विक्रांत युद्धनौका प्रतिकृती प्रदर्शनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन
ओरायन मॉल, पनवेलच्या माध्यमातून संस्कार भारतीने(sanskar bharti ) राष्ट्रभक्तीची ज्योत जशी पनवेल परिसरात चेतवली तशीच ती महाराष्ट्रभर चेतवावी या उद्देशाने स्वामी विवेकानंद जयंती म्हणजेच युवक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने विक्रांत युध्दनौकेच्या(INSVikrant) प्रतिकृतीचे प्रदर्शन त्रिमूर्ती प्रांगण, नवीन इमारत, मंत्रालय येथे भरवले आहे. हे प्रदर्शन दि. १२.०१.२०२३ ते दि.२०.०१.२०२३ आयोजित केले आहे. प्रदर्शनाचा उद्घाटन सोहोळा मा. उप मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस(DevendraFadnavis) यांच्या उपस्थितीत मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे (eknathshinde)यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करुन करण्यात आला. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, आमदार दादा भुसे आणि आमदार संजय शिरसाट कार्यक्रमात उपस्थित होते.
उद्घाटन सोहोळ्यास आणि प्रदर्शनास शुभेच्छा देण्यासाठी श्री. विजय वडेरा, अध्यक्ष नेव्ही फाउंडेशन, मुंबई चॅप्टर, श्री. राजदत्तजी, ज्येष्ठ दिग्दर्शक आणि संस्कार भारती केंद्रीय संरक्षक, श्री. वासुदेवजी कामत, आंतरराष्ट्रीय किर्तीचे चित्रकार आणि संस्कार भारती अखिल भारतीय अध्यक्ष, श्री. सुनिल बर्वे, अध्यक्ष, संस्कार भारती, कोकण प्रांत आणि श्री. मुकुंद मराठे, कार्याध्यक्ष, संस्कार भारती, कोकण प्रांत, तसेच ओरायन मॉल, पनवेल, एम पी ग्रुपचे श्री. मंगेश परुळेकर आणि श्री. दिलीप करेलिया उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रसिध्द गायिका महाराष्ट्राची लिटल चॅम्प कु. मुग्धा वैशंपायन हिच्या स्वरांनी झाली . श्री अनिरुध्द भिडे आणि श्री. आदित्य उपाध्ये यांनी साथ दिली . डॉ. स्मिता आपटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले .
सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुवीरजी आंग्रे यांनी शिवरायांचे आरमार याविषयी माहिती दिली.
राष्ट्रभक्ती, देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि सामरीक स्वातंत्र्याचे यशस्वी उदाहरण असलेली विक्रांत युद्धनौका(warship) आणि तिच्या प्रतिकृतीच्या प्रदर्शनाला जनतेचा उदंड प्रतिसाद लाभत आहे.
संस्कार भारती, ही एक देशव्यापी सांस्कृतिक संस्था आहे. संस्थेची स्थापना सन १९८१ मध्ये झाली. तेव्हापासून संस्था कलेच्या आणि निरनिराळ्या कार्यक्रम व प्रकल्पांच्या माध्यमातून कला व संस्कृती जतन, संरक्षण व संवर्धनाचे कार्य संपूर्ण देशभर सातत्याने अविरत करीत आहे. स्वतंत्र भारताला सक्षम राष्ट्र बनविण्याच्या हेतूने नागरिकांना प्रोत्साहन देणारे, राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रभक्ती रुजविणारे सांस्कृतिक कार्यक्रम संस्कार भारती सादर करते.