
उत्तराखंडमधील (uttarakhand)जोशीमठला विशेष महत्त्व आहे. चमौली जिल्ह्यातील बद्रीनाथच्या(badrinath) पायथ्याशी असलेल्या याच जोशीमठातील घरांना अचानक भेगा पडण्यास सुरूवात झाली. अनेक भागांत जमिनीला मोठे तडे गेले आहे, घरांच्या भिंती खचल्या तर, भूगर्भातून पाणी बाहेर येत आहे. सतत होणाऱ्या भूस्खलनामुळे( Joshimath sinking) नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जोशीमठांची सध्याची परिस्थिती:-
जोशी मठाची(joshimath) जमीन अचानक पसत असल्यानं इथले नागरिक घाबरून गेले आहेत. जमीनीला आणि घरांना भेगा पडत आहेत. लोक जीव मुठीत घेऊन दिवस काढत आहेत.जोशीमठ गावात ४,५०० इमारती आहेत. त्यापैकी ६१० इमारतींना भेगा पडल्याने त्या धोकादायक बनल्या आहेत. अन्य इमारतींचे सर्वेक्षण सुरू असून धोकादायक इमारतींची संख्या वाढण्याची भीती आहे. यांच भितीमुळे लोक रात्री मोकळ्या अंगणात आभाळाच्या छत्रछायेखाली आपली रात्र काढत आहेत.
जोशी मठात जमीन धसण्याची ही पहिली घटना नाही. या अगोदर ७० च्या दशकातही इथं जमीन घसत होती. याची कारण शोधण्यासाठी १९७० मध्ये गढवालचे कमिशर महेश मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली समितीची नेमणूक केली. या समितीने १९७८ मध्ये दिलेल्या अहवालात जोशी मठ, नीती आणि माना घाटीत मोठ्या परियोजना सुरु करु नये, असा अहवाल समितीने दिला होता. मात्र, अहवालाला केराची टोपली दाखवत या ठिकाणी बांधकाम सुरुच होत.ISRO आणि ONGC ला जोशी मठांचा सर्वे करण्याचा आदेश सरकारने दिले आहेत.

जोशीमठ नेमकं आहे तरी काय ?
‘गेटवे ऑफ हिमालय’ नावानं प्रसिद्ध असलेले जोशीमठ हे उत्तराखंडचे एक पवित्र धार्मिक ठिकाण आहे. जे समुद्रसपाटीपासून २५०० ते ३०५० मीटर उंचीवर आहे. उत्तराखंड जिल्ह्यातील चमोली जिल्ह्यात आदि शंकराचार्य यांनी स्थापलेले हे तिर्थस्थळ आहे. जोशीमठचे प्राचीन नाव कार्तिकेयपूर होते. त्यावेळी जोशीमठ हे कात्युरी राजाची राजधानी होती. जेव्हा आदि शंकराचार्य चार धामांच्या स्थापनेसाठी भ्रमण करत होते, त्यावेळी त्यांनी जोशीमठातील तूतीच्या झाडाखाली तप केले आणि येथे ज्योतिषाचे ज्ञान प्राप्त केले. म्हणूनच जोशीमठला ज्योतिमठ आणि ज्योतिषपीठ म्हणूनही ओळखले जाते. शंकराचार्यांनीही येथे भगवान नरसिंहाची मूर्ती स्थापन केली होती. कारण जोशीमठ हे भगवान नरसिंहाचे तपस्थानही मानले जाते. पूर्वी जोशीमठ समुद्रात वसले होते अशी आख्यायिका आहे. जेव्हा ते पर्वताच्या रूपात उभे राहिले, तेव्हा भगवान नृसिंहांनी हे आपले तपस्थळ बनवले, असे ही सांगितले जाते.
जोशीमठचा रामायण-महाभारत काळाशी संबंध-
रामायण(ramayan) काळात हनुमानाचे जोशीमठ येथे आगमन झाले होते, अशी आख्यायिका जोशीमठाबाबत आहे. जेव्हा लक्ष्मण मेघनादाच्या शक्तीबाणाने बेशुद्ध झाले होते, तेव्हा संजीवनी बूटीच्या शोधात हनुमान येथे आले होते. हनुमानास रोखण्यासाठी रावणाने कालनेमी नावाच्या राक्षसाला पाठवले, जोशीमठातच हनुमानाने कालनेमीचा वध केला.

कालनेमीला हनुमानाने(hanuman) जीथे मारले भूमी आजही लाल मातीसारखी दिसते. महाभारत काळात येथे हनुमानाने पांडवांना दर्शन दिले होते. अज्ञातवासातून स्वर्गाच्या प्रवासादरम्यान पांडव जोशीमठात गेले होते, अशीही एक मान्यता आहे. या घटनेची आठवण म्हणून आजही लोक कापणीनंतर पांडव नृत्य करतात.
जोशीमठातील कलियुगाची भविष्यवाणी काय सांगते ?
काही पौराणिक कथांनुसार, नृसिंह वदरी मंदिरात स्थापन केलेल्या नृसिंहाच्या मूर्तीतील डाव्या बाजूचा हाताचा सृष्टीवर ओढावणाऱ्या संकटाशी संबंध असल्याचे सांगितले जाते. या मंदिरातील स्थापित मूर्तीतील डाव्या बाजूचा हात हळूहळू बारीक होत चालला आहे. ज्या दिवशी हा हात पूर्णपणे अदृश्य होईल, त्यादिवशी सृष्टीचा अंत होईल, अशी मान्यता आहे. या मंदिरातील स्थापित भगवान नृसिंहांची ही स्वयंभू मूर्ती असून, ती शाळीग्रामपासून तयार झालेली असल्याचे सांगितले जाते.

