शास्त्रज्ञ १८
प्रख्यात एन्झायमालॉजिस्ट सी शिवरामन
२०२३ हे वर्ष एक-दोन नव्हे तर तब्बल २३ प्रख्यात भारतीय शास्त्रज्ञांच्या (indian scientists) जन्मशताब्दीचे वर्ष आहे. चला तर मग भारतभूमीच्या या २३ विद्वान विज्ञानकर्मींची महती आजच्या आणि उद्याच्या पिढीला सांगूया…
आहारीय घटकांच्या शरीरावरील परिणामांचा अभ्यास करण्यापासून उसाच्या मळीपासून इथेनॉल तयार करण्याची प्रभावी पद्धत तयार करण्यापर्यंत अनेक क्षेत्रांत मोलाचे योगदान देणारा जीवरसायनशास्त्रज्ञ म्हणून एनसीएलचे माजी प्रमुख वैज्ञानिक सी शिवरामन सर्वांच्या लक्षात राहतील.
चुर्या शिवरामन (c shivraman) हे एक नावाजलेले जैवरसायनतज्ज्ञ असून मॉलिक्युलर एन्झायमॉलॉजी, इन्झाइन्स (वितंचके) आणि सूक्ष्म जैवतंत्रज्ञान या क्षेत्रांत त्यांचा हातखंडा होता. पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (एनसीएल) जैवरसायन विज्ञान विभागातील आघाडीचे वितंचकतज्ज्ञ म्हणून त्यांचा लौकिक होता. जे सी सदाना आणि व्ही जगन्नाथन यांच्यासोबत त्यांनी युनेस्कोच्या एका महत्त्वाच्या अनडीपी प्रकल्पाची सुरुवात केली होती.
शिवरामन यांचा जन्म २ डिसेंबर १९२३ रोजी केरळच्या पालघाटमध्ये न्यायमूर्ती सी कुन्हीरामन आणि जानकी यांच्यापोटी झाला. १९४५ मध्ये प्रेसिडेन्सी कॉलेजातून पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मद्रास विद्यापीठात एम दामोदरन यांच्या हाताखाली आहारातील तैलघटक व यकृताद्वारे केले जाणारे चरबीचे विघटन यांतील परस्परसंबंध यावर संशोधन करीत पीएचडी पदवी प्राप्त केली. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेमध्ये १९५० मध्ये त्यांनी नोकरीला सुरुवात केली आणि १९८४ मध्ये औपचारिकरित्या निवृत्त होईपर्यंत ते सहसंचालक आणि जैवरसायनशास्त्र विभागप्रमुख बनले होते. ब्रिटनमधील लीडस् विद्यापीठात ते दोन वर्षे प्रतिनियुक्तीवर होते.
सिट्रेट लाएज या नावाने आता ओळखल्या जाणाऱ्या सिट्राएज यासारख्या जीवाणूंपासून मिळविल्या जाणाऱ्या कळीच्या वितंचकांचा अभ्यास करण्यासाठीच्या नाविन्यपूर्ण पद्धती विकसीत करण्याचे श्रेय शिवरामन यांना दिले जाते. त्यांनी एनसीएलमध्ये याच वितंचकावर अभ्यास सुरू ठेवला. त्यांच्या गटातील शास्त्रज्ञांनी क्लेबसिएला एअरोजीनस स्ट्रेप्टोकॉकस फेर्सेलिस आणि एस्चुरेशिया कोलाय आदी जीवाणूंपासून मिळणाऱ्या सिट्राएजचा अभ्यास केला. सायट्रिक आम्लापासून तयार होणाऱ्या सायट्रेट क्षारांचे विघटन करण्यात या वितंचकांची प्रमुख भूमिका असते आणि उत्क्रांतीचे दर्शक म्हणूनही त्यांच्याकडे पाहता येते. शिवरामन यांचे एस्चुरेशिया कोलाय या जीवाणूपासून मिळणाच्या वितंचकाच्या अभ्यासात विशेष योगदान राहिले. या वितंचकाची रेण्वीय रचना एका प्रथिन रेणूला घेरलेले वितंचकाचे सहा रेणू अशी वैशिष्ट्यपूर्ण असते.
जैवतंत्रज्ञानाचे क्षेत्र विकसित करण्यातही शिवरामन यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी पेनिसिलीन या प्रतिजैविकाचा वापर करीत स्थिर पेनिसिलीन असायलेज प्रणाली विकसित केली होती. या प्रणालीच्या प्रभावक्षमतेचे मापन हिंदुस्थान अँन्टिबायोटिक्सचे एएसएस बोरकर आणि एस रामचंद्रन यांच्या प्रकल्पातून केले गेले. उसाच्या मळीपासून इथेनॉलचे सातत्यपूर्ण उत्पादन मिळविता यावे याकरिता यीस्ट तयार करण्यातही शिवरामन यांनी मोठे योगदान दिले. त्यासोबरतच ६-अमायनो पेनिसिलॅनिक असीड या नावाने ओळखले जाणारे अनेक उद्योगामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे रसायन तयार करण्यातही त्यांचा मोलाचा वाटा होता. या कार्याबद्दल त्यांना विविधलक्ष्यी औद्योगिक संशोधन विकास केंद्र या अशासकीय संस्थेचा १९८५ सालचा वास्विक पुरस्कार देण्यात आला. निवृत्तीनंतरही ते सल्लागार म्हणून पेनिसिलीन असटायलेझ या वितंचकावर काम करीत राहिले. दिल्ली येथील केंद्र सरकारच्या जीवतंत्रज्ञान विभागाच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या आढावा समितीचेही ते सदस्य होते. इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेस आणि इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी या प्रतिष्ठेच्या संस्थांचे ते सदस्य होते. २५ जून २०१४ रोजी त्यांचे निधन झाले.
लेखक :- डॉ. बी के त्यागी
(डॉ. बीके त्याग हे विज्ञान प्रसारमधील वरीष्ठ वैज्ञानिक असून ज्येष्ठ विज्ञान संवादक व लोकप्रिय विज्ञान लेखक आहेत.)
(साभार: डिसेंबर २०२२ च्या विज्ञान विश्व अंकात प्रसिद्ध झालेली लेखमाला)