वीरशैव लिंगायत हिंदूच ! भाग ६

वीरशैव लिंगायत हिंदूच ! हे निदर्शित करणारे मुद्दे पुढीलप्रमाणे :-
17. शिवयोगी सिद्धराम आणि बसवण्णा (mahatma basaveshwar) यांच्या वचनांमध्ये हिंदू धर्माची मूलभूत तत्त्वे प्रतिपादित करणारी शेकडो उदाहरणे आहेत. ईश्वर एक आहे आणि तो सर्वव्यापी आहे. चराचरात ईश्वर व्यापून आहे. त्यामुळे जातिभेद आदी बाबी अज्ञान प्रदर्शित करणार्या आहेत, हा या शिवशरणांच्या वचनांचा सार आहे.
18. शिवयोगी सिद्धराम आणि बसवण्णा यांच्या वचनांतून कुडलसंगमदेव आणि कपिलसिद्ध मल्लिकार्जुन यांच्यावरील अनन्य भक्ती प्रत्येक वचनांतून झळकते. योगशास्त्र, वेद, उपनिषदे,
रामायण, महाभारत आदी महाकाव्यातील अनेक संदर्भ या वचनांमध्ये विपुल प्रमाणात आहेत.
19. आपल्या गळ्यात लिंग धारण करतो तो लिंगायत असे ढोबळपणे सांगितले जाते. लिंगायताने गळ्यात शिवलिंग धारण करावे, अशी अपेक्षा असते. परंतु, प्रत्येक लिंगायत लिंग धारण करतोच अशी आजची स्थिती नाही. शुद्ध आचरण असेल तर लिंग धारण केले नाही तरी चालते आणि अशुद्ध आचरण असणार्याने लिंगधारण केले तरी उपयोग नाही, इतके स्पष्ट विचार सिद्धरामांच्या वचनांतून पाहायला मिळतात.
20. हिंदू धर्मात आगम आणि निगम यांचे स्थान मोलाचे मानले जाते. पारमेश्वरागम पटल 1 मधील श्लोक 58 पुढीलप्रमाणे आहे…
‘ब्राह्मणः, क्षत्रिया, वैश्याः, शूद्रा येच अन्यजातयः ।
लिंगधारणमात्रेण शिवएव न संशयः॥’
भावार्थ : ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अथवा अन्य कोणत्याही जातीचा असला तरी लिंग धारण केल्यानंतर तो शिवच समजावा यात संशय नाही. या आशयाचे अनेक श्लोक आगमामध्ये आहेत. लिंगधारण, स्त्री-पुरुष समानता, वर्णजातिभेद संपवणे ही या आगमांतील शिकवण आहे जी वीरशैव संप्रदायासाठी सांगितलेली आहे.
21. बाराव्या शतकादरम्यान वीरशैव संप्रदायाला ग्लानी आली होती. महात्मा बसवेश्वरांनी हेच विचार लोकभाषेतून मांडले. लिंगायत समाजात नवचैतन्य आणले. त्यांनी कोणताही नवीन धर्म स्थापन केलेला नसून ‘मी शैव होतो, वीरशैव झालो,’ असे स्पष्ट सांगितले आहे.
22. बाराव्या शतकात तत्कालीन समाजाची विचारधारा व जीवनक्रम तेजोहीन व शिथिल बनला होता. उत्तरेकडे सतत होणार्या परकीय आक्रमणाचे भय व वर्णाश्रम धर्मांतील मूलभूत दोषांमुळे सर्वत्र फुटीरता वाढलेली होती. अशा पार्श्वभूमीवर हिंदू समाज एकसंध व एकजिनसी बनविण्याची नितांत आवश्यकता होती. याकरिता नव्या विचार प्रणालीची, आचारसंहितेची गरज होती. हे महान कार्य महात्मा बसवेश्वरांनी केल्याचे शरण साहित्याच्या अभ्यासक जयदेवीताई लिगाडे यांनी म्हटले आहे. (संदर्भ : शून्य संपादने : शिवगण प्रसादी महादेव विरचित ‘शून्य संपादने’ या कन्नड पुस्तकाचा अनुवाद : जयदेवी लिगाडे, पृष्ठ 464).
23. वीरशैव लिंगायत(veershaiv lingayat samaj) समाजात श्रद्धास्थानी असलेल्या केदार, काशी, उज्जैनी, रंभापुरी आणि श्रीशैलम् या पाचही धर्मपीठाच्या शिवाचार्यांनी लिंगायत हे हिंदूच आहेत, असे सांगितले आहे.
24. बसवेश्वरांनी मांडलेले तत्त्वज्ञान त्यापूर्वी श्री रेणुकाचार्यांनी मांडले होते. (संदर्भ : श्रीसिद्धांत शिखामणी) पंचाचार्य हेच वीरशैव संप्रदायाचे संस्थापक होत. वीरशैव उपासनापद्धती ही बसवपूर्व आहे, हे कर्नाटकातील प्रसिद्ध संशोधक डॉ. चिदानंद मूर्ती यांनी अनेकदा साधार सांगितले. त्यांनी चर्चेचे आव्हान देऊनही ते स्वीकारण्याचे धाडस स्वतंत्र धर्म समर्थकांना झाले नाही.
25. आता मोठ्या प्रमाणातील संशोधन आणि पुरातत्त्व विभागाने दिलेल्या पुराव्यांनुसार वीरशैव संप्रदाय बसवपूर्व आहे, हे सिद्ध झाले आहे. इतकेच नव्हे तर बसवण्णांचे अनुयायी असलेल्या विरक्त मठाधीशांनीही हे आता स्वीकारले आहे. त्यातच विरक्त परंपरेचे मेरुमणी यडियुरू सिद्धलिंगेश्वर यांनीही वीरशैव परंपरेविषयी पुष्कळ उल्लेख केल्याचे इतिहासात दिसून येते.
26. बयरित्ती शिलालेख सन 1000, कक्केरी सन 1127, उद्रामी सन 1157, कोळ्ळुरू सन 1180, अम्मीनभावी मठातील पत्र सन 1130, शिरनाळ सन 1187, अव्वेरहळ्ळी सन 1193, चौडदानपूर सन 1193 आदी शिलालेखांमध्ये रंभापुरी पीठाविषयी उल्लेख आहे. बागळी सन 1078, अव्वेरहळ्ळी 1093, मरडीपूर 1280 शिलालेखात उज्जैनी पीठाविषयी सांगितले आहे. याचाच अर्थ वीरशैव लिंगायत परंपरा महात्मा बसवण्णा यांच्या आधीपासून अस्तित्वात आहे.
27. सुप्रसिद्ध राजा जन्मेजयाचे ताम्रपट सन पूर्व 1500, मरडीपूर (सन 1280) शिलालेख यातून केदार पीठाच्या इतिहासावर प्रकाश पडतो. महात्मा बसवण्णा यांच्या जन्मापूर्वी अडीच हजार वर्षापासून वीरशैव लिंगायत परंपरा अस्तित्वात होती, याचा हा सर्वात मोठा पुरावा आहे.
28. पाणेम, गुंडाल, नडाल, हनुमकोंड, पालमपेट, बिजवाड, घंटामर आदी शिलालेखात श्रीशैल पीठाचा उल्लेख आहे. आणखी काशी पीठाविषयी सांगायचे तर जयनंद देव शिलालेख सन 574, जंगमपूर (सन 631), नेपाळ जंगममठ (सन 635) आदी शिलालेखांतून या पीठाविषयी स्पष्ट माहिती मिळते.