शास्त्रज्ञ २०
भारताचा कल्पवृक्ष – पुरुष प्रा. टी ए डेव्हिस
२०२३ हे वर्ष एक-दोन नव्हे तर तब्बल २३ प्रख्यात भारतीय शास्त्रज्ञांच्या (indian scientists) जन्मशताब्दीचे वर्ष आहे. चला तर मग भारतभूमीच्या या २३ विद्वान विज्ञानकर्मींची महती आजच्या आणि उद्याच्या पिढीला सांगूया…
केवळ नारळाच्या पिकावर संशोधन न करता देशातील नारळाचे उत्पन्न वाढावे याकरिता ठोस प्रयत्न करणारे प्रा. ग्रुपापूर अँटनी डेव्हिस हे एक सच्चा निसर्ग अभ्यासक, अभिमानी वनस्पतीशास्त्रज्ञ आणि कट्टर नारळ संशोधक म्हणून कायम लक्षात राहतील. त्या अर्थाने खरा भूमिपुत्र हेच त्यांचे यथार्थ वर्णन ठरेल.
त्रुपापूर अँटनी डेव्हिस(T A davis) यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९२३ रोजी तमिळनाडूच्या नागरकॉइल शहरात झाला. ते १९४४ मध्ये मद्रास विद्यापीठातून एमएससी झाले आणि कोइंबतूर येथील मद्रास अँग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये क्रॉप फिजिऑलॉजीचा पुढील अभ्यास करण्यासाठी दाखल झाले. या संस्थेतून उत्तीर्ण झाल्यावर ते पंजाबमधील कर्नालच्या ऊस संशोधन केंद्रात संशोधक म्हणून रुजू झाले. त्यानंतर अँटनी केरळातल्या क्यानगुलम येथील नारळ संशोधन केंद्रात नारळाच्या शरीर- क्रियाशास्त्राचे अभ्यास म्हणून काम सुरू केले. त्यानंतरचे त्यांची सारी संशोधन कारकीर्द नारळाच्या पिकाचा विविध अंगांनी केलेल्या अभ्यासानेच भरलेली आहे.
अँटनी यांनी १९६० मध्ये कोलकात्याच्या इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटमध्ये पीक विज्ञान विभागाचे प्राध्यापक म्हणून काम सुरू केले. याच ठिकाणी १९७२ मध्ये त्यांनी आपले पीएचडीचे संशोधन पूर्ण केले आणि इथेच त्यांनी स्वतंत्र पाम संशोधन केंद्र सुरू केले. त्यातून भारतात पाम वृक्षांबाबतच्या संशोधनाचे कितीतरी मार्ग निर्माण झाले आणि त्याने कितीतरी तरुण वनस्पतीशास्त्रज्ञांना या विषयात संशोधन करण्याची प्रेरणा दिली. त्यातूनच पुढे पाम वृक्षांचा अभ्यास, त्याचे शास्त्र व संशोधन याचा समावेश देशातील वैज्ञानिक संशोधनाच्या मुख्य प्रवाहात होऊ लागला. त्याचाच परिणाम म्हणून ते इंडोनेशियातील नारळ संशोधन संस्थेच्या फुड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन मध्ये (एफएओ) नारळतज्ज्ञ म्हणून दाखल झाले.
१९८२ मध्ये त्यांनी त्यांचे मार्गदर्शक जेबीएस हाल्डेन यांच्या स्मृत्यर्थ नागरकोइल येथे हाल्डेन रिसर्च सेन्टरची स्थापना केली. प्रख्यात निसर्ग अभ्यासक, गणिती व तत्त्वज्ञ असलेले हाल्डेन यांचा मोठा प्रभाव डॉ. अँटनी यांच्या आयुष्यावर मोठा प्रभाव होता. डॉ. अँटनी यांनी विविध प्रकारच्या वनस्पतींमधील वेगवेगळ्या प्रकारच्या पुष्परचनांच्या आणि अपुष्प वनस्पतींच्या शंकूंमधील स्पोरोफिल्सच्या सर्पिलाकार रचनांचा अभ्यास करून त्याचा फ्लिबोनासी नंबरशी असलेला संबंध सिद्ध केला. कोलकात्यात त्यांनी पाम सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना केली. यातून देशातील नारळवर्गीय वनस्पतींच्या संशोधनाची या विषयातील आंतरराष्ट्रीय संशोधनाशी नाळ जोडली जावी व त्यांतील सहकार्यांचे पर्व सुरू व्हावे, अशी कल्पना होती. ते आंतरराष्ट्रीय पाम सोसायटीच्या संचालक मंडळाचे सदस्य बनले. १९७९ साली त्यांची बंगळुरूच्या इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या प्लान्ट सायन्सेस विभागाचे फेलो म्हणून निवड झाली.
एक सच्चा निसर्ग अभ्यासक, एक अभिमानी वनस्पतीशास्त्रज्ञ आणि कट्टर नारळ संशोधक म्हणून ओळख प्राप्त केलेले प्रा. त्रुपापूर अँटनी डेव्हिस हे खऱ्या अर्थाने भूमिपुत्र होते, ज्यांनी केवळ नारळाच्या पिकावर संशोधन न करता देशातील नारळाचे उत्पन्न वाढावे याकरिता ठोस प्रयत्नही केले. सजीवसृष्टीतील वैविध्य खऱ्या अर्थाने समजून घेण्यासाठी एखादा जन्मही अपूरा आहे, हे त्यांचे आवडते विधान होते. १० नोव्हेंबर १९८९ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
लेखक :- रईस अल्ताफ
(रईस अल्ताफ हे विज्ञान प्रसारमध्ये प्रकल्प सहाय्यक असून विज्ञान संवादक व लेखक आहेत.)
(साभार: डिसेंबर २०२२ च्या विज्ञान विश्व अंकात प्रसिद्ध झालेली लेखमाला)