शास्त्रज्ञ १३
टेक्स्टाइल केमेस्ट्रीचे जनक इ एच दारूवाला
२०२३ हे वर्ष एक-दोन नव्हे तर तब्बल २३ प्रख्यात भारतीय शास्त्रज्ञांच्या (indian scientists) जन्मशताब्दीचे वर्ष आहे. चला तर मग भारतभूमीच्या या २३ विद्वान विज्ञानकर्मींची महती आजच्या आणि उद्याच्या पिढीला सांगूया…
वस्त्रोद्योग हा रोजगाराचे आणि परकीय चलन मिळविण्याचे मोठे साधन असण्याच्या काळात या क्षेत्रातील संशोधनात मोलाची भर घालतानाच आयातित रसायनांना पर्याय देऊन देशाच्या अर्थव्यवस्थेलाही आधार देणारे इ एच दारूवाला (e h daruwalla) भारतातील वस्त्रोद्योग क्षेत्राचे जनक म्हणून ओळखले जातात.
प्रा. इरॅक होर्मसजी दारुवाला हे जगप्रसिद्ध टेक्स्टाइल केमिस्ट (textile chemist) होते. १९२३ मध्ये जन्मलेले दारुवाला १९७१ ते १९८३ या काळात इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे (आयसीटी) संचालकही होते. त्यावेळी ही संस्था युनिव्हर्सिटी डिपार्टमेन्ट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (यूडीसीटी) या नावाने ओळखली जात असे. निवृत्तीनंतर दारूवाला बॉम्बे टेक्स्टाइल रिसर्च असोसिएशन (बीटीआरए) चे संशोधन सल्लागार म्हणून कार्यरत होते. वस्त्रोद्योगातील त्यांच्या योगदानाबद्दल ब्रीटनमधील सोसायटी ऑफ डायर्स अँड कलरिस्टस् ने विशेष सुवर्णपदक देऊन त्यांचा सन्मान केला होता.
दारुवाला यांनी यूडीसीटीमधून बीएससी आणि एमएससी चे शिक्षण घेतल्यानंतर मँचेस्टर विद्यापीठातून पीएचडीचे शिक्षण पूर्ण केले. भारतात परत येऊन त्यांनी युडीसीटीमध्येच शिक्षक म्हणून काम सुरू केले आणि टेक्स्टाइल केमेस्ट्री या विषयात संशोधनकार्य सुरू केले. प्रामुख्याने त्यांनी वस्त्रे रंगविण्याच्या रसायनशास्त्रावर लक्ष केंद्रित केले होते. त्यावेळी पूर्ण भरात असलेल्या वस्त्रोद्योग व्यवसायाकरिता रसायन सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांच्या मोलाच्या योगदानामुळे भारतीय वस्त्रोद्योग रसायनशास्त्राचे जनक म्हणूनही त्यांचा यथार्तपणे गौरव केला जातो.
विसाव्या शतकाच्या मध्यावर कापड रंगविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांच्या कणांची द्रावणांमधील स्थिती हा वखोद्योगाच्या दृष्टीने खूप कळीचा मुद्दा होता. दारुवाला यांनी रंगांच्या रसायनशास्त्राचा अभ्यास केला. त्यात त्यांनी रंगांची विद्राव्यता, द्रवणांक, वाहकता आणि क्रोमैटोग्राफीक मोजमापे यांचा सखोल अभ्यास करून हे सिद्ध केले की बायनरी मिश्रणांमधील विविध रंगांच्या परस्पर अभिक्रियांमुळे कृत्रिम धाग्यांवर रंग नीट चढत नाही. वेगवेगळ्या धाग्यांवर नीटपणे चढण्याकरिता प्रत्येक रंगाचे तापमान एकसारखेच असते, असेही त्यांनी आपल्या संशोधनातून दाखवून दिले. विविध पदार्थामध्ये रंगांसाठी उपलब्ध पृष्ठभाग आणि त्यावर रंग चढू शकण्यासाठी आवश्यक रासायनिक क्रियांसाठी त्या पदार्थांची अनुकूलता अथवा प्रतिकूलता ही अन्य एक समस्या होती. तिचाही दारुवाला व त्यांच्या सहकाऱ्यांनी सखोल अभ्यास केला. कापूस, विस्कोस, क्युप्रामोनियम रेयॉन आणि पॉलिव्हिनाइल अल्कोहोल धागे यांतील रंगांसाठी उपलब्ध पृष्ठभाग रंगद्रव्याच्या रेणूंच्या आकारावर अवलंबून असतो, असे त्यांना आढळून आले. कापडाचा पृष्ठभाग पाण्याने किती संपृक्त आहे यावरही सेल्युलोजच्या साखळ्यांवर रंगांचे किती रेणू राहू शकतील हे अवलंबून असते, असेही त्यांच्या अभ्यासातून दिसून आले.
भारतात १९५० ते १९९० या काळात वस्त्रोद्योग (textile industry) हा रोजगाराचे आणि परकीय चलन मिळविण्याचे मोठे साधन होते. दारुवाला यांच्या संशोधनाने या क्षेत्रातील शास्त्रात मोलाची भर घातलीच पण, देशाला आवश्यकता होती अशा वेळी त्याने मोठी मदतही केली. उदा. कापड स्वच्छ व्हावे, त्यावरील डाग निघून जावेत यासाठी सोडियम हायड्रो सल्फाइटचा वस्त्रोद्योगात मोठा वापर केला जात असे. हे रसायन पूर्णपणे आयात केले जात असे. प्रा. दारुवाला व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याला पर्यायी रसायने भारतात उत्पादित करता येऊ शकतील, यासाठी संशोधन केले. त्यातून भारतीय वस्त्रोद्योगाला मोठा लाभ झाला. १७ मार्च २०१२ रोजी दारुवाला यांचे निधन झाले.
लेखक :- डॉ. टी व्ही वेंकटेश्वरन
(डॉ. टीव्ही वेंकटेश्वरन हे विज्ञान प्रसारमध्ये वरिष्ठ वैज्ञानिक असून उत्तम विज्ञान संवादक सिद्धहस्त विज्ञान लेखक आहेत.)
(साभार: डिसेंबर २०२२ च्या विज्ञान विश्व अंकात प्रसिद्ध झालेली लेखमाला)