दिव्य प्रेरणेचा नित्य स्रोत : पूजनीय श्री गुरुजी !!
आज विजया एकादशी, हा दिवस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर तथा पूजनीय श्री गुरुजी यांचा तिथीप्रमाणे जन्म दिवस!
माझ्या पिढीतील अनेकांना पूजनीय गुरुजी (Shree golwalkar guruji ) यांना प्रत्यक्ष बघितलेले स्मरत नाही. अनेकांनी तर बघितलेले देखील नाही. पण ज्यांनी आम्हाला कार्यकर्ते, स्वयंसेवक म्हणून घडवले त्या सर्वांच्या तोंडून पूजनीय गुरुजी आम्ही अनुभवले आहेत. पूजनीय गुरुजी यांची चरित्र आम्ही वाचली आहेत. बौद्धिक वर्गात त्यांच्याबद्दल ऐकले आहे. त्यांच्या आठवणी सांगता सांगता भावविभोर झालेले अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते आम्ही बघितले आहेत! कुठे तरी आमचे मन खात राहिले आहे की, अरे आपल्या जाणत्या वयात एकदा तरी पूजनीय गुरुजी आम्हाला भेटायला हवे होते.
पूजनीय गुरुजींचे जेव्हा आपण स्मरण करतो तेव्हा सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात येते ती म्हणजे आत्यंतिक देवदुर्लभ गुणांचा त्यांच्याकडे असलेला समुच्चय! नुसता समुच्चय नाही तर त्या सर्वांचे समाजाप्रति, राष्ट्राप्रति, आपण अंगिकारलेल्या ध्येयाप्रति समर्पण! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक पूजनीय डॉ. केशव बळीराम हेडगेवार(keshav baliram hedgewar) यांनी अत्यंत विश्वासाने त्यांच्यावर सोपवलेली संघटनेची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे आयुष्यभर वहन केली त्याचे एकमेव कारण म्हणजे त्यांचे हे समर्पण!
त्यांची स्मरणशक्ती, त्यांची विद्वत्ता, त्यांची नम्रता, अत्यंत करिष्मा असलेले व्यक्तित्व असताना त्यांचा साधेपणा, सहज व्यवहार समोरच्या व्यक्तीला जिंकून घेतल्याशिवाय राहत नव्हता!
संघ स्थापन होऊन जेमतेम १५ वर्ष झालेली! संघ हा भारतात सर्वत्र पोहचलेला! डॉक्टर हेडगेवार यांनी याची देही याची डोळा ध्येय साकार करण्यासाठी केलेला पण! त्यात खालावत गेलेली त्यांची प्रकृती!! त्यांचे दुःखद निधन झाले आणि वयाच्या केवळ ३४ व्या वर्षी श्री गुरुजींवर सरसंघचालक म्हणून जबाबदारी येऊन पडली. डॉ. हेडगेवार यांनी सुरवातीच्या काळात गोळा केलेले बाल, अरुण आता वयाच्या पंचविशीत पोहोचले होते. डॉक्टर हेच त्यांचे सर्वस्व होते. त्यांचे जाणे हा त्या सर्वांना मोठा मानसिक धक्का होता. पूजनीय श्री गुरुजी यांना सरसंघचालक म्हणून या सर्व कार्यकर्त्यांनी सहज स्वीकारणे हे केवळ पूजनीय गुरुजी यांच्या निरपेक्ष प्रेमाने शक्य झाले. ज्याचे वर्णन संघ गीतात शुद्ध आणि सात्विक प्रेम असा पुढे नेहमी आला आहे ..
देशामध्ये प्रचंड अस्वस्थता होती. स्वातंत्र्याची चळवळ कळसावर पोहचली होती. त्याच वेळेस पाकिस्तानची मागणी जोर धरत होती.एकीकडे हिंदू हिताचा बळी देऊ पाहणारे काँग्रेसचे नेतृत्व आणि दुसरीकडे आक्रमक मुस्लिम समाजाकडून होणारे अत्याचार! या दुहेरी कात्रीत सापडलेल्या हिंदू समाजाला धीरोदात्तपणे मार्गदर्शन करण्याची गरज होती, संघटन आणि समाज दोघांना सावरण्याची ती वेळ होती. पूजनीय गुरुजी यांची मोठी अग्निपरीक्षा काळ घेऊ पाहत होता. आज मागे वळून बघत असताना लक्षात येते पूजनीय गुरुजी यांचे नेतृत्व यातून तावून सुलाखून बाहेर पडले. पूजनीय गुरुजींनी डॉक्टर हेडगेवार यांच्या प्रति असलेल्या निष्ठेतून आणि अलौकिक प्रतिभेतून ही जबाबदारी यशस्वी पणे पार पाडली.
