भारत मॅट्रिमोनीने होळीच्या आडून महिलांवरील हिंसाचाराचे सकल हिंदू समाजाला रंगपंचमी सणावरून ज्ञानामृत पाजले आहे..
भारत मॅट्रिमोनी निव्वळ सवंग लोकप्रियतेसाठी आणि पैशासाठी हिंदूंच्या भावना दुखावतेय….
विवाह ऑनलाईन जुळवणाऱ्या वेबसाइट भारत मॅट्रिमोनीने (bharat matrimony) होळी आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एक व्हिडिओ जारी केला आहे, ज्याचा सकल हिंदू समाजाने तीव्र निषेध केला आहे आणि भारत मॅट्रिमोनीवर बहिष्कार घालण्याची मोहीम जोर धरू लागली आहे.
खरं तर, भारत मॅट्रिमोनी वेबसाइटने मंगळवारी रात्री १२ वाजता होळीच्या पावन मुहूर्तावर एक व्हिडिओ जारी केला, जो एक व्यावसायिक व्हिडिओ आहे. वेबसाईटवर होळीच्या विरोधात जाहिरात करून हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप समाज माध्यमांवरच्या ( social media ) नेटिझन्सनी केला आहे.
भारत मॅट्रिमोनीने आपल्या खोडसाळ जाहिरातीमधील व्हिडिओमध्ये असे दाखविले आहे की, एक हिंदू महिला तिच्या चेहऱ्याचा होळीचा रंग धुते आहे. जसजसे रंग धुतले जातात तसतसे त्या महिलेचा चेहरा उदास दिसतो आणि शेवटी ती चेहऱ्यावरून हात काढते तेव्हा अनेक (अर्थात मारहाणीच्या) जखमा दिसतात. ही जाहिरात होळीच्या दिवशी महिलांच्या छेडछाडी आणि घरगुती हिंसाचाराकडे बोट दाखवत आहे. याला कॅप्शन देण्यात आले आहे की, ‘छळामुळे झालेल्या आघातानंतर अनेक महिलांनी होळी खेळणे बंद केले आहे. आयुष्य किती कठीण झाले आहे हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ पहा.’ या होळीला , महिला दिन साजरा करूया आणि त्यांना सुरक्षिततेचा अनुभव करून देऊ या, असे त्या व्हिडिओत दाखवण्यात आले आहे.
बकरी ईदला शुभकामना आणि होळीला मात्र सकल हिंदू समाजाला जाणून बुजून डिवचणे असे का ?
एकीकडे भारतात ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान आणि अमेरिकेच्या वाणिज्य मंत्री आनंदाने, उत्साहात होळी साजरी करताना दिसतात. यावर्षी भारतात G- २० संमेलन असल्याने अनेक विदेशी अतिथी दाखल झाले आहेत, त्यांनी देखील जल्लोषात पारंपारिक पोशाख परिधान करून होळी साजरी करताना आपण पाहिले आहे…
असे असतानाच दुसरीकडे मात्र भारतातलेच काही हिंदुद्वेषी धर्मांध, लिबरल, पुरोगामी आपल्या सणांना, परंपरांना ध्वस्त करण्यासाठी आकाश पाताळ एक करत आहेत. जागृत होत जाणारा हिंदू समाज आणि पर्यायाने आत्मनिर्भर भारताची होणारी दैदीप्यमान प्रगती त्यांच्या डोळ्यात खुपते आहे.
खरे म्हणजे भारतातील समाज व्यवस्थेत “मध्यस्थ” हा विवाह जुळवणारा एक मजबूत जीता जागता दुवा आहे. मात्र गेल्या काही वर्षातील भारतीयांच्या आधुनिक आणि धकाधकीच्या जीवनशैलीमुळे, वधु वर त्यांच्या आई-वडिलांकडे असलेल्या वेळेच्या अभावामुळे; भारत मेट्रोमनीसारख्या वेबसाईटस् ची चंगळ झाली आहे. विवाह जुळवण्यासाठी ३ महिन्यांचे ४,९००/- अधिक कर ते वैयक्तिक सहाय्यसेवेच्या ६ महिन्यांसाठी ३७,०००/- रुपये अधिक कर अशी लग्नासाठी इच्छुक तरुण-तरुणींकडून आर्थिक लयलूट करणाऱ्या भारत मॅट्रिमोनीचे ९९.९९% ग्राहक हे हिंदूच असले पाहिजेत, असा कयास आहे. ज्या हिंदू समाजाच्या पैशांवर आपण आपले साम्राज्य उभे केले आहे त्याच हिंदू समाजाचा असा उपमर्द करणे सकल हिंदू समाज यापुढे अजिबात खपवून घेणार नाही.
