त्यामुळे या सर्व प्रकारास खीळ बसू शकेल आणि एकूणच धर्मांतराच्या बाबतीत आपण जागरूक झाल्यामुळे भविष्यात लबाडीने वा लपवाछपवीकरुन धर्मांतरित करण्याचे प्रमाण घटवता येईल.
“जागृत, संघटित आणि समरस हिंदू समाज” हेच या धर्मांतर रुपी कठीण प्रश्नाचे कायम स्वरुपी सोपे उत्तर आहे…