देशद्रोही खलिस्तानी प्रवृत्तीचे समूळ उच्चाटन आवश्यक…
आम्हाला हिंदुत्व, हिंदुराष्ट्राबद्दल ज्ञानामृत पाजणारा भुरट्या अमृतपाल आता कुठे दडी मारून बसला आहे?
इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान भारतात दहशतवाद पसरवण्याची एकही संधी सोडू इच्छित नाही. काश्मीरमध्ये त्यांचं काही चालत नाही म्हणून दळभद्री इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्ताने आता पंजाबात आग लावण्याचं ठरवलेले दिसते.
खलिस्तानी समर्थक (Khalistan supporters) अमृतपाल सिंग यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ लंडनमधील( london) भारतीय उच्चायुक्तालयाची तोडफोड करण्यात आली. रविवारी संध्याकाळी शेकडो खलिस्तान समर्थक उच्चायुक्तालयाबाहेर जमले. इमारतीत घुसून त्यांनी तिरंगा उतरवला (Insult of Indian tricolor in Britain). खलिस्तान समर्थकांच्या हातात खलिस्तानी झेंडा आणि अमृतपाल सिंग यांचे पोस्टर होते. पोस्टर्सवर ‘फ्री अमृतपाल सिंग’, ‘वुई वाँट जस्टिस’ आणि ‘वुई स्टँड विथ अमृतपाल सिंग’असे लिहिलेले फलक होते. दुसरीकडे भारताने यावर तीव्र आक्षेप घेत दिल्लीतील ब्रिटिश उच्चायुक्तांना ताबडतोब बोलावून घेतले आणि समज दिली आहे.
खलिस्तानवादी तसेच “वारीस पंजाब दे” संस्थेचा प्रमुख अमृतपाल सिंग विरोधात अटकेचा फास पंजाब पोलीसांनी आवळला आहे. त्याच्या समर्थकांना ताब्यात घेण्याची कारवाई सुरू झाली आहे. पंजाब पोलीसांनी अमृतपाल सिंगला फरार घोषित केले आहे.फरार अमृतपालला शोधण्यासाठी पंजाब पोलीस आकाश-पाताळ एक करत आहे. या कारवाईचा विरोध म्हणून ब्रिटनच्या भारतीय उच्चायुक्त कार्यालयाबाहेर खलिस्तानी समर्थकांनी घोषणाबाजी केली. यावेळी तिरंग्याचा अवमान करण्याचा प्रयत्न केला गेला. भारतीय तिरंगा उतरवून खलिस्तानी झेंडा फडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, तेथील भारतीय वंशाच्या सुरक्षारक्षकाने घडला प्रकार लक्षात येताच मध्यस्थी करत खलिस्तान्यांपासून तिरंगा वाचवला. या संपूर्ण प्रकरणाचा व्हीडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कोण हा अमृतपाल (Amritpal Singh) :-
अमृतपाल स्वत: ला जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांचा अनुयायी मानतो. त्याचे वागणे-बोलणे, गळय़ात काडतुसांचा पट्टा घालून हिंडणे हे भिंद्रनवाले सारखेच. शिकून नोकरीधंद्यासाठी दुबईत असताना तेथील वास्तव्यात हा इसम शीख धर्माची पवित्र प्रतीके मिरवत नव्हता. तेथे असताना पंजाबातील तरुणांच्या अस्वस्थतेस ठिणगी लावता येईल असे वाटल्याने याने भिंद्रनवाले यांचा अवतार धारण केला. पण मुळात हा तोतया. त्यास शीख धर्माची संथा दिली गेली गेल्या वर्षी सप्टेंबरात. म्हणजे आपण मोठे धर्माभिमानी असल्याचे जरी तो भासवत असला तरी त्याचे धर्मप्रेम अलीकडचे आणि ढोंगी आहे.
शेतकरी आंदोलनाच्या काळात दिल्लीत लाल किल्ल्यावर खलिस्तान ध्वज फडकावणारा कलाकार दीप सिद्धू हे अमृतपालचे प्रेरणास्थान. नंतर हा सिद्धू आकस्मिकपणे रस्ते अपघातात मारला गेला. पुढे अमृतपालने दीप सिद्धूची ‘वारिस पंजाब दे’ ही संघटनाच ताब्यात घेतली. या संघटनेने वास्तविक फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस पंजाबातील एका पोलीस ठाण्यावर हल्ला करून आपण आणि आपली संघटना काय करू शकते, याची चुणूक दाखवून दिली होती. त्याच वेळी याच्या मुसक्या आवळणे आवश्यक होते. परंतु अमृतपालने शिताफीने पवित्र ग्रंथाला पुढे केल्याने पोलिसांचा नाइलाज झाला.