भारत मॅट्रीमोनीने व्यावसायिक दृष्ट्या आपल्या पायावर मोठा धोंडा मारून घेतलाय. भारत मॅट्रिमोनी सारख्याच जीवनसाथी (jivansathi) डॉट कॉम, शादी (shaadi) डॉट कॉम अश्या अनेक लग्न जुळवणाऱ्या कंपन्या आज उपलब्ध आहे. या कंपन्यांमध्ये आपापसात तीव्र स्पर्धा आहे आणि त्यामुळेच आपली जाहिरात अधिकाधिक कल्पक करण्याच्या, काहीतरी आगळावेगळा सामाजिक संदेश देण्याच्या नादात हिंदू संस्कृतीचे (indian culture) भान हरपल्यामळे असे प्रकार घडतात. हिंदू परंपरेतील जे जे चांगले, जे जे उदात्त, जे जे सामाजिक समरसतेला पोषक ते एकतर तुमचे स्वतः चे नाही; मुघलांनी, ब्रिटिशांनी दिलेली आहे अन्यथा समाजाला घातक आहे हा पुरोगामी, लिबरल, डावे, चर्च यांचा हिंदुद्रोही अजेंडा सर्व माध्यमांमधून सतत चालू असतो. त्याच टूलकिटचा ही जाहिरात हा एक भाग आहे.
गेल्या वर्षी दिवाळीतील अशा हिंदुद्वेषी निरर्थक जाहिरातींमुळे फॅब इंडिया, तनिष्क यांना प्रचंड आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. स्वीगी, झोमॅटो (Zomato) ने देखील सकल हिंदू समाजाच्या नाराजीची झळ सोसली आहे. त्यातून तरी भारत मॅट्रीमोनीने धडा घ्यायला हवा होता. पण काही हरकत नाही आज सकल हिंदू समाज जागा झाला आहे, त्याला आपल्यावर होणाऱ्या दुजाभावाची पूर्ण जाणीव आहे.
नेटीजन्सचे आभार मानायलाच हवे त्यांच्या सजगतेमुळे हे संपूर्ण षडयंत्र उजेडात आले आहे. भविष्यात अश्या प्रकारच्या खोडसाळपणा करणाऱ्या ज्या जाहिराती त्याला आता या नेटिझनच्या रेट्यामुळे चाप बसू शकतो आणि जाहिरात करताना कोणत्या प्रकारे करावी याचे भान नक्कीच राखले जाईल असे मनोमन वाटते..
ही जाहिरात तयार करणारा कंटेंट हेड अली हैदर अमीर हा मुस्लिम आहे. नेटिजनस अली हैदरला निकाह, मुतह निकाह, हलाला, ट्रिपल तलाक आणि इराणमधील मुस्लिम महिलांच्या मृत्यूवर प्रश्न विचारत आहेत. मुस्लीम महिलांवरील अन्यायाविरुद्ध, अत्याचाराविरुद्ध तुम्ही कधीच असा आवाज उठवत नाही की मुस्लिम समाजात महिलांविरुद्ध हिंसाचार होतच नाही? अशा मार्मिक प्रश्नांचा भडीमार नेटिजनस त्याच्यावर करत आहेत.
या भंपक व्हायरल जाहिरातीमुळे सोशल मीडियावर सकल हिंदू समाजामध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. ट्विटरवर #BoycottBharatMatrimony हा हॅशटॅग काल दिवसभर ट्रेंडिंग झाला होता. कारण अगदी उघड आहे… लातों के भूत बातों से नही मानेंगे.
भारत मॅट्रिमोनीने ही प्रचंड हिंदुद्वेषी जाहिरात प्रसारित करून आपल्या पायावर कुदळ मारून घेतलेली नाही तर कुदळीवर जाऊन पाय मारला आहे. भारत मॅट्रिमोनीनला लवकरच याचा लवकरच अनुभव येईल.
शेवटी इतकेच म्हणू इच्छितो की:-
“खेलना है तो रंगों से खेलो,
हिन्दुओं की भावनाओं से नहीं !”