शास्त्रज्ञ २२
गणिती शिक्षणतज्ज्ञ जे एन कपूर

२०२३ हे वर्ष एक-दोन नव्हे तर तब्बल २३ प्रख्यात भारतीय शास्त्रज्ञांच्या (indian scientists) जन्मशताब्दीचे वर्ष आहे. चला तर मग भारतभूमीच्या या २३ विद्वान विज्ञानकर्मींची महती आजच्या आणि उद्याच्या पिढीला सांगूया…
अध्यापन आणि गणित या दोहोंवर अगदी मनापासून प्रेम करणारा या शब्दांत जगतनारायण कपूर या बहुमुखी प्रज्ञेचा धनी असलेल्या शास्त्रज्ञाचा यथार्थपणे परिचय करून देता येऊ शकेल. गणिताच्या अध्यापनासाठी जगभर प्रवास करून केजी टू पीजी आणि त्याही पलिकडच्या स्तरांवर गणित कसे शिकवावे याचे मार्गदर्शन त्यांनी सातत्याने केले.
जगतनारायण कपूर (Jagat Narayan Kapur) हे बहुमुखी प्रज्ञेचे धनी होते. दिल्लीत ७ नोव्हेंबर १९२३ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या बुद्धिमत्तेची चमक शालेय वयातच दिसून आली. त्यांना गणितात विशेष रुची होती. ते असामान्य विद्यार्थी होते आणि प्रथम वर्गात बीएससीची परीक्षा सहजपणे पास झालेच, शिवाय तोवर पदवी आणि पदव्युत्तर परीक्षेत कोणत्याही विद्यार्थ्याला मिळाले नव्हते एवढे येत असत. विक्रमी गुण त्यांनी मिळवले.
दिल्ली विद्यापीठातून १९५७ साली ते पीएचडी झाले. त्यानंतर त्यांनी कानपूर येथील आयआयटीमध्ये प्रगत गणित अध्यापनास सुरुवात केली. अध्यापनाचे हे कार्य सुरू असतानाच प्रा. कपूर यांनी आपल्या दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या भौतिक आणि सामाजिक समस्यांची गणितीय प्रतिमानांच्या साह्याने सोडवणूक कशी करता येऊ शकेल, यावर काम सुरू केले. आर्थिक विकास, कालमापन, पर्यावरणाचा व्हास आदी त्यांनी काम केलेल्या काही प्रमुख समस्या आहेत. त्यांनी या विषयावर अनेक निबंधही प्रकाशित केले आणि लवकरच ते या विषयातील एक तज्ज्ञ म्हणून गणले जाऊ लागले.
त्यांच्या संशोधनापलिकडे त्यांनी शाळा-महाविद्यालयांमधील गणित अध्यापनाचा दर्जा सुधारण्यावरही लक्ष केंद्रित केले. गणित शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण वर्गाचं आयोजनही त्यांनी केलं. बुद्धिमान विद्यार्थ्यांसाठी ते अशाच प्रकारचे विशेष वर्गही आयोजित करीत असत. त्यांच्या या कार्याची दखल केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाने देखील घेतली.
प्रा. कपूर यांना शिकवायला आवडत असे. त्यामुळे आयआयटी कानपूर व्यतिरिक्त दिल्ली विद्यापीठ, जेएनयू, वॉटलू विद्यापीठ यांसारख्या अनेक संस्थांमध्येही ते शिकवायला जात. व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून त्यांना ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, अमेरिका, कॅनडा यांसारख्या देशांतल्या विविध विद्यापीठांतून सतत आमंत्रणे येत असत.
ते मीरत विद्यापीठाचे कुलगुरू बनले आणि तेथे काही वर्षे त्यांनी सक्षम नेतृत्त्वाचा परिचय दिला. १९८६-८७ या दोन वर्षांत ते इन्साचे वरिष्ठ वैज्ञानिक म्हणूनही कार्यरत होते.
कपूर अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्थांशीही निगडित होते. त्यांनी मॅथेमॅटिक्स टीचर असोसिएशन ऑफ इंडियाला आकार दिला.
त्यांनी गणित आणि विज्ञान शिक्षण या विषयावरील नियतकालिकांचे संपादनही केले आणि नव्या लेखकांना मार्गदर्शन केले. एनसीईआरटी अर्थात राष्ट्रीयशैक्षणिक संशोधन परिषदेच्या, तसेच राष्ट्रीय खुले शिक्षण संस्थेच्या (एनआयओएस) पुस्तकांचे संपादनही त्यांनी केले. ४ सप्टेंबर २००२ रोजी अखेरचा श्वास घेईपर्यंत ते या कामात गुंतलेले होते.
प्रा. कपूर यांनी गणिती प्रतिमाने, गणिताचा इतिहास, शिकविण्याच्या प्रभावी पद्धती यांसह अनेक वेगवेगळ्या विषयांवरील ५० हून अधिक पुस्तकेही लिहिलेली आहेत. या कार्याबद्दल त्यांना १९८८ चे इंडियन सायन्स काँग्रेसचे जीपी चॅटर्जी अवॉर्ड, १९८५ चे मॅथेमॅटीकल असोसिएशन ऑफ इंडियाचे डिस्टिंग्विश्ड सर्व्हिस अवॉर्ड, शिक्षण मंत्र्यांचे सुवर्ण पदक आणि नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसचे डिस्टिंग्विश्ड रिसर्च अवॉर्ड आदी पुरस्कार देण्यात आले. ते बंगळुरूच्या इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेस चे फेलो होते. तसेच अलाहाबादची नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस आणि ब्रिटनची इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिक्स अँड इट्स अप्लिकेशन्स या संस्थांचे ते सदस्य होते. इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटी व कोलकाता मॅथेमॅटिकल सोसायटी या संस्थांचे अध्यक्ष पदही त्यांनी भूषविले होते.
लेखक :- डॉ. सुधाकर आगरकर
(डॉ. सुधाकर आगरकर हे मुंबईतील टाटा मुलभूत संशोधन संस्थेचे निवृत्त प्राध्यापक असून निवृत्तीनंतर ठाण्यातील व्हीपीएम अकॅडमीचे प्राध्यापक व अधिष्ठाता आहेत.)
(साभार: डिसेंबर २०२२ च्या विज्ञान विश्व अंकात प्रसिद्ध झालेली लेखमाला)