जोशीमठाचं महत्त्व काय ?
जोशीमठ शहर देशातील पुरातन शहरांपैकी एक आहे. हे शहर ऋषिकेश-बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वर आहे. बद्रीनाथ, ओली आणि हेमकुंड साहिबला जाणाऱ्या पर्यटकांना निवान्यासाठी हे सोयीचं ठिकाण आहे. पर्यटक रात्री येथे थांबतात. याशिवाय सैन्यासाठीही हे महत्त्वाचं ठिकाण आहे. जोशी मठाचं फक्त धार्मिक, पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व नाही तर जोशी मठापासून तिबेट आणि भारताच्या सीमेचं अंतर फक्त १०० किलोमीटर आहे. भूस्खलनाचं प्रमाण असंच वाढत राहिलं तर जोशी मठ परिसरात भारतीय सेनेचं असलेलं मुख्यालय आणि या भागात तैनात असलेले ITBP च्या बटालियनला देखील फटका बसू शकतो. रस्ते खराब झाल्यानं सैन्यांना देखील मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागू शकते.
स्थानिक नागरिकांचं म्हणणं काय ?

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील जोशीमठ शहरात घरांना तडे जाण्याला स्थानिक नागरिकांनी या परिसरात सुरू असलेल्या जलविद्युत प्रकल्प आणि भूगर्भातील बांधकामे जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केला आहे. जोशी मठाची जमीन घसत असल्यानं इथले जनजीवन विस्कळीत झालं आहे. ज्योतिषपीठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. प्रभावित क्षेत्रातील लोकांना अर्थसहाय्य व संपत्तीचा विमा उतरवण्याची याचिकेत मागणी केली आहे. तर औद्योगिकरणामुळे अशा घटना घडत असल्याचा याचिकाकत्यांनी आरोप केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी घरांचं नुकसान झालं आहे अशा नागरिकांसाठी शहरात पुनर्वसन केंद्र स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय मंत्रालय सचिवालयात याबाबत एक उच्चस्तरीय बैठकही घेण्यात आली आहे.
जोशीमठ हे शहर का खचत चाललंय ?
गेल्या अनेक वर्षांपासून इथल्या परिसरात जलविद्युत प्रकल्प, रस्ते रुंदीकरण आणि इतर बांधकामं वाढलेत तसेच मिश्रा समितीसह अनेक तज्ञांनी अभ्यास करून सरकारला केलेल्या शिफारशीत जोशीमठ परिसरातील जंगलतोड थांबवावी. जंगलतोडीमुळे मातीची धूप आणि भूस्खलन वाढलं आहे. असे सांगितले होते. मात्र ही जंगलतोड थांबली नाही. तसेच रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी किंवा दुसऱ्या कोणत्याही कामांसाठी खोदकाम किंवा ब्लास्ट करू नये, असे सांगून हो वारंवार होणाऱ्या खोदकामाचा ही परिणाम जोशीमठावर होतोय. त्यामुळे झाडं आणि गवताचं पुन्हा एकदा रोपण करावं, असे ही तज्ज्ञ सांगतात. पण वृक्षारोपण केलं गेले नसल्याने आज हे संकट जोशीमठावर हे ओढावले आहे.
वरील विवेचनातून आपल्या लक्षात आलंच असेल की हा प्रश्न फक्त विकास कामांमुळे नव्हे तर चंगळवादी विचारसरणीतून उद्भवलेला आहे. चारधाम यात्रेतील एक प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या बद्रीनाथचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तराखंडमधील जोशीमठला विशेष महत्त्व आहे. या शहराची लोकसंख्या सुमारे १६ हजार असली तरी धार्मिक स्थळ आणि ट्रेकिंगसाठी येणाऱ्यांमुळे या भागात कायम वर्दळ(वर्षभरात जवळपास २५००००) असते. शिवाय चीनच्या सीमेपासून जवळच असल्याने हा भाग संवेदनशील मानला जातो. त्यामुळे येथे लष्कराचा (गढवाल रेजिमेंट ) तळही उभारण्यात आला आहे.

चारधाम(chardham) यात्रेला “टूर” चे स्वरूप आले आणि धार्मिक पर्यटनाला वेगळे रूप प्राप्त होण्यास सुरुवात झाली. चार धाम यात्रा ‘ममत्व भाव’ सोडून “इदं न मम..” पर्यंत पोहोचण्याचा प्रवास आहे हे मर्मच आपण विसरलो.
जोशी मठ स्ट्रॅटेजिकली अत्यंत महत्त्वाचे आहे कारण ते चायना बॉर्डर जवळ आहे. शत्रु आपल्यावर आक्रमण करेल म्हणून कुठल्याही प्रकारची विकास काम न करणे म्हणजे निरगुद्धपणाचेच, बिनडोक पणाचे लक्षण होते. आता या धोरणात मोठ्या प्रमाणावर बदल झाला आहे. रस्ते,महामार्ग,विकास कामे आवश्यकच आहेत कारण आपला शत्रू हा कपटी असून पाठीमागून वार करण्यातच हुशार आहे.
जोशी मठ घटना एक अनुपम संधी आहे, विकास कामांना दोष न देता पर्यावरण संवर्धन कसे होईल याचाच सखोल विचार होणे आवश्यक आहे.
देवि सुरेश्वरि भगवति गङ्गे त्रिभुवनतारिणि तरलतरङ्गे ।
शङ्करमौलिविहारिणि विमले मम मतिरास्तां तव पदकमले ॥