अमृतपालच्या १४० साथीदारांना अटक
या दरम्यान अजनाला पोलीस ठाण्यावर हल्ला करणाऱ्या अमृतपालला पकडण्यासाठी पंजाब पोलीस गेल्या ३ दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत मोहीम राबवत आहेत. पोलिसांनी रविवारी अमृतपालच्या आणखी ४५ साथीदारांना अटक केली. आतापर्यंत पोलिसांनी १४० जणांना अटक केली आहे. राज्यभर फ्लॅग मार्च काढण्यात येत आहेत. दुसरीकडे, अमृतपालच्या समर्थकांनी दावा केला की, रात्री उशिरा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मात्र, पोलिसांनी हे आरोप फेटाळले आहेत.
अमृतपाल हा इंग्लंडमध्ये बसलेल्या खलिस्तानींचा शिष्य
पंजाब पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार अमृतपालचे नाव अवतार सिंह खांडासोबत जोडले आहे.अवतारसिंग खांडा हा बब्बर खालसा( babbar khalsa) प्रमुख परमजीत सिंग पम्मा याचा जवळचा सहकारी असून तो इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानात लपून बसला असून ‘बब्बर खालसा यूके’ला तो ऑपरेट करतो.
बब्बर खालसा सध्या प्रोजेक्ट K2 (खलिस्तान २) वर काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. याअंतर्गत काश्मीरमधील प्रक्षोभक कारवायांसोबतच पंजाबमध्ये पुन्हा एकदा खलिस्तानी चळवळ उभी करण्याची योजना आहे. बब्बर खालसा इंटरनॅशनलचे प्रमुख परमजीत सिंग पम्मा आणि अवतार सिंग खांडा यांनी पंजाबमध्ये खलिस्तान चळवळीला पुनरुज्जीवित करण्याच्या उद्देशाने अमृतपालला पंजाबला पाठवले होते.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी केले
या घटनेनंतर, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे. लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाविरुद्ध फुटीरतावादी आणि अतिरेकी घटकांनी केलेल्या हल्ल्याबद्दल भारताकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी ब्रिटनच्या वरिष्ठ राजदूताला आज संध्याकाळी उशीरा बोलावण्यात आले आहे. यादरम्यान, ब्रिटिश सुरक्षा कर्मचार्यांच्या अनुपस्थितीबद्दल स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. भारतीय दूतावासाच्या संरक्षणासाठी आवश्यक असलेले ब्रिटिश पोलिस अधिकारी तेथे अनुपस्थित होते. ब्रिटनमधील भारतीय राजनैतिक परिसर आणि कर्मचारी यांच्या सुरक्षेबाबत ब्रिटन सरकारची उदासीन भूमिका भारताला अमान्य आहे.
ब्रिटनमध्ये खलिस्तानी लॉबी शक्तिशाली आहे…
इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या(ISI) इशाऱ्यावर काम करणारी खलिस्तानी लॉबी ब्रिटनमध्ये मजबूत आहे. इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या इशाऱ्यावर हे खलिस्तानी भारतीय उच्चायुक्तालयाला बऱ्याच दिवसांपासून लक्ष्य करत आहेत. भारतविरोधी आंदोलनात इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या नागरिकांचा सहभाग असल्याचे पुरावेही समोर आले आहेत. ब्रिटिश सरकार त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानते. त्यामुळेच भारताकडून वारंवार विनंती करूनही या हल्लेखोरांवर कठोर कारवाई होत नाही. पण, यावेळी भारताने ब्रिटीश उच्चायुक्तांना बोलावून आपले इरादे व्यक्त केले आहेत.
लंडनमध्ये तिरंगा खाली उतरवणाऱ्या खलिस्तानी समर्थकांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. लंडनध्ये भारतीय उच्चायुक्तालयावर फडकावलेला तिरंगा १९ मार्च रोजी खलिस्तानी समर्थकांनी खाली उतरवला होता. मात्र आता या इमारतीवर पूर्वीपेक्षा दसपट मोठा तिरंगा फडकावून खलिस्तानी समर्थकांना सडेतोड उत्तर देण्यात आलं.
आम्ही शांतता प्रिय आहोत म्हणून कोणीही आम्हाला दुर्बल लेखू नये. आंदोलनापर्यंत ठीक होते पण जर कोणी आमच्या प्राणप्रिय राष्ट्रध्वजाला हात लावणार असेल तर मग त्याचा संपूर्ण नि:पात केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही एवढे निश्चित.
दिल्लीमध्ये या हल्ल्याविरोधात शीख बांधवांनी मोठ्या संख्येने ब्रिटिश उच्चायुक्तांच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावरून हे स्पष्ट अधोरेखित होते की हे माथेफिरू खलिस्तानी एकूण शीख लोकसंख्येच्या ०.०१% देखील नाहीत. सर्वसामान्य जनतेमध्ये खलिस्तानला अजिबात पाठिंबा नाही… भारतीय लष्करातील शीख बांधवांच्या एकूण सहभागाची लक्षणीय संख्या बघता या टक्केवारीचे प्रमाण पटेल…
अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को इथं, खलिस्तानवादी उग्रवाद्यांनी भारतीय वकिलातीवर केलेल्या हल्ल्याची अमेरिकी सरकारने निंदा केली आहे. राजनैतिक अधिकाऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आपली असून, असली विध्वंसक कृत्य खपवून घेतली जाणार नाहीत असं अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे. या हल्ल्यासंदर्भात भारताने तीव्र निषेध नोंदवल्यानंतर अमेरिकेने ही प्रतिक्रिया दिली आहे.