संघटनेच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना सावरत असताना त्यांनी पूजनीय डॉक्टर हेडगेवार यांच्याबद्दल असणाऱ्या अपार श्रद्धेचाच आधार घेतला आणि संघ शाखेचा मंत्र आणि तंत्र यावर लक्ष केंद्रित करताना या सगळ्या कार्याला आपल्या चिंतनातून एक वैचारिक सामर्थ्य प्राप्त करून दिले. त्या काळात किमान एक वर्ष संघकार्याचा विस्तार करण्यासाठी द्या असे आवाहन त्यांनी स्वयंसेवकांना केले.
अनेक कार्यकर्त्यांनी, स्वयंसेवकांनी आपले शिक्षण, नोकरी, व्यवसाय थांबवून पूजनीय गुरुजींच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यातून बाहेर पडलेले अनेक प्रचारक पुढे आयुष्यभर संघकार्य करताना आजीवन प्रचारक राहिले.
पूजनीय गुरुजींनी फाळणीच्या पूर्वकाळात त्या भागात अत्यंत कठीण परिस्थितीत अनेक वेळा दौरे केले. हिंदू समाजाला धीर देण्याचे कार्य केले. स्वयंसेवकाना त्या कठीण काळात हिंदू समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा दिली. माधवराव मुळे यांची नियुक्ती पंजाबचे प्रांत प्रचारक म्हणून केली. “शेवटचा हिंदू सुरक्षित परत येत नाही तोपर्यंत आपली जागा सोडू नका!” ही त्यांची आज्ञा अनेक स्वयंसेवकांच्या प्राणावर बेतली. सहसा भावविवश न होणारे पूजनीय गुरुजी या आठवणीने अस्वस्थ होताना अनेकांनी पाहिले आहेत.
काश्मीर(kashmir) भारतात रहावा असा निर्णय राजा हरिसिंग यांनी करावा म्हणून पूजनीय गुरुजी यांनी केलेली शिष्टाई हा त्यांच्या जीवनातील आणि संघ जीवनातील एक महत्वाचा प्रसंग म्हणावा लागेल. दुर्दैवाने संघावर, पूजनीय गुरुजी यांच्यावर बेलगाम आरोप करणारे कधीच पूजनीय गुरुजी यांना याचे श्रेय देत नाहीत! अर्थात, श्रेयवाद नाही तर ध्येयवाद ही पूजनीय गुरुजी यांची शिकवण होती. त्यामुळे त्यांना याचे कधीच वैषम्य वाटले नाही.
म. गांधीजींच्या दुर्दैवी हत्येनंतर आलेली संघबंदी, पूजनीय गुरुजींना भोगावा लागलेला कारावास हा कालखंड त्यांच्या नेतृत्वाची आणि त्यांच्या धीरोदात्तपणाची परीक्षा घेणारा होता. संपूर्ण समाजाला संघाच्या विरोधात उभे करून, एखाद्या गुन्हेगारासारखी त्यांची प्रतिमा उभी केली गेली. पण पूजनीय गुरुजींनी आपल्या बोलण्यातून किंवा कृतीतून कुठलाही रोष व्यक्त केला नाही. स्वयंसेवकांना सत्याग्रहाचे आवाहन केले आणि अत्यंत शांततेने संघावर झालेल्या अन्यायाचा लढा ते लढले. महात्मा गांधी यांचे अनुयायी म्हणवणारे जाळपोळ करत होते, हिंसा करत होते आणि ज्यांच्यावर गांधींच्या हत्येचा खोटा आरोप केला गेला होता ते पूजनीय गुरुजी आणि त्यांचे अनुयायी स्वयंसेवक शांतपणे अन्यायाविरुद्ध अहिंसक मार्गाने लढत होते. हा एक दैवदुर्विलासच म्हणावा लागेल!
