वीरशैव लिंगायत हिंदूच ! भाग 1
भ्रम वेळीच दूर होणे आवश्यक
या देशावर हजार वर्षांपर्यंत सातत्याने आक्रमणे झाली. तरीही हा देश भारत म्हणून जीवंत राहिला. जगात असे दुसरीकडे कुठेच झाले नाही. रानटी टोळ्यांनी आक्रमण करावे आणि राष्ट्रेच्या राष्ट्रे नष्ट व्हावीत, असे पुन्हा पुन्हा घडले आहे. परंतु, भारत देश याला अपवाद राहिला. याचे कारण सांगताना स्वामी विवेकानंद (swami vivekanand) सांगतात, ‘धर्म’ हा भारतवर्षाचा प्राण आहे. याला जोवर धक्का लागणार नाही, तोवर भारत मृत होणे शक्य नाही.’
इस्लामी आक्रमकांनी हिंदू (hindu) धर्मावर थेट आक्रमण केले. हजारो मंदिरे पाडली.लाखो लोकांना बळाने धर्मांतरित केले. तरी समाज परधर्मीयांशी झुंज देत राहिला. परंतु, ब्रिटिशांनी केलेले आक्रमण हे बौद्धीक आक्रमणसुद्धा होते. भारतीय माणसाला लाचारीतही आनंदाची अनुभूती वाटली पाहिजे, अशी रणनीती आखली. आणि ती खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरली. त्याचाच परिणाम म्हणजे भले-भले विद्वानही ब्रिटिशांचे राज्य हे ईश्वरी कृपा मानू लागले होते.
हिंदू समाजाला शतखंडित करण्याची रणनीती ब्रिटीश राजवटीत धर्मांतरे करण्यास चटावलेल्या मिशनऱ्यांनी आखली. त्यासाठी ‘तत्त्वज्ञान‘ ही उभे केले. सत्ताधारी तेच. त्यामुळे जनगणनना करतानाही हिंदू विभागला जाईल, हे पाहिले. ब्रिटिशांच्या उष्ट्या विचारांवर पोसलेले अनेक बुद्धीजीवी तयार झाले. ज्या लोकांना भारताशी, भारतीयांशी काही देणेघेणे नव्हते त्या मंडळींनी लिहिलेली पुस्तके वाचून आपल्या देशातील कथित विद्वान घोकू लागले की ‘आम्ही हिंदू नाही, आम्ही हिंदूहून वेगळे आहोत.’
लिंगायत समाज (lingayat samaj) आणि येशू ख्रिस्ताची शिकवण यात साम्य कसे आहे, अशा प्रकारचे साहित्यही माेठ्या प्रमाणात निर्माण झाले. भारतीयांना सुरुवातीला याचे फार गांभीर्य वाटले नाही. पण अलीकडच्या काळात लिंगायत हे हिंदू नाहीत हे सांगण्यासाठी एक चळवळ उभी राहिली. कर्नाटकातील सरकारने अधिकृत घोषणाच केली की, ‘लिंगायत हे हिंदूहून वेगळे आहेत आणि तशी मान्यता देणार इ.’ यानंतर मात्र लिंगायत समाज खडबडून जागा झाला. स्वार्थापोटी लिंगायत समाजात फूट पाडू पाहणाऱ्या आणि लिंगायत समाजाचे अपमान करू पाहणाऱ्या शक्तींना समजेल अशा भाषेत धडा शिकवला. त्यानंतर कर्नाटकातील कांॅग्रेस पक्षाला अक्कल आली. आम्ही हिंदू धर्म तोडण्याचा प्रयत्न केला ती घोडचूक होती, अशी जाहीर कबुली दिली.
लिंगायत हे हिंदू नाहीत, असा भ्रम पसरवणारी डझनभर पुस्तके याआधी प्रकाशित झाली आहेत. जे धडधडीत खोटे आहे त्याचा प्रतिवाद का करावा, असा विचार समाजाने सुरुवातीला केला. परंतु, खोट्याला वेळीच उघडे पाडणे आवश्यक असते, याचे भान ठेवून जटायु अक्षरसेवा प्रकाशनने ‘वीरशैव लिंगायत हिंदूच !’ (veershaiv lingayat samaj) हे पुस्तक प्रकाशित केले. सिद्धाराम भै. पाटील आणि अप्पासाहेब हत्ताळे या युवा अभ्यासकांनी लिहिलेले हे पुस्तक बृहन्मठ होटगीचे धर्मरत्न डाॅ. मल्लिकार्जुन शिवाचार्य आणि श्री सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या हस्ते प्रकाशित झाले. वीरशैव आणि लिंगायत हे समानार्थी आहेत. वीरशैव लिंगायत समाज हा हिंदूच आहे, अशी निसंदिग्ध भूमिका या दोन्ही मान्यवरांनी घेतली, ही घटना महत्त्वाची आहे.
पुढील भागात आपण जाणून घेऊया.. वीरशैव लिंगायत व पुन्हा पुन्हा विचारले जाणारे प्रश्न आणि आपण…