भगवान महावीर
कुंडग्राम वैशाली (बिहार) राज्याचे गणराज्य असलेल्या क्षत्रियकुंड येथे चैत्र शुक्ल त्रयोदशीच्या दिवशी इसापुर्व सुमारे ६०० वर्षांपूर्वी भगवान महावीरांचा ( bhagwan mahavir) जन्म झाला. महाराणी त्रिशाला ही भगवान महावीरांची आई आणि महाराज सिद्धार्थ त्यांचे वडील होते. भगवान महावीर हे वर्धमान, महावीर, सन्मती, श्रमण आणि इतर अनेक नावांनी ओळखले जातात. २३ वे तीर्थंकर भगवान पार्श्वनाथ (bhagwan parshwanath) यांना निर्वाण (मोक्ष) मिळाल्यानंतर १८८ वर्षांनी त्यांचा जन्म झाला. भगवान पार्श्वनाथ यांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता .
भगवान महावीरांच्या जन्माच्या वेळी त्यांची आई त्रिशाला यांना १६ प्रकारची स्वप्ने पडली होती, अशी मान्यता आहे. त्या स्वप्नांना जोडून महाराज सिद्धार्थांना त्यात दडलेला संदेश समजला. ज्यानुसार जन्माला येणारा मुलगा ज्ञानप्राप्ती करणारा, सत्य आणि धर्माचा प्रचारक, जगतगुरु इत्यादी महान गुणांचा असेल. याची खात्री पटली . भगवान महावीरांचे बालपणीचे नाव वर्धमान होते.
महावीर लहानपणापासूनच हुशार आणि धाडसी होते . एकदा एक मदमस्त हत्ती नगरात धुमाकूळ घालत असताना त्याला त्यांनी शांत केले होते. लहानपणी मित्रांसोबत झाडावर पारंब्यांवर खेळताना जवळून आलेल्या अजगराचा त्यांनी शांत आणि निर्भयपणे मुकाबला केला. त्यांच्या धाडसाच्या अनेक कथा सांगितल्या जातात.म्हणून त्यांना वीर असे संबोधन शोभून दिसते. युद्धकलेत ते तरबेज होते . ते उत्कृष्ट घोडेस्वार होते. मल्ल विद्येत महारथी होते. उत्तम पोहणे त्यांना येत असे.संगीतात ते पारंगत होते. अनेक कलांचा त्यांनी अभ्यास केला होता.
त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर, सर्वार्थाने सर्वगुणसंपन्न असे ते झाल्यावर त्याच्या पालकांनी सिद्धार्थ आणि प्रीयकारिणी यांनी त्यांचा विवाह वसंतपूरचे महासमंत समरवीर यांची कन्या यशोदा यांच्याशी केला.महावीर स्वामी हे अंतर्मुख व्यक्तिमत्व होते.त्यांना सुरुवातीपासून सांसारिक सुखांमध्ये फारसा रस नव्हता, परंतु त्यांनी आपल्या आईवडिलांच्या इच्छेनुसार लग्न केले .
महावीर स्वामींची संन्यास घेण्याची इच्छा आई-वडील गमावल्यानंतर प्रकट झाली, त्यांनी आपल्या मोठ्या भावाला परवानगी मागितली तेव्हा त्यांनी आपल्या भावाला थोडा वेळ राहण्याची विनंती केली. आपल्या भावाच्या आज्ञेनुसार, महावीर स्वामीजींनी दोन वर्षांनी वयाच्या ३०व्या वर्षी संन्यास घेतला.
महावीर स्वामी वयाच्या तिसाव्या वर्षी परिपूर्ण नियंत्रणाने श्रमण झाले. महावीर स्वामीनी दीक्षा घेतल्यानंतर अत्यंत कठोर तपश्चर्या केली आणि अनेक कठीण उपसर्ग धीराने सहन केले. साधनेच्या बाराव्या वर्षी महावीर स्वामी मेडिया गावातून कोशांबीला आले आणि त्यानंतर पौष कृष्ण प्रतिपदेच्या दिवशी अत्यंत कठोर अभिग्रहण केले. त्यानंतर वैशाख शुक्ल दशमीच्या दिवशी साडे बारा वर्षांच्या कठोर तपश्चर्या आणि साधनेनंतर महावीर स्वामीजींना रिजुबालुका नदीच्या काठी शालवृक्षाखाली केवल ज्ञान-तत्त्वज्ञानाची प्राप्ती झाली.
महावीरच्या इतर नावांमध्ये वीर, अतिवीर आणि सन्मती यांचा समावेश होतो. महावीर स्वामींनी २३ वे तीर्थंकर पार्श्वनाथ यांच्या तत्त्वांना ‘जैन धर्म’ म्हणून ओळखला जाणारा एक विशाल धर्म बनण्यास मदत केली. ते अतिंम तीर्थंकर म्हणून ओळखले जातात . भगवान महावीरांचा भारतावर मोठा प्रभाव होता. त्यांच्या उपदेशाचा त्या वेळी जनमानसावर आणि राज्य कार्त्यांवर सुयोग्य परिणाम झाला आणि अनेक राज्यकर्त्यांनी जैन धर्माला त्यांचा राज्यधर्म बनवला. अनेक राजांनी जैनधर्म स्वीकारला.
भगवान महावीरांच्या मते अहिंसा हा जैन धर्माचा पाया आहे. ते तत्कालीन हिंदू समाजात अस्तित्त्वात असलेल्या जाती रचनेच्या विरोधात होते आणि सर्वांना समानतेने वागवण्याचा त्यांचा आग्रह होता. त्यांनी ‘जगा आणि जगू द्या’ या तत्त्वाचा पुरस्कार केला. भगवान महावीर हे अहिंसा आणि अपरिग्रहाचे मूर्त स्वरूप होते, कारण त्यांनी सर्वांना एकाच नजरेने पाहिले.
महावीरांनी भारतवासीयांना अहिंसा शिकवली , त्यांनी स्त्री जातीचा अपमान बंद करून समानतेचा उपदेश दिला. स्त्रियांना धार्मिक व सामाजिक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने अधिकार आहेत असे सांगितले. आणि याच पायावर भिक्षुणी संघाची स्थापना केली . ३६००० इतक्या मोठ्या संख्येत भिक्षुणी या संघात होत्या आणि त्यांचे कार्याकलापांची जबाबदारी प्रधान चंदनबाला यांचेवर होती .
महावीरांनी ३२ वर्षे धर्मप्रसाराचे कार्य केले. भगवान महावीरांनी जन्मभर सर्व प्राणिमात्रांची चिंता केली , यज्ञाच्या नावाने केली गेलेली हिंसा त्यांना मान्य नव्हती . विश्वाच्या कल्याणाची कामना केली त्यासाठी भारतभर भ्रमंती केली. त्यांचे कार्य अनुकरणीय आहे आणि त्यांच्या अनुकरणातून आपण आपले ध्येय गाठू शकतो.अहिंसा, तपस्या, संयम, पाच महान प्रतिज्ञा, पाच समित्या, तीन गुपिते, अनेकांत, निःस्वार्थता, आत्मसाक्षात्कार हे सर्व संदेश भगवान महावीरांनी दिलेले होते. त्यांनी दिलेल्या मार्गावरून जो जाईल त्याला निर्वाणाचा दरवाजा खुला आहे . त्यांनी सर्व जाती आणि धर्माच्या लोकांना त्यांच्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य असल्याचा सल्ला दिला. त्या काळात, महावीर स्वामीजींनी जाती आणि लिंगभेद दूर करण्यासाठी उपदेश केला.
अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह ही त्यांनी जैन धर्मियांसाठी दिलेल्या पाच प्रतिज्ञांपैकी एक होते. त्याचे सर्व इंद्रियांवर प्रभुत्व असल्यामुळे त्यांना जितेंद्रिय किंवा ‘जिन‘ हे नाव देण्यात आले. त्यांच्या नावावरून जैन धर्माचे नाव पडले.
कार्तिक महिन्याच्या अमावस्येच्या रात्री दीपावली दिवशी वयाच्या ७२ व्या वर्षी महावीर स्वामींना निर्वाण पद मिळाले .
विश्व संवाद केंद्र , विदर्भ