संघावरील बंदी उठली. सर्वत्र श्री गुरुजी यांचे सत्कार समारंभ झाले. त्यांनी संघाला त्यावेळी असणारी आर्थिक गरज लक्षात घेऊन स्वतःच्या सत्काराला मान्यता दिली. पण या निमित्ताने त्यांनी सर्वत्र मार्गदर्शन करताना स्वयंसेवकांना सकारात्मक पद्धतीने कार्याची गती वाढविण्याचे आवाहन केले. कुठल्याही प्रकारचा प्रतिशोध घेण्याची भाषा किंवा आक्रस्ताळी भाषा त्यांनी केली नाही. १९५० ते १९७४ म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी पूजनीय डॉक्टरांनी दिलेली जबाबदारी म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना जपली आणि डॉक्टर हेडगेवार यांना अपेक्षित होती तशी विकसित करत नेली.
समाजाचे प्रबोधन करून, समाजाची पचनशक्ती वाढवत नेत, समाजाची प्रकृती सुधारण्यासाठी हळूहळू आवश्यक ते वैचारिक दिशा देण्याचे काम त्यांनी एखाद्या कुशल सामाजिक सृजनशीलतेच्या भूमिकेतून केले.
श्री गुरुजींच्या कार्यातील महत्वाची गोष्ट म्हणजे, समाज जीवनातील विविध क्षेत्रात संघ विचाराचा, राष्ट्र विचाराचा ठसा उमटवण्यासाठी त्यांनी अनेक कर्तृत्ववान कार्यकर्ते, प्रचारक यांना प्रेरणा दिली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विश्व हिंदू परिषद, भारतीय जनसंघ, भारतीय मजदूर संघ, वनवासी कल्याण आश्रम, विद्या भारती या संघटनांच्या माध्यमातून सामजिक जीवनातील सर्व क्षेत्रात संघाचा विचार पोहोचला, यात पूजनीय गुरुजी यांचे मार्गदर्शन खूप मोलाचे होते .
कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्र ही संपूर्ण हिंदू समाजाला प्रेरणा देणारी वास्तू, विचार आणि चळवळ उभी राहिली ती पूजनीय गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली! एकनाथजी रानडे या आपल्या सर्वात ज्येष्ठ कार्यकर्त्याला त्यांनी हे काम करण्यास संघाच्या नित्य जबाबदारीतून मुक्त केले. त्यांची ही दूरदृष्टी होती.
राजकीय जीवनात राष्ट्रीय विचारांच्या स्थापनेचे महत्व लक्षात घेऊन त्यांनी सर्वात प्रिय असलेल्या दीनदयाळ उपाध्याय यांना नित्य संघकामातून मुक्त केले. प्रथम विद्यार्थी क्षेत्र आणि मग कामगार क्षेत्रासाठी दत्तोपंत ठेंगडी याना प्रेरित केले. बाळासाहेब देशपांडे यांना वनवासी कल्याण आश्रमाचे काम करण्यास उद्युक्त केले. राष्ट्र जीवनाला समृद्ध करण्यासाठी हे अनमोल हिरे देणारे पूजनीय श्री गुरुजी खरोखर रत्नपारखीच होते. हिंदुस्थान समाचार आणि विश्व हिंदू परिषद यासाठी दादासाहेब आपटे यांचे कौशल्य त्यांनी उपयोगात आणले.
संघाच्या कामात प्रचारक-कार्यकर्ता ही एक खूप महत्त्वाची व्यवस्था आहे. सुरवातीच्या काळात पूजनीय डॉक्टर हेडगेवार यांची प्रेरणा घेऊन अनेक विद्यार्थी कार्यकर्ते शिक्षणासाठी बाहेर पडले आणि त्यांनी शिक्षण घेत संघ वाढवला. पुढील काळात हे सर्वजण आणि इतर अनेक जण प्रचारक म्हणून आयुष्यभर कार्यरत राहिले तर काही जण काही वर्षांसाठी बाहेर पडले. या व्यवस्थेला योग्य दिशा देऊन, ती एक कायमस्वरूपी व्यवस्था उभी राहिली त्यात पूजनीय गुरुजी यांचे चिंतन आणि मार्गदर्शन खूप महत्वाचे ठरले. एका अर्थाने प्रवाहाच्या विरुद्ध जीवन जगताना त्यासाठी आवश्यक असणारी साधना, मनाची कठोरता आणि व्यवहारिक जीवनात वावरूनही त्याबद्दल कमालीची अलिप्तता हा एक जीवन जगण्याचा खूप मोठा योग प्रयोग होता. पण श्री गुरुजी यांच्यासारखे अलौकिक व्यक्तिमत्व समोर असल्यामुळे या योगी पुरुषाच्या प्रेरणेने प्रचारक कार्यकर्त्यांची देशभर अशी फळी उभी राहिली की आज जो राष्ट्र जीवनात बदल दिसतो आहे त्यामागे ही सगळी खपलेली प्रचारक मंडळी आहेत हे विसरता येणार नाही.