खलिस्तानी म्हणजे इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या पैशावर पोसलेली मूठभर बांडगुळे आहेत परंतु आता मात्र शीख बांधवांनी या देशद्रोही प्रवृत्ती विरुद्ध सक्रियतेने पुढे यायला हवे एवढे निश्चित… कारण या खलिस्तान्यांना फक्त भारतातील पंजाब हा खलिस्तान म्हणून वेगळी भूमी, वेगळा देश हवा आहे… जिथे शीख बांधवांची श्रद्धास्थाने… ननकानासाहिब आणि करतारपूरसाहिब आहेत… त्या इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमधील पंजाब (Punjab) प्रांताबद्दल खलिस्तानी अवाक्षरही काढत नाहीत… त्यांच्या स्वप्नातील खलिस्तान मध्ये फक्त भारतातील पंजाबची भूमी आहे… फाळणीच्या वेळी दुर्दैवाने अर्धा पंजाब इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानात गेला हे बहुदा त्यांनी Settled Fact म्हणून मान्य केले असावे… म्हणजे त्यांच्या स्वप्नातील खलिस्तान देखील अर्धवटच आहे… आश्चर्य म्हणजे भारतीय सरहद्दीला लागून असलेले… आमच्या अटारी सीमेपासून जेमतेम २५ किलोमीटर अंतरावर असलेले… राजा रणजित सिंह यांचे इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानातले लाहोर देखील त्यांना नको आहे… भारतातील पंजाब हा खलिस्तान नावाचा वेगळा देश व्हावा ही मागणी म्हणजे… भारतातील नांदेडच्या सचखंडसाहिब आणि बिहारमधील पटनासाहिब या शिख बांधवांच्या श्रद्धास्थान असलेल्या गुरुद्वारांना परके मानण्यासारखे आहे… अन्यथा त्यांनी नांदेड व पाटण्यासकट खलिस्तान मागावा… त्यातल्या त्यात ती तर्कशुद्ध मागणी होईल… ज्यांच्या बुद्धीने आपण चालतो, ज्यांच्या ओंजळीने पाणी पितो… त्या आपल्या मायबाप इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानची भूमी कशी मागायची… इतका साधा हा या खलिस्तानवाद्यांचा दुटप्पी हिशोब आहे…
कारण ८० च्या दशकात खलिस्तानी आंदोलनामुळे संपूर्ण देशाने आणि विशेषतः पंजाबने खूप भोगलं आहे… अमृतसरच्या सुवर्ण मंदिरातील (golden temple) लष्करी कारवाईने समाजाच्या मनावर एक कायमस्वरुपी ओरखडा ऊमटलेला आहे… आमच्या देशाच्या एक पंतप्रधान, एक मुख्यमंत्री, माजी लष्कर प्रमुख, शेकड्याने पोलीस कर्मचारी आणि एअर इंडियाच्या कनिष्क विमानातील दुर्दैवी प्रवाशांसकट हजारो निरपराध नागरीक या संघर्षात बळी गेलेले आहेत… अशी जीवितहानी आम्हाला पुन्हा परवडणारी नाही…आज ना उद्या… साम दाम दंड भेद निती वापरून ही खलिस्तानी विषवल्ली ठेचून काढावीच लागेल…
शेवटी इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया येथे बसून खलिस्तानची स्वप्ने बघणाऱ्या खलिस्तानवादी मूर्ख बांडगुळांना… वदंते प्रमाणे ८० च्या दशकात खलीस्तानचे चलन व पासपोर्ट छापून तयार ठेवणाऱ्या शतमूर्ख खलिस्तान्यांना… केंद्रात कोणत्याही पक्षाचे सरकार असो… ते खलिस्तानच्या मागणीला भीक घालत नाही… असल्या देशाचे विभाजन करणाऱ्या फुटीरतावाद्यांसमोर झुकत नाही… असा ४ दशकांचा अनुभव पाठीशी असूनही… आणि आता तर अखंड भारताचे स्वप्न बघणारे सरकार केंद्रात स्थानापन्न असताना… खलिस्तानसाठी निष्फळ वळवळ करणाऱ्यांना… एवढीच विनंती करावीशी वाटते…
ननकाना की ओर चलो
यदि पौरुष ने ललकारा है।
खालिस्तान न मांगो
पूरा हिंदुस्तान तुम्हारा है।।