HinduismNews

बंजारा कुंभातून साध्य काय झालं?

25 ते 30 जानेवारी या काळात भव्य दिव्य असा हिंदू बंजारा, (hindu banjara)लबाना आणि नायकडा समाजाचा कुंभ गोद्री(godri) येथे पार पडला. ऐतिहासिक असा हा कुंभ ठरला. इथे येणारा प्रत्येक बंजारा व्यक्ती हरखून गेला. इतकं मोठं नियोजन आपल्या समाजासाठी आहे, आपल्या रक्षणासाठी आहे याची पुरती जाणीव प्रत्येकाला झाली. आतापर्यंत आपल्याकडे कोणीतरी मतदानासाठी च काय तो यायचा आणि भाऊ दादा करून निघून जायचा. पण इथे आपला सन्मान करत, माणुसकी आणि जिव्हाळा दाखवत कुंभात(kumbh) आणले याची आनंद अनेकांच्या बोलण्यातून व्यक्त होत होता.

सकाळी चहा पिताना चाळीसगाव तालुक्यातील एका आजोबांनी कुंभ म्हणून आम्ही चर्चा करत असताना त्यांनी स्वतःहून आमच्या चर्चेत भाग घेतला आणि म्हणाले की आमच्या इतिहासात हा पहिला असा कार्यक्रम होतोय जिथे दारू, मटण, नाच, गाना नाही. आमच्या समाजातल्या संतांना एवढं मोठं व्यासपीठ भेटलं ह्याचा आम्हाला खूप आनंद वाटतोय. बाकी त्यांनी हिंदू धर्म म्हणून जो अभिमान व्यक्त केला तो वेगळाच. पण, बाबा बोलताना अक्षरशः भावूक झाले होते.

कुंभ बंजारा समाजासाठी असला तरी खूप मोठ्या प्रमाणात अन्य समाजही उपस्थित होता. कुंभाच्या निमित्ताने सर्व समजाला बंजारा समाजाचा गौरवशाली इतिहास समजला. प्रदर्शनी मध्ये सेवेत असलेल्या मित्रांना ज्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय आले त्यात आम्ही पहिल्यांदा बंजारा समाजाचा इतिहास पाहतोय, बंजारा समाज मूळ प्रवाहात आला पाहिजे, बंजारा संस्कृती इतकी प्राचीन आहे हे आत्ताच समजलं बंजारा समाजात इतके महान महापुरुष होऊन गेले हे आत्ताच कळलं अश्या खूप प्रतिक्रिया आल्या आहेत. विशेष म्हणजे अनेक जण स्वतः बंजारा समाजातील होते. त्यामुळे बंजारा समाज आजतागायत कोणत्या अंधारात पडून होता यावरून लक्षात येते. काही अपवाद वगळता राजकीय लोकांनी या समाजाचा फक्त स्वतःच्या फायद्यापुरता उपयोग करून घेतला. त्यामुळे केवळ राजकारण प्रेमी अशीच त्यांची ओळख झाली. पण हा समाज पूर्वीपासून सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सुरक्षा, कौशल्य, कला, संस्कार अश्या नानाविध विषयात पारंगत होता.

कुंभाच्या निमित्ताने बंजारा समाजाचे हे विशाल रूप भारताला घडले असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. गावकुसापासून दूर तांड्यावर राहणारा हा भटका समाज प्रतिकूल परिस्थितीतही देश आणि धर्मासाठी लढा देत होता हा संदेश या कुंभातून सर्व समाजाला गेला. इतर समाजाचा बंजारा समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन या कुंभामुळे बदललाय. जगद्गुरु शंकराचार्य यांनी आपल्या अशिर्वचनमध्ये बंजारा समाज सनातन धर्माचा अविभाज्य भाग असून या समाजाचे राष्ट्र धर्मासाठी दिलेले योगदान आपण कधीही विसरू शकत नाही. विविधतेत एकता असलेला आपला सनातन हिंदू धर्म असल्याचे प्रतिपादन केले. त्यांचे हे विधान क्रांतिकारी आणि ऐतिहासिक आहे.

कुंभामुळे दोन सर्वात प्रभावी बदल दिसून येतील. एक म्हणजे बंजारा समाजात ‘गोरधर्म’ म्हणून जो अपप्रचार सुरू होता त्याबद्दल समाज आता जागरूक झालाय. संस्कृतीच्या नावाखाली वेगळ्या धर्माची मागणी कशी भोळ्या भाबड्या समाजाच्या गळी उतरवली जात होती, हे लोकांच्या लक्षात आले. आणि दुसरी ‘धर्मांतर‘. (conversion )ख्रिस्ती मिशनरी चक्क सेवालाल महाराजांच्या नावाने प्रचार करून बंजारा समाज बांधवांचे ख्रिस्तीकरण करत आहेत. आणि आपण त्यांना विरोध केला पाहिजे हा आत्मविश्वास आणि गांभीर्य समाजाच्या लक्षात आलंय. त्यामुळे पुढील काळात घरवापसीचे मोठे यश मिळणार यात काही शंका नाही.

या व्यतिरिक्त कुंभामुळे विविध जाती, पोटजाती, प्रादेशिक भिन्नता, सांस्कृतिक वैविध्य यामुळे बंजारा समाजात ज्या दऱ्या निर्माण झाल्या होत्या, त्या कमी होऊन संघटित बंजारा समाज होईल. बंजारा समाजाचा शैक्षणिक व सामाजिक विकास, तांडा सुधार योजना, धर्मांतर बंदी कायदा, पोहरादेवी गडाचा(pohradevi) विकास आणि अन्य पर्यटन स्थळाचा विकास आदि महत्वपूर्ण बदल कुंभामुळे शक्य होणार आहेत. कुंभाच्या ईश्वरीय कार्यात जे संकल्प साधू संतांच्या उपस्थितीत समाजाने केले आहेत ते नक्कीच पूर्ण होतील, आणि बंजारा समाज पुन्हा गतवैभव प्राप्त करेल यात शंकाच नाही. अशक्यप्राय परिवर्तन या कुंभामुळे घडून येणार आहे.

– कल्पेश जोशी, संभाजीनगर
Kavesh37@yahoo.com

Back to top button