पूजनीय गुरुजी प्रचलित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी यावर नेहमी एक जागरूक आणि जागृत नागरिकाच्या भूमिकेतून आपली मते मांडत असत. दुर्दैवाने, त्यांच्या मतांना लालबहाद्दूर शास्त्री वगळता फार गंभीरपणे न घेतल्याने देशासमोर अनेक समस्या उभ्या राहिल्या हे सत्य आहे. भाषावार प्रांतरचना देशाच्या एकात्मतेवर विपरित परिणाम करू शकते हे त्यांनी म्हटले होते आणि ते दुर्दैवाने ते खरे ठरले. सीमेवर कुंपण घातले पाहिजे ही त्यांची आग्रही मागणी होती. देशामध्ये घुसखोरीचा पसरलेला रोग बघितल्यावर त्यांच्या मागणी किती रास्त होती हे समजते. जेंव्हा ‘हिंदी-चिनी भाई, भाई’ चे नारे लगावले जात होते तेव्हा चीनकडून आपल्याला खरा धोका आहे हे पूजनीय गुरुजी वारंवार सांगत होते, ते समजायला सत्तेत असलेल्या धुरीणांना १९६२ साल उजाडावे लागले. चीन आपला मूळ साम्राज्यवादी आणि विस्तारवादी चेहरा घेऊन जगासमोर एक दिवस येईल हा त्यांचा निष्कर्ष होता आणि आज साऱ्या जगाला हे पटले आहे. पूजनीय गुरुजी यांचे हे द्रष्टे पण होते.
भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळेस सर्वपक्षीय बैठकीत एक विरोधी नेता सारखा तुमचे सैन्य, तुमचे सैन्य असा प्रतिप्रश्न विचारत होता. अखेर पूजनीय गुरुजी यांनी हस्तक्षेप करून कृपया ‘आपले सैन्य म्हणा’ अशी सूचना केली आणि ‘ वयं पंचाधिकं शतम् !’ या मंत्राची आठवण करून दिली. राष्ट्रभाव सतत जागरूक असल्याने त्यांच्या कुठल्याही भूमिकेत कधी विरोधाभास नसायचा!
भारतात सर्वप्रथम ‘मिस इंडिया स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी श्री गुरुजींची मार्मिक प्रतिक्रिया होती ‘We are missing India’ !
आज सर्वत्र गोविज्ञान आणि सेंद्रीय शेतीचा बोलबाला आहे. पूजनीय गुरुजी यांनी १९५६ च्या दरम्यान गोहत्येच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम उघडण्यास स्वयंसेवकाना प्रेरित केले होते. पूजनीय गुरुजींचे विचार त्यावेळी सरकार आणि समाज यांनी गंभीरपणे घेतले असते तर आपल्या कृषी क्षेत्राचे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचे चित्र खूप वेगळे दिसले असते. ते मांडत असलेल्या विचारांना बुरसटलेले, अवैज्ञानिक असे शिक्के मारले गेले. त्यांची फॅसिस्ट म्हणून अवहेलना केली गेली. कुठले तरी संदर्भ नसलेली वाक्ये घेऊन त्यांना चातुर्वण्याचे पुरस्कर्ते ठरवले गेले. पण पूजनीय गुरुजींनी स्वतःवरील टीका सहन करताना कधीही स्वतःच्या तोंडातून जाहीरपणे किंवा बैठकीत किंवा खासगीत अपशद्ध काढले नाहीत. त्यांनी स्वयंसेवकांना विपरीत परिस्थितीत आपल्या ध्येयावर आणि कार्यपद्धतीवर विश्वास ठेवण्यास शिकवले. आज हिंदू समाजात आलेली जागृती ही त्यांनी स्वयंसेवकांच्यात निर्माण केलेल्या अढळ निष्ठेचे फळ म्हणावे लागेल.
वास्तविक पूजनीय गुरुजी हे अध्यात्मिक साधनेची आवड असणारे होते. सिद्ध पुरुष म्हणून अध्यात्मिक क्षेत्रात त्यांना मान्यता प्राप्त होती पण त्यांनी ती साधना व्यक्तिगत ठेवली. त्या अध्यात्मिक साधनेशी संघ जोडला नाही. स्वतःच्या आवडी-निवडी बाजूला ठेवून डॉक्टर हेडगेवार यांनी सांगितलेला संघ त्यांनी जसाच्या तसा पुढील पिढीकडे सोपवला. आपल्या व्यक्तिगत साधनेतून त्यांना मिळालेली ऊर्जा आणि शक्ती त्यांनी संघाच्या कामामागे उभी केली पण, संघाला कर्मकांडात गुंतवून ठेवले नाही! हे त्यांचे सर्वात मोठे अनुकरणीय समर्पण म्हणावे लागेल.
