शास्त्रज्ञ २३
शरीरक्रियाशास्त्राचे नवे आकलन देणारे एमआरएन प्रसाद
२०२३ हे वर्ष एक-दोन नव्हे तर तब्बल २३ प्रख्यात भारतीय शास्त्रज्ञांच्या (indian scientists) जन्मशताब्दीचे वर्ष आहे. चला तर मग भारतभूमीच्या या २३ विद्वान विज्ञानकर्मींची महती आजच्या आणि उद्याच्या पिढीला सांगूया…
मानवासहित विविध प्राण्यांच्या प्रजनन संस्थांचा आणि तत्संबंधित शरीरक्रियांचा अभ्यास करून प्रजनन नियंत्रणाच्या जागतिक प्रयत्नांत मोलाची भर टाकणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ म्हणून मुलुर रामस्वामी- अय्यंगार नरसिंह प्रसाद यांचे नाव कायम ओळखले जाईल.
मुलर रामस्वामी अय्यंगार नरसिंह प्रसाद(Malur Ramaswamy-Iyengar Narasimha Prasad) यांचा जन्म ५ जानेवारी १९२३ रोजी झाला. आंतांवी ग्रंथींचे एक प्रख्यात अभ्यासक, प्राध्यापक आणि जननसंस्था व प्रजननक्षमता नियंत्रण या विषयातील तज्ज्ञ म्हणून ते ओळखले जातात. अमेरिकेतील विस्कॉन्सिन विद्यापीठातून त्यांनी पीएचडी शिक्षण पूर्ण केले.
प्रसाद यांची प्राणीशास्त्रातील संशोधनाची कारकीर्द १९४५ मध्ये सुरू झाली. त्यावेळी ते बंगळुरूच्या सेंट्रल कॉलेजमध्ये होते. १९५९ ते ७७ याकाळात ते दिल्ली विद्यापीठात प्राणीशास्त्राचे प्राध्यापक होते. तेथेच त्यांनी जननसंस्थेच्या शरीरक्रियाशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांचा गट बांधला. या गटाचे काम इतके अचूक होते की त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळाली. भारतात नारळांवर दिसणाऱ्या पाच पट्टेवाल्या खारींचे प्रजनन चक्र, उंदरांमधील क्लॉमिफेनचा परिणाम, इस्ट्रोजेन रोखणाऱ्या प्रथिनांचा प्रजजनावरील परिणाम असे अनेक विषयांवरील शोधनिबंध त्यांनी लिहिले. त्यातील सखोलतेने वैज्ञानिक जगत प्रभावित झाले. त्यातून १९८३ पर्यंत त्यांना जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) जिनेव्हा येथील मुख्यालयात मानवी प्रजनन या विषयावर संशोधन करण्याची संधी मिळाली. ते दिल्लीतील केंद्रीय कुटुंबकल्याण संस्थेच्या जीवशास्त्र संशोधन विभागाचेही अध्यक्ष होते.
कृत्रिम रेतनाचे हार्मोनल नियंत्रण कृदंत प्राण्यांचे प्रजनन जीवशास्त्र, सस्तन प्राण्यांतील पिच्युटरी गोनॅडोप्रोटीन, पालीतील प्रजनन शरीरक्रियाशास्त्र, गर्भावरणाचे शरीरक्रियाशास्त्र, माशांच्या मेंदूतील सक्कस व्हॅस्क्युलसचे शरीरक्रियाशास्त्रीय महत्त्व अशा विविध विषयांवरील संशोधनातून विविध प्राण्यांच्या प्रजननाशी संबंधित शरीरक्रिया शास्त्रातील संशोधनात प्रसाद यांनी मोलाचे योगदान दिले. त्वचेच्या बाह्यावरणाचे शरीर क्रियाशास्त्र आणि पुरुष प्रजनन संस्था यावरील त्यांच्या संशोधनाचा परिणाम म्हणून पुरुष प्रजनन नियंत्रणाच्या वेगवेगळ्या पद्धती विकसीत होऊ दिले. शकल्या. या संशोधनाच्या आधारावरच जागतिक आरोग्य संघटनेने अनेक ठिकाणी एकाच वेळी केल्या जाणाऱ्या वैद्यकीय चाचण्यांचेही आयोजन केले होते. स्त्रियांमधील इस्ट्रोजेन स्राव आणि त्याला प्रतिरोध करणारे स्राव यांच्या तुलनात्मक एन्डेक्रेनॉलॉजीवरही त्यांनी संशोधन केले होते.
इंटरनॅशनल प्लॅन्ड पेरेन्टहुड फेडरेशन, इंटरनॅशनल सोसायटी ऑफ अन्ड्रॉलॉजी, सोसायटी फॉर स्टडी ऑफ फर्टिलिटी आदी संस्थांचे सदस्य म्हणूनही त्यांनी मोलाची कामगिरी केली. इंडियन नॅशनल सायन्स असोसिएशन (इन्सा) च्या प्रकाशनांचे संपादक म्हणूनही त्यांनी १९७१ ते ७४ या काळात काम केले. भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था (आयसीएमआर) आणि भारत सरकारचे आरोग्य मंत्रालय यांच्यासोबत त्यांनी मानवी प्रजनन व कुटुंब नियोजन कार्यक्रमासाठीही मोलाचे योगदान दिले.
प्रा. प्रसाद यांना १९७२ चे फिक्की पारितोषिक, १९७६ चा सर जगदीशचंद्र बोस पुरस्कार आणि १९८३ साली डॉ. सौ. शांता राव स्मृती व्याख्यान देण्याचा सन्मान मिळाला. बंगळुरूच्या इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेसचे फेलो म्हणून ते निवडले गेले होते. तसेच, इंटरनॅशनल सोसायटी फॉर रिसर्च इन बायोलॉजी ऑफ रिप्रॉडक्शनचे उपाध्यक्ष म्हणून आणि इंडियन नॅशनल सायन्स असोसिएशनचे (इन्सा) उपाध्यक्ष म्हणून त्यांनी १९७५-७६ दरम्यान काम केले. त्याशिवाय ‘इन्सा’ने त्यांच्या सन्मानार्थ प्राण्यांच्या शरीरक्रियाशास्त्रातील संशोधनाला व्यासपीठ मिळवून देण्याकरिता प्रोफेसर एमआरएन प्रसाद मेमोरियल लेक्चर अशा नावाने विशेष व्याख्यांनांचे आयोजन करण्यास सुरुवात केली. ७ ऑक्टोबर १९८७ रोजी डॉ. एमआरएन प्रसाद यांचे निधन झाले.
लेखक :- निमीष कुमार
(श्री निमिष कपूर हे विज्ञान प्रसारमधील वैज्ञानिक असून विज्ञान संवादक, लेखक आणि विज्ञान चित्रपटांचे निर्माते आहेत.)
(साभार: डिसेंबर २०२२ च्या विज्ञान विश्व अंकात प्रसिद्ध झालेली लेखमाला)
लेखमाला समाप्त …