खलिस्तान नावाचा कॅन्सर .. भाग १

कोरोनारूपी व्हायरसवर यशस्वी विजय मिळवल्यानंतर आता या खलिस्तान रुपी कॅन्सरला आपल्याला धीरोदत्तपणे सामोरे जावे लागणार आहे. या ५ भागांच्या लेखमालेत आम्ही खलिस्तानच्या(khalistan) मानसिकतेचा आणि भिंद्रनवाले, अमृतपाल सिंह यांच्या इतिहासाचे पदर उलगडून सांगणार आहोत
शेजारी इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान सारखा शत्रुदेश असताना अशा प्रकारे एका हिंस्त्र जमावाने संशयित आरोपीच्या सुटकेसाठी हल्ला करून पोलिसांना शरणागती पत्करायला लावणे, राज्य आणि केंद्र सरकारला भविष्यात तापदायक ठरणार आहे हे नक्की.’ :-
अमृतसर जिल्ह्यातील अजनाला पोलिस ठाण्यावर हजारो सशस्त्र शीख तरुणांना घेऊन हल्ला करणाऱ्या आणि ‘वारिस दे पंजाब’ (waris punjab de) या संघटनेच्या लव्हप्रीतसिंग तुफान या तथाकथित नेत्याच्या सुटकेसाठी पुढाकार घेणाऱ्या अमृतपालसिंगचे नाव गेल्या काही दिवसांत जगभर झळकते आहे. कुणी त्याला जर्नेलसिंग भिंद्रनवालेचा वारसदार म्हणत आहे, तर कुणी खलिस्तान चळवळीचा नवीन दहशतवादी चेहरा अशा स्वरूपात समोर आणत आहे. हा कोण आहे, याबद्दल पंजाबमधील लोकांना जशा अनेक शक्यता आणि शंका आहेत, तसा संशयही वाटतो आहे आणि त्याचे कारणही तसेच आहे.

पंजाबच्याच रूपनगर येथील चमकौर साहिब गुरुद्वाराचे वारिंदरसिंग यांचे अपहरण आणि छळ केल्याचे आरोप लावून पोलिसांनी अमृतपालचा सहकारी लव्हप्रीतसिंग तुफान याला अटक केली. अमृतसर जिल्ह्यातील अजनाला पोलिस ठाण्यात याविषयी दाखल झालेल्या तक्रारीमध्ये अमृतपालचे नाव होते. अजनाला पोलिस ठाण्यावर मोठ्या संख्येने तरुणांना घेऊन शस्त्रांचा वापर होऊनही आणि प्रक्षोभक घोषणा देऊनही पोलिसांनी कुठलाही लाठीचार्ज, गोळीबार, अथवा अश्रूधूर सोडला नाही, की कोणताच प्रतिकारही केला नाही.
काय म्हणाला अमृतपाल ;-
अमृतपाल (Amritpal Singh) म्हणाला की, ”मी खलिस्तानचे समर्थन करणार्या प्रत्येक व्यक्तीसोबत आहे. मी शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीला सांगू इच्छितो की, त्यांनी केंद्र सरकारचे कायदे पाळू नयेत, त्यांनी स्वत:ची राज्यघटना तयार करावी.”यापूर्वी अमृतपाल सिंग याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासारखीच हत्या होईल, अशी धमकी दिली होती.
पोलिसांचे म्हणणे काय ?

ह्या घटनेबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना विचारले असता तेव्हा ते म्हणाले, “‘हा जमाव येतो आहे. तो सशस्त्र आहे आणि परिस्थिती बिघडू शकते याची कल्पना आम्हाला होती. त्यासाठी मोठा बंदोबस्तही ठेवला होता. आमच्याकडे देखील आधुनिक शस्त्रे होती. मात्र, या जमावातील एका गटाच्या हातात शिखांचा पवित्र ग्रंथ गुरुग्रंथसाहिब होता. आमच्या हातून काही चूक झाली असती, लाठीमार किंवा गोळीबार केला असता, तर त्याची प्रतिक्रिया म्हणून गुरू ग्रंथ साहिबचा आम्ही अपमान केला असे वातावरण काही लोकांनी तयार केले असते आणि त्याची देशभर प्रतिक्रिया उमटली असती. ते टाळण्यासाठी आम्ही अतिशय संयमाची भूमिका घेतली.यापूर्वीही म्हणजे १४ ऑक्टोबर २०१५ रोजी गुरुग्रंथसाहिबची काही पाने विस्कळित अवस्थेत फरिदकोट जिल्ह्यात सापडली होती. त्यासाठी आंदोलन करणारे काही तरुण पोलिस गोळीबारात ठार झाले आणि पूर्ण पंजाब पेटला होता. तो विझवता-विझवता पोलिसांना मोठी किंमत चुकवावी लागली. याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून देशाच्या आणि पंजाबच्या हितासाठी प्रसंगी आम्ही मार खाल्ला; पण वातावरण बिघडू दिले नाही.”
अमृतपाल गुरुद्वाऱ्यातील खुर्च्या आणि सोफे जाळल्यामुळे चर्चेत ;-
अमृतपाल अनेकदा आपल्या सशस्त्र समर्थकांसह पंजाबमध्ये ( punjab) सक्रिय दिसतो. अमृतपाल गेल्या वर्षी प्रकाशझोतात आला जेव्हा त्याच्या समर्थकांनी जालंधरमधील मॉडेल टाऊन गुरुद्वारामध्ये खुर्च्या जाळल्या. गुरुद्वारामध्ये भाविकांसाठी खुर्च्या आणि सोफा ठेवण्यास माझा विरोध आहे, कारण ते शीख धर्माच्या तत्त्वांच्या विरोधात आहे, असे त्याने म्हटले होते. अमृतपाल म्हणाला होता की, “आपण गुरु साहिबांच्या बरोबरीने बसू शकतो का? येथे खुर्च्या आणि सोफे बसवून गुरुद्वाराला राजवाडा बनवण्यात आला आहे.”
त्यानंतर समर्थकांनी धारदार शस्त्रांनी सर्व खुर्च्या आणि सोफ्यांच्या गाद्या फाडल्या. सर्व खुर्च्या आणि सोफे गुरुद्वाराबाहेर फेकण्यात आले आणि त्यावर पेट्रोलटाकून जाळण्यात आले.
सुधीर सुरी हत्या प्रकरणातही नाव समोर आले होते

अमृतपाल हा जर्नेलसिंग भिंद्रनवालेचा समर्थक आहे. तो खलिस्तानी समर्थक मानला जातो. समानतेमुळे त्याला भिंद्रनवाले २.०म्हटले जात आहे. पंजाबमधील शिवसेना नेते सुधीर सुरी यांच्या हत्या प्रकरणातही अमृतपालचे नाव पुढे आले होते. सुधीर सुरी यांच्या कुटुंबीयांनीही या हत्या प्रकरणात अमृतपाल सिंगचे नाव समाविष्ट करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पोलिसांनी अमृतपाल सिंगला मोगाच्या सिंगवाला गावात नजरकैदेत ठेवले.
(क्रमशः )