पूजनीय गुरुजी म्हणायचे आगगाडीचा डबा हेच माझे घर आहे! त्यांनी ३४ वर्षात ६८ वेळा केलेली भारत परिक्रमा त्यांच्या वरील विधानाचा अर्थ स्पष्ट करण्यास पुरेशी आहे. आपल्या स्वयंसेवकांना सुखाच्या प्रसंगी, दुःखाच्या संकटाच्या काळात, संभ्रमित अवस्थेत पत्ररूपाने मार्गदर्शन करणारे गुरुजी स्वहस्ताक्षरात हजारो, लाखो पत्र लिहीलेले जगातील एकमेव नेते असावेत. त्यांनी लिहिलेली पत्रे पिढीमागून पिढी सांभाळून ठेवणारी लाखो घरे आज पण आहेत!
३४ वर्षांच्या या कार्यकाळात मन क्षुब्ध व्हावे, दुःखी व्हावे, विषण्ण व्हावे, निराश व्हावे असे अनेक प्रसंग अनेक वेळा आले. पण त्यांनी चेहऱ्यावरील आपले स्मित कधीही ढळू दिले नाही! अगदी कर्करोगाच्या वेदना पण हसत हसत त्यांनी स्वीकारल्या! दीनदयाळजी यांचा मृत्यू हा तर त्यांना बसलेला सर्वात मोठा धक्का होता. दीनदयाळजी यांचा मृतदेह बघितल्यावर खरे तर त्यांना गलबलून आले असणार पण बरोबर असलेले भाऊराव देवरस जेव्हा ओकसाबोकशी रडू लागले तेव्हा क्षणात सावरून ते भाऊरावांचे सांत्वन करू लागले.
देशाच्या स्वातंत्र्योत्तर काळात सर्वात जास्त तिरस्कार ज्यांनी पचवला आणि आपल्या स्नेहल स्वभावाने सर्वात जास्त अमृताचा वर्षाव ज्यांनी समाजावर केला, तो पूजनीय गुरुजींनी आज आत्मनिर्भर भारताचा जो विचार सर्वत्र होतो आहे त्याचा वैचारिक पाया पूजनीय गुरुजी यांच्या चिंतनातून आला आहे आणि आपली विश्वगुरुत्वाची संकल्पना ही सुध्दा पूजनीय गुरुजी यांच्याच विचारधारेतच आहे हे आम्ही विसरता कामा नये.
माननीय अटलबिहारी वाजपेयी यांनी पूजनीय गुरुजी गेल्यावर अत्यंत चपखल असे वर्णन केले आहे. ते म्हणाले होते, “पूजनीय गुरुजी एक ऐसें प्रभावशाली नेता थें जो कभी रुके नही, थके नही, कभी झुके नही ! ” संदेश देण्याचा खूप आग्रह धरल्यावर सुप्रसिद्ध पत्रकार खुशवन्तसिंग यांनी पूजनीय गुरुजींनी त्यांना तीन शब्दात जो संदेश दिला होता तो श्री गुरुजींच्या जीवनाचे आणि संघकार्याचे सार होते असे म्हणावे लागेल. ते तीन शब्द होते, ‘मैं नहीं तू ही ‘ !
अध्यात्मिक क्षेत्रात उंची गाठून देखील पूजनीय गुरुजी हे आत्मविलोपी वृत्तीचा वस्तुपाठ होते. स्वतःचे श्राद्ध स्वतःच आधीच केलेले पूजनीय गुरुजी यांनी स्वतःचे कुठलेही स्मारक होऊ नये असे म्हटले होते. ‘राष्ट्राय स्वाहा, इदम न मम्’ ही त्यांची उक्ती नव्हती तर त्यांच्या जीवनाचे कमीत कमी शब्दात केले गेलेले वर्णन आहे असे म्हणावे लागेल.
शेवटी त्यांचे स्मरण करताना मनात ओथंबुन आलेली हीच भावना आज त्यांच्या जन्मदिनी आहे, शत नमन माधव चरण में, शत नमन माधव चरण में!
लेखक :- रवींद्र मुळे