NaxalismNews

नक्षलवाद्यांचा रक्तरंजित इतिहास..:- भाग ७

फायदेशीर धंदा म्हणजेच…नक्षलवाद :-

लोकशाहीतील निवडणुकांच्या विरोधाची भाषा करणारे नक्षल चळवळीत दलम कमांडर नंतर स्थानिक राजकारण्याकडून खंडणी वसूल करु लागले. निवडणुकीच्या काळात एकीकडे मतदानावर बहिष्कार घालण्याची भाषा करायचे आणि दुसरीकडे खंडणी वसूल केलेल्या पुढाऱ्यांना मदत करायची. खंडणीसाठी कुणाचीही हत्या करायची… ज्या पीडित वनवासी आणि मजुरांसाठी नक्षल चळवळीची सुरुवात झाली, नंतर त्याच निष्पाप वनवासींची नक्षलवाद्यांनी हत्या करायला सुरुवात केली. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत विकासाची भाषा बोलणाऱ्या ६० पेक्षा जास्त दलितांची नक्षलवाद्यांनी हत्या केली आहे.

गृहमंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सध्या देशभरातील नक्षलचळवळीचं दरवर्षीचं बजेट दीड हजार कोटींपेक्षा जास्त आहे. नक्षलवादी (NAXALWADI) पोलीसांवर हल्ला केल्यानंतर त्यांचे शस्त्र लुटतात, तरीही देशभरात नक्षल चळवळीतील नेते दरवर्षी ३० कोटींपेक्षा जास्त रुपयांचे शस्त्र खरेदी करतात. महाराष्ट्रातील नक्षल प्रभावीत असलेल्या गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपूर या तीन जिल्ह्यातून नक्षलवादी दरवर्षी २० ते २५ कोटी रुपयांची खंडणी वसूल करतात. देशभरात खंडणी गोळा करुनच नक्षल चळवळीसाठी पैसा उभा केला जातो.

गेल्या आठवड्यात गडचिरोली जिल्ह्यात तेंदूपत्ता कंत्राटदारांकडून पोलीसांनी ७६ लाखांची रक्कम जप्त केली, ही रक्कम नक्षलवाद्यांना खंडणी म्हणून जात होती, असा पोलीसांचा दावा आहे. देशभरातील नक्षलप्रभावीत भागातल्या जंगलांमध्ये तेंदूपत्ता, बांबू किंवा जंगलात एखादा उद्योग सुरु करायचा असेल तर नक्षलवाद्यांना खंडणी द्यावी लागते. याच आर्थिक रसदीच्या जोरावर देशभरात नक्षल कारवाया सुरु आहे. देशाच्या सुरक्षेला धोका असलेल्या या नक्षल चळवळीला समुळ नष्ट करायचं असेल तर त्यांची सर्वप्रथम आर्थिक रसद बंद करायला हवी.

वनक्षेत्रात राहणाऱया आणि नागरी सुविधांपासून पूर्णतः वंचित असणाऱया तसेच गरिबीच्या खाईत पडलेल्या वनवासी लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी नक्षलवादाचा जन्म झाल्याचे सांगण्यात येते. सामोपचाराने हा न्याय मिळत नसल्याने हाती शस्त्र घेण्यापासून पर्याय नसल्याचेही नक्षलवादाचे समर्थक म्हणतात. तथापि झारखंडमधल्या अनेक जिल्हय़ांमध्ये आज नक्षलवाद हा वनवासीना न्याय मिळवून देण्याचे आपले (उदात्त) कर्तव्य पूर्णतः विसरला असून नक्षलवादाच्या माध्यमातून नागरिकांकडून खंडणी गोळा करणे आणि त्या पैशावर चैन करणे असे उद्योग नक्षलवाद्यांनी सुरू केल्याचे दिसून येत आहे. ज्या वनवासींचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने नक्षलवाद प्रस्तापित झाला तोच नक्षलवाद आता त्याच लोकांची लूट करीत आहे, असे एका सर्वेक्षणात दिसून आले आहे. नक्षलवादी खंडणीतून मिळणारी रक्कम प्रत्येक जिल्हय़ामध्ये कित्येक कोटींच्या घरात जाते.

झारखंड सरकार आणि केंद सरकार (CENTRAL GOVERNMENT) संयुक्तरित्या केलेल्या कारवायांमध्ये अनेक कुप्रसिद्ध नक्षलवाद्यांकडून कोटय़वधी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. विनोदकुमार गंझू, मुनेश गंझू, बिरबल गंझू, गोपालसिंह भोक्ता इत्यादींना अटक करण्यात येऊन त्यांच्यावर खटले दाखल करण्यात येत आहेत. गेल्या काही वर्षांत १०० कोटी रुपयाहून अधिक संपत्ती नक्षलवाद्यांकडून जप्त केल्याचे प्रतिपादन करण्यात आले आहे. काही नक्षलवाद्यांकडे अलिशान घरे आणि आधुनिक वाहने असल्याचेही दिसून आले आहे.यामुळे स्थानिक जनतेचा नक्षलवादी नेत्यांवरचा विश्वास उडाला असून ही जनता शासनाला सहकार्य करीत असल्याचे दिसून येते.

(क्रमशः)

